चित्रपटाच्या नावाखाली लाटले अनुदान
By admin | Published: February 6, 2016 03:28 AM2016-02-06T03:28:54+5:302016-02-06T03:28:54+5:30
चित्रपटाच्या नावाखाली शासनाचे १० लाखांचे अनुदान लाटणाऱ्या अजित सारंग याला नाशिक येथून अटक करण्यात आली आहे
मुंबई : चित्रपटाच्या नावाखाली शासनाचे १० लाखांचे अनुदान लाटणाऱ्या अजित सारंग याला नाशिक येथून अटक करण्यात आली आहे. तुकडोजी महाराज यांच्यावर चित्रपट तयार करण्यासाठी शासनाकडून त्याच्या संस्थेला पहिल्या टप्प्यात १० लाखांचे अनुदान देण्यात आले होते.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अजित सारंग प्रॉडक्शनने २००५ साली तुकडोजी महाराज यांच्या जीवनावर चित्रपट तयार करण्यासाठी सांस्कृतिक कार्य संचालनालयाकडून ५० लाखांचे अनुदान मंजूर करून घेतले. त्यापैकी १० लाख रुपयांचा पहिला हप्ता त्याला शासनाकडून देण्यात आला. तीन वर्षे उलटूनही चित्रपटासंदर्भात काहीच हालचाली दिसत नसल्याने अनुदान म्हणून दिलेली रक्कम व्याजासह परत करण्याचे आदेश त्याला देण्यात आले. २०१० साली लवाद स्थापन करून या प्रॉडक्शनच्या अजित सारंग याला नोटीस बजाविण्यात आली. त्यानंतर नाशिक जिल्हा अधिकाऱ्यांना जमीन महसूल कायद्यानुसार ही रक्कम वसूल करण्याबाबत सांगण्यात आले. मात्र सारंगकडे काहीच मालमत्ता नसल्याने यावर काही कारवाई करणे शक्य नव्हते.
अखेर रकमेचा अपहार करून शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी २७ आॅगस्ट २०१५ रोजी कुलाबा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. स्थानिक पोलीस ठाण्याबरोबरच गुन्हे शाखा कक्ष १चे सहायक पोलीस निरीक्षक विटकर यांच्या तपास पथकाने गुरुवारी नाशिकमधून सारंगच्या मुसक्या आवळल्या. या प्रकरणी अधिक तपास सुरू असल्याची माहिती गुन्हे शाखेने दिली. (प्रतिनिधी)