लातूरवर पुन्हा आभाळ फाटले
By Admin | Published: October 10, 2016 05:20 AM2016-10-10T05:20:47+5:302016-10-10T05:20:47+5:30
सहा दिवसांच्या विश्रांतीनंतर लातूर जिल्ह्यात शनिवारी रात्री जिल्ह्यात पुन्हा मोठा पाऊस झाला. देवणी आणि शिरूर अनंतपाळ तालुक्यांत तसेच उदगीर
लातूर : सहा दिवसांच्या विश्रांतीनंतर लातूर जिल्ह्यात शनिवारी रात्री जिल्ह्यात पुन्हा मोठा पाऊस झाला. देवणी आणि शिरूर अनंतपाळ तालुक्यांत तसेच उदगीर तालुक्यातील देवर्जन परिसरात अतिवृष्टी झाली. गेल्या २४ तासांत साकोळ महसूल मंडळात २०५, निटूरमध्ये १३४ आणि अंबुलगा महसूल मंडळात ९१ मि.मी. पाऊस झाला आहे. धनेगाव बॅरेजेसचे तीन दरवाजे उघडण्यात आले असून, सध्या नदीपात्रातून साडेतीन मीटर पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे.
नदीवाडी, हंचनाळ गावात संपूर्ण शिवार पाण्याखाली असून, औराद परिसरात मांजरा नदीला पूर आला आहे. औराद, वांजरखेडा, हलसी-तुगाव पुलावर पुन्हा पाणी आले असून, गावांचा संपर्क तुटला आहे. तेरणाचे बॅकवॉटर पसरत आहे. औराद येथील जुन्या पुलाच्या पायऱ्याखाली पाणी आले आहे. शिवाय, कवठाळा-वलांडी रस्त्यावरील पूल वाहून गेल्याने या रस्त्यावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे. घरणी, लेंडी, कोटकसर नदीला महापूर आला. साकोळ येथे अनेक घरांमध्ये पाणी शिरले आहे. लातूर, उदगीर, निलंग्याहून येणारे सर्व रस्ते पाण्याखाली गेले आहेत. मसलगा गावात अनेक घरांची पडझड झाली.
देवणी तालुक्यात गेल्या २४ तासांत ११५.३३ मि.मी. पाऊस झाला. तालुक्यातील मांजरा, देव, मानमोडी या नद्यांना पूर आल्याने लासोना, गुरनाळ, देवणी (खु.), सिंधीकामठ, वागदरी, कमालवाडी या गावांचा संपर्क वारंवार तुटत आहे. शनिवारी उदगीर तालुक्यातील हत्तीबेट पर्यटन स्थळाच्या डोंगरावर ढगफुटी झाली़ देवर्जन येथे पावसाची ११९ मिमी इतकी नोंद झाली आहे़ (प्रतिनिधी)