लाठीचार्ज ही पोलिसांची दादागिरी, फडणवीसांचा कुठलाही हात नाही - रामदास आठवले
By ऑनलाइन लोकमत | Published: September 5, 2023 08:13 AM2023-09-05T08:13:25+5:302023-09-05T09:05:51+5:30
पालघर येथे आयोजित रिपाईच्या कार्यकर्ता मेळाव्यात रामदास आठवले यांनी हजेरी लावली होती.
जालन्यात मराठा आंदोलकांवर झालेला लाठीचार्ज ही पोलिसांची दादागिरी असून यात गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा कुठलाही हात नसल्याचे वक्तव्य केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी केले आहे. पालघर येथे आयोजित रिपाईच्या कार्यकर्ता मेळाव्यात रामदास आठवले यांनी हजेरी लावली होती. यावेळी पत्रकार परिषदेत रामदास आठवले बोलत होते.
देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी आश्वासन दिले होते, आता मराठा समाजाला आरक्षण देण्याची जबाबदारी ही त्यांची असल्याचेही रामदास आठवले यावेळी म्हणाले. तसेच, जालन्यात मराठा आंदोलकांवर झालेला लाठीचार्ज ही पोलिसांची दादागिरी असून यामध्ये देवेंद्र फडणवीस यांचा कुठलाही हात नाही. लाठीचार्ज करण्याचा पोलिसांचा निर्णय हा त्यांनी परस्पर घेतला असून यासाठी सरकारकडून कोणतेही आदेश दिले नाहीत, असा दावाही रामदास आठवले यांनी केला आहे.
याचबरोबर, 2024 च्या लोकसभा निवडणुकीत रिपाईला दोन जागा मिळण्यासाठी आम्ही आग्रही असून आपण शिर्डीतून लोकसभा निवडणूक लढणार असल्याची पुनरावृत्ती पुन्हा एकदा रामदास आठवले यांनी पालघरमध्ये पत्रकार परिषदेत केली. तसेच, 2019 च्या निवडणुकीत आपला शिर्डी लोकसभा मतदारसंघातून पराभव झाला असला तरी सध्या आपला तिथे जनसंपर्क चांगला असून यावेळेस निश्चितच निवडून येऊ असा विश्वास रामदास आठवले यांनी व्यक्त केला आहे.