लातूर, चंद्रपुरात भाजपा; परभणीत काँग्रेसला साथ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2017 04:39 AM2017-04-22T04:39:37+5:302017-04-22T04:39:37+5:30
स्व. विलासराव देशमुख यांच्या पश्चात झालेल्या महापालिका निवडणुकीत लातुरात काँग्रेसचे पानिपात झाले असून, मंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांच्या नेतृत्वाखाली भाजपाने
मुंबई : स्व. विलासराव देशमुख यांच्या पश्चात झालेल्या महापालिका निवडणुकीत लातुरात काँग्रेसचे पानिपात झाले असून, मंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांच्या नेतृत्वाखाली भाजपाने काँग्रेसच्या या बालेकिल्ल्यावर कमळ फुलवून दाखवले. याउलट, परभणीत काँग्रेसने दणदणीत यश मिळविले असून, सर्वाधिक ३१ जागा जिंकून महापौरपदावर दावा केला आहे. तर विदर्भातील चंद्रपूरमध्ये भाजपाने ३६ जागा मिळवून परिवर्तन घडवून आणले आहे.
संपूर्ण राज्याचे लक्ष लागून असलेल्या लातूरमध्ये पहिल्यांदाच सत्तांतर घडले. भाजपा लाटेत काँग्रेसची ही गढी पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळली. दिवंगत नेते विलासराव देशमुख यांच्या कणखर नेतृत्वामुळे आजवर लातूरमध्ये काँग्रेसची अबाधित सत्ता होती. मात्र, त्यांच्या पश्चात त्यांचे चिरंजीव अमित देशमुख यांना हा वारसा पेलवता आला नाही. जिल्हा परिषदेपाठोपाठ मनपाची सत्ता गेली. महापालिकेच्या ७० पैकी ३६ जागांवर विजय मिळवित भाजपाने बहुमत मिळविले. काँग्रेस ३३ जागांवर थांबली.
अवघ्या तीन जागांनी तोंडचा घास हिरावला गेला. लातूरमध्ये काँग्रेस-भाजपा या दोन पक्षांतच मुख्य लढत झाल्याने इतर पक्षांची वाताहात झाली. शिवसेनेला भोपळाही फोडता आला नाही, तर राष्ट्रवादीला केवळ एक जागा मिळाली. परभणी
महापालिकेत ३१ जागा जिंकून काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला असून महापौरपदासाठी केवळ दोन जागांची गरज आहे. निवडून आलेले दोन्ही अपक्ष काँग्रेसचे बंडखोर असल्याने काँग्रेसच्या सत्ता स्थापनेतील अडसर दूर झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे १८ उमेदवार निवडून आले आहेत. मोठ्या ताकदीने प्रचारात उतरलेल्या शिवसेनेची मात्र वाहताहत झाली असून या पक्षाचे केवळ ६ सदस्य निवडून आले आहेत. गेल्यावेळी केवळ २ संख्याबळ असलेल्या भाजपाने यावेळी चांगली कामगिरी केली असून या पक्षाचे ८ सदस्य निवडून आले आहेत. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी परभणीवर अधिक लक्ष केंद्रीत करून जिल्ह्यातील पक्षाच्या सर्व नेत्यांना एकत्र आणले. सामूहिक नेतृत्वामुळेच कॉंग्रेसला यश मिळाले. राष्ट्रवादीला अति आत्मविश्वास नडल्यामुळे त्यांच्या हातून सत्ता गेली. या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या महापौर संगीता वडकर यांचे पती राजेंद्र वडकर, शिवसेनेचे सहसंपर्कप्रमुख डॉ.विवेक नावंदर, भाजपाचे शहर जिल्हाध्यक्ष आनंद भरोसे यांचे बंधू शिवाजी भरोसे, भाजपाचे गटनेते दिलीपसिंह ठाकूर, शिवसेनेच्या विरोधी पक्षनेत्या अंबिका डहाळे या दिग्गजांचा या निवडणुकीत पराभव झाला. चंद्रपूर महापालिकेत भाजपाने सर्वाधिक ३६ जागा जिंकून काँग्रेसला धोबीपछाड दिली आहे. तर काँगे्रसला फक्त १२ जागांवर समाधान मानावे लागले. वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार व केंद्रीय मंत्री हंसराज अहीर यांनी प्रचाराची सुत्रे ताब्यात घेत नियोजनबद्ध आखणी केल्याने भाजपा उमेदवारांचा विजय सुकर झाला. याउलट काँग्रेसचे खासदार नरेश पुगलिया यांनी एकहाती किल्ला लढविला, मात्र अपेक्षित यश मिळाले नाही. केवळ बारा जागा मिळाल्याने काँग्रेसच्या हातून मनपाची सत्ता गेली. चंद्रपूरच्या राजकारणात काँग्रेसची प्रथमच एवढी मोठी घसरण झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि मनसेला प्रत्येकी दोन जागांवर समाधान मानावे लागले. यंदा भारिप-बहुजन महासंघाने जोरदार प्रचार केला पण त्यांना एकही जागा मिळाली नाही. उलट बसपाकडे अवघी एक जागा असताना यावेळी त्यांना आठ जागा मिळाल्या आहेत. भाजपाने निर्विवाद बहुमत मिळविले असले तरी महापौरपद कोणाला मिळणार हे अद्याप स्पष्ट केले नाही. महापौरपद महिला खुल्या प्रवर्गासाठी आरक्षित आहे.
भाजपासाठी ‘जलदूत’ संजीवनी
दुष्काळात रेल्वेद्वारे पाणी आणून सरकारने लातूरकरांची तहान भागविली. भाजपा नेत्यांनी या मुद्द्याचा खुबीने वापर करत, ‘जलदूत’च्या माध्यमातून पक्षाला संजीवनी मिळवून दिली.
‘झीरो टू हीरो’!
लातूरमध्ये मावळत्या महापालिकेत भाजपाला एकही जागा नव्हती. मात्र, शिस्तबद्ध प्रचार यंत्रणा आणि मुख्यमंत्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, राष्ट्रीय प्रवक्ते शहानवाज हुसेन आदींच्या प्रचारसभा घेऊन ‘झीरो टू हीरो’ असा राजकीय चमत्कार घडवून दाखविला. मराठवाड्यात घुसखोरी करणाऱ्या एमआयएमचा मात्र, दोन्ही ठिकाणी फज्जा उडाला.