मुंबई-लातूर एक्स्प्रेससाठी लातूरकरांनी रोखली रेल्वे

By admin | Published: May 9, 2017 05:03 PM2017-05-09T17:03:28+5:302017-05-09T17:08:40+5:30

लातूर रेल्वे स्थानकावर लातूर एक्स्प्रेस रेल्वे बचाव कृती समितीच्या वतीने आंदोलकांनी पंढरपूर-निजामाबाद रेल्वे रोखली.

Latukar block for the Mumbai-Latur Express by Rohini Railway | मुंबई-लातूर एक्स्प्रेससाठी लातूरकरांनी रोखली रेल्वे

मुंबई-लातूर एक्स्प्रेससाठी लातूरकरांनी रोखली रेल्वे

Next

ऑनलाइन लोकमत
लातूर, दि. 9 - मुंबई-लातूर एक्स्प्रेस रेल्वेचे बीदरपर्यंत करण्यात आलेले विस्तारीकरण रद्द करावे, या प्रमुख मागणीसाठी लातूर रेल्वे स्थानकावर लातूर एक्स्प्रेस रेल्वे बचाव कृती समितीच्या वतीने आंदोलकांनी पंढरपूर-निजामाबाद रेल्वे रोखली. आंदोलकांनी सरकारच्या निषेधार्थ दिलेल्या घोषणांनी रेल्वे स्थानक परिसरत दणाणून गेला होता. यावेळी पोलिसांनी जवळपास २५५ आंदोलकांना अटक केली.
आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर रेल्वे आणि स्थानिक पोलिसांनी तगडा बंदोबस्त तैनात केला होता. त्यामुळे लातूर रेल्वे स्थानकाला छावणीचे स्वरूप आले होते. सोमवारी रात्रीपासूनच पोलिसांनी आंदोलकांची नाकाबंदी केली होती. एक किलोमीटरपर्यंत पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. नवीन रेणापूर नाका, रेल्वे स्थानकाकडे जाणाऱ्या चौकातही पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला होता. मोठ्या संख्येने दाखल होणाऱ्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी स्थानक परिसरातच रोखले. रेल्वे स्थानक परिसरात लातूर एक्स्प्रेस रेल्वे बचाव कृती समितीच्या वतीने आ. अमित देशमुख, आ. विक्रम काळे, लातूर ग्रामीणचे आ. त्रिंबक भिसे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी आ. अमित देशमुख यांनी सरकारच्या धोरणाचा त्याचबरोबर लातूर रेल्वेचे विस्तारीकरण करणाऱ्या प्रशासनाचा निषेध केला.

मुंबई-लातूर एक्स्प्रेस ही लातूरकरांची अस्मिता आहे. लातूर रेल्वे लाईन अस्तित्वात आल्यापासून ही रेल्वे सुरू आहे. जवळपास दीड ते दोन हजार प्रवासी वेटिंगवर असताना आणि रेल्वे फायद्यात असतानाही जाणीवपूर्वक सत्ताधाऱ्यांनी ही रेल्वे बीदरला नेण्याचा घाट घातला. लातूरकरांची ओळख पुसण्याचा यातून त्यांचा डाव आहे. या निर्णयाला पालकमंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर आणि खा.डॉ. सुनील गायकवाड हेही तेवढेच जबाबदार आहेत. हा निर्णय काही एका रात्रीतून झाला नाही. या निर्णयापूर्वी वर्ष-दीड वर्षापासूनची प्रक्रिया सुरू असावी. हा प्रकार होत असताना लातूरच्या खासदारांना माहिती नसावी, याबाबत आश्चर्य वाटते, असेही आ. अमित देशमुख म्हणाले. यावेळी आ. त्रिंबक भिसे, आ. विक्रम काळे यांनीही आंदोलकांना मार्गदर्शन केले. 
पंढरपूर-निजामाबाद रोखली...
दुपारी १२.१० वाजण्याच्या सुमारास लातूर रेल्वे स्थानकात दाखल झालेल्या पंढरपूर-निजामाबाद रेल्वे कृती समितीच्या कार्यकर्त्यांनी रोखली. यावेळी सरकारसह रेल्वे प्रशासन विरोधात कार्यकर्त्यांनी घोषणा दिल्या. या घोषणांनी रेल्वे स्थानक परिसर दणाणून गेला होता. 
अमित देशमुखही चढले इंजिनवर...
पंढरपूर-निजामाबाद रेल्वे स्थानकात दाखल झाल्यानंतर आमदार अमित देशमुख स्वत: इंजिनवर चढून मुंबई-लातूर एक्स्प्रेसच्या विस्तारीकरणाविरोधात घोषणा दिल्या. यावेळी त्यांनी आंदोलकांना मार्गदर्शन केले. दरम्यान, १५ मिनिट रेल्वे रोखल्यानंतर रेल्वे पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. 
यावेळी शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष मोईज शेख, जिल्हाध्यक्ष व्यंकट बेद्रे, अ‍ॅड़ उदय गवारे, विक्रांत गोजमगुंडे, सपना किसवे, माजी महापौर स्मिता खानापुरे, एस. आर. देशमुख, पप्पु कुलकर्णी, अशोक गोविंदपुरकर, संजय ओव्हळ, नरेंद्र अग्रवाल, अ‍ॅड़ समद पटेल, दिनेश गिल्डा, शिवाजी नरहरे, सुपर्ण जगताप, विनोद खटके, लक्ष्मीताई बटनपूरकर, रेहाना बासले, सय्यद रफिक, भगवान माकणे, अ‍ॅड़ खुशालराव सुर्यवंशी, किरण पवार, असीफ बगवान आदींसह शेकडो कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.
५०० पोलिसांचा फौजफाटा...
रेल रोको आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर रेल्वे पोलीस आणि स्थानिक पोलिसांच्या वतीने रेल्वे स्थानक परिसरात जवळपास ५०० पेक्षा अधिक पोलीस शिपाई आणि जवानांचा फौजफाटा तैनात करण्यात आला होता. मध्यरात्रीपासूनच आंदोलकांची कोंडी करीत नाकाबंदी करण्याचा प्रयत्न पोलीस प्रशासनाने केला. शिवाय काही कार्यकर्त्यांना रात्रीच ताब्यात घेण्यात आले. या तगड्या पोलीस बंदोबस्तामुळे रेल्वे स्थानकाला छावणीचे स्वरूप आले होते. 
आंदोलन दडपण्याचा प्रयत्न... 
मुंबई-लातूर एक्स्प्रेस रेल्वेच्या विस्तारीकरणाविरोधात लातूर रेल्वे एक्स्प्रेस बचाव कृती समितीच्या वतीने रेल रोको आंदोलनाची गेल्या अनेक दिवसांपासूनची तयारी केली होती. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर रेल्वे पोलीस आणि स्थानिक पोलिसांनी जाणीवपूर्वक हे आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आ. अमित देशमुख यांनी केला. कार्यकर्त्यांना रेल्वे स्थानकाबाहेरच रोखून ठेवण्याचा पोलिसांनी प्रयत्न केला. हा प्रकार स्थानकातील आंदोलकांना समजल्यानंतर यावर आक्षेप घेत आंदोलकांना सोडण्याची मागणी त्यांनी केली. त्यानंतर काही कार्यकर्त्यांना रेल्वे स्थानक परिसरात सोडण्यात आले.

Web Title: Latukar block for the Mumbai-Latur Express by Rohini Railway

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.