दुष्काळग्रस्त लातूरमध्ये मुलाने वडिलांना आत्महत्या करण्यापासून रोखलं
By Admin | Published: April 25, 2016 01:09 PM2016-04-25T13:09:35+5:302016-04-25T13:09:35+5:30
अगोदरच दुष्काळाचं संकट आणि डोक्यावर कर्जाचा डोंगर यामुळे कंटाळून आत्महत्येचा मार्ग स्विकारणा-या शेतक-याला मुलाने आत्महत्येपासून रोखलं आहे
>ऑनलाइन लोकमत -
लातूर, दि. 25 – अगोदरच दुष्काळाचं संकट आणि डोक्यावर कर्जाचा डोंगर यामुळे कंटाळून आत्महत्येचा मार्ग स्विकारणा-या शेतक-याला मुलाने आत्महत्येपासून रोखलं आहे. धनराज शिंदे असं या शेतक-याचं नाव आहे. लातूरच्या शिरपूर अनंतपाल गावातील ही घटना आहे.
धनराज शिंदे नेहमीप्रमाणे शेतात चालले होते. मात्र त्यांनी आपली सामानाची बॅग, फोन काहीच घेतलं नसल्याचं त्यांचा 14 वर्षीय मुलगा पृथ्वीराजच्या लक्षात आलं, आणि लगेच त्याने वडिलांना रोखलं. 'मी त्यांना दोर गुंडाळताना पाहिलं होतं. मी त्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला. जर तुम्ही आत्महत्या केलीत तर तुमच्यानंतर आमची काळजी घेण्यासाठी कुणीच नसेल', असं पृथ्वीराजने वडिलांना सांगितलं. त्यानंतर भावनिक झालेल्या धनराज शिंदे यांनी आत्महत्या करण्याचा विचार सोडून दिला.
धनराज शिंदे यांची तीन एकर जमीन आहे. सलग 3 वर्ष शेतीतून काहीच उत्पन्न मिळालेलं नाही. पहिल्या वर्षी गारपीटीमुळे शेतीचं नुकसान झालं. आणि त्यानंतर सलग दोन वर्ष दुष्काळामुळे काहीच शेती झाली नाही. धनराज शिंदे यांना एक मुलगा आणि चार मुली आहेत. त्यांच्यावर 15 लाखांच कर्ज आहे तरीही त्यांनी आपला लढा सुरु ठेवला होता. वायरलेस ऑपरेटरसाठी त्यांच्या मुलीला नोकरी मिळाली आहे. पण स्थानिक शासकीय कर्मचारी दिरंगाई करत असल्याने त्यांचा तणाव वाढला होता.
'माझ्या मुलांची खुप स्वप्ने आहेत. त्यांना त्यांच्या पायावर उभं राहायचं आहे. जर निसर्गाने साथ दिली नाही तर त्यांच्या अपेक्षा मी पुर्ण करु शकणार नाही', अशी भीती धनराज शिंदे व्यक्त करत आहेत. त्यांच्या 26 वर्षीय अर्चना या मुलीला संस्कृतमध्ये राष्ट्रपती पदक मिळालेलं आहे. तर त्यांचा मुलगा पृथ्वीराजला आयएएस अधिकारी बनायचं आहे.
'माझ्या मुलाने आत्महत्या करण्यापासून रोखलं नसतं तर काय झालं असत ? माझं कर्ज फेडण्यासाठी चांगल्या पावसाची गरज आहे. माझ्या मुलांच्या अपेक्षा पुर्ण करणं हे प्रत्येक दिवशी माझ्यासाठी एक आव्हान आहे', असं धनराज शिंदे बोलले आहेत.