मराठा आंदोलकांवर लाठीचार्ज, विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल; वाद आणखी पेटणार

By ऑनलाइन लोकमत | Published: September 1, 2023 07:25 PM2023-09-01T19:25:09+5:302023-09-01T19:29:10+5:30

मराठा आरक्षण कसे देणार हे तातडीने  स्पष्ट करा नाहीतर असा उद्रेक होतच राहणार असा इशारा मराठा आरक्षण याचिकाकर्ते विनोद पाटील यांनी दिला आहे

Lathi charge on Maratha protestors, opponents attack government; Supriya Sule, Ashok Chavan Target BJP | मराठा आंदोलकांवर लाठीचार्ज, विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल; वाद आणखी पेटणार

मराठा आंदोलकांवर लाठीचार्ज, विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल; वाद आणखी पेटणार

googlenewsNext

मुंबई – जालना येथे मराठा आंदोलकांवर झालेल्या लाठीचार्जचे पडसाद आता राजकीय वर्तुळात उमटू लागले आहेत. मराठा आरक्षण प्रकरणी राज्य सरकारने समाजाचा अंत पाहू नये. या गंभीर प्रश्नावर केवळ वेळकाढूपणा होत असल्याने समाज संतप्त आहे. बळाचा वापर करून हे आंदोलन चिरडता येणार नाही. त्याऐवजी मराठा आरक्षण कसे देणार, याबाबत राज्य सरकारने स्पष्ट भूमिका जाहीर करावी आणि ठोस पावले उचलावीत. नेमके हेच केले जात नसल्याने मराठा समाजातील आक्रोश तीव्र होतो आहे असा हल्लाबोल माजी मंत्री अशोक चव्हाण यांनी राज्य सरकारवर केला.

काँग्रेस नेते अशोक चव्हाण म्हणाले की, मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी अंबड तालुक्यातील सराटी अंतरवाली येथे सुरू असलेले मनोज जरांगे पाटील यांचे आंदोलन अमानुष पद्धतीने मोडून काढण्याच्या राज्य सरकारच्या कृतीचा मी तीव्र निषेध करतो. आंदोलनावर पोलिसांनी बेछूट लाठीमार करून अश्रुधुराचाही वापर केल्याची धक्कादायक माहिती समोर येते आहे. सोशल मीडियावर येणाऱ्या व्हिडीओतून बळाचा अतिरेक स्पष्टपणे दिसून येतो. मराठा आरक्षण देण्यासाठी इंद्रा साहनी व अन्य न्यायालयीन प्रकरणातील ५० टक्क्यांची आरक्षण मर्यादा शिथिल करण्याची आवश्यकता आहे. याकडे वारंवार लक्ष वेधल्यानंतरही केंद्र व राज्य सरकार काहीच करत नसल्याने मराठा समाजावर आरक्षणासाठी पुन्हा रस्त्यावर उतरण्याची वेळ ओढवली आहे असा आरोप अशोक चव्हाणांनी केला.

तर मराठा आरक्षणाबाबत सर्वच राजकीय पक्षांनी समाजाच्या तोंडाला पाने पुसली आहेत. आरक्षणाची मागणी लावून धरणाऱ्या माझ्या भावा बहिणींना लाठया काठया खाण्याची वेळ या सरकारने आणली आहे. मराठा आरक्षणाची मागणी करणाऱ्या आंदोलकांवर सरकारने केलेल्या लाठी हल्ल्याचा निषेध करतो. मराठा आरक्षण कसे देणार हे तातडीने  स्पष्ट करा नाहीतर असा उद्रेक होतच राहणार असा इशारा मराठा आरक्षण याचिकाकर्ते विनोद पाटील यांनी दिला आहे. त्याचसोबत आरक्षणाची मागणी आपण ज्या शांततामय आणि कायदेशीर मार्गाने  लावून धरली होती तशीच ती नेटाने लावून धरु त्यात आपण तसूभरही मागे हटणार नाही. मराठा आरक्षणाचे आंदोलन आपल्याला शांततेनेच करायचे आहे . या आंदोलनाला वावगे वळण लागता कामा नये असं आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केले.

भाजपाने मराठा समाजाची माफी मागितली पाहिजे

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन करणाऱ्या आंदोलकांवर पोलीसांनी लाठीचार्ज केला.‌ हे अतिशय संतापजनक आहे. मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या भुलथापा देऊन भाजपाने मते घेतली परंतु आरक्षणाच्या बाबतीत मराठा समाजाला केवळ आश्वासने देण्यापलीकडे भाजपाने काहीही केले नाही, ही वस्तुस्थिती आहे. मराठा, धनगर, लिंगायत आणि मुस्लिम समाजाला आरक्षण देण्याबाबत आमची भूमिका स्पष्ट आहे. परंतु भाजपाने यासंदर्भात सातत्याने संभ्रम वाढविणारी भूमिका घेतली असा आरोप खासदार सुप्रिया सुळे यांनी केला. त्याचसोबत केंद्र आणि राज्यात एकाच पक्षाचे, विचारांचे सरकार असूनही आरक्षण दिले जात नाही हि खेदाची बाब आहे. मराठा समाजाच्या आंदोलनकर्त्यांवर लाठी हल्ला करुन भाजपा सरकारने समाजाची क्रूर फसवणूक केली आहे. भाजपाने मराठा समाजाची याबद्दल माफी मागितली पाहिजे अशी मागणीही त्यांनी केली.

दरम्यान, सरकारमधील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानेही सरकारला घरचा आहेर दिला आहे. जालना येथील आंदोलनकर्त्यांवर जो लाठीचार्ज केला त्याचा मी निषेध करतो. प्रत्येकाला लोकशाहीत मागणी मांडण्याचा, आंदोलन करण्याचा अधिकार आहे. पोलिसांच्या बळाचा वापर होणे योग्य नाही. राज्य सरकार याचे समर्थन करणार नाही. जालनाचे पोलीस अधीक्षक आणि जबाबदार पोलीस अधिकारी यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार गटाचे प्रवक्ते उमेश पाटील यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केली आहे.

Web Title: Lathi charge on Maratha protestors, opponents attack government; Supriya Sule, Ashok Chavan Target BJP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.