काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात देशमुखांचा चौकार की अर्चना पाटील चाकूरकर ठरणार जायंट किलर?
By ऑनलाइन लोकमत | Published: November 11, 2024 03:05 PM2024-11-11T15:05:24+5:302024-11-11T15:08:25+5:30
Maharashtra Election 2024 : लातूर शहरासह परिसरातील २९ गावे शहर विधानसभा मतदारसंघात आहेत. ४ लाख १४५ मतदार असून, गेल्या अनेक वर्षांपासून या मतदारसंघामध्ये काँग्रेसचे वर्चस्व आहे.
हणमंत गायकवाड, लातूर
Latur City Assembly election 2024: काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या लातूर शहर विधानसभा मतदारसंघात विजयाची हॅटट्रिक करणारे माजी मंत्री आ. अमित देशमुख चौथ्यांदा निवडणुकीला सामोरे जात आहेत. त्यांच्यासमोर भाजपत नव्याने दाखल झालेल्या डॉ. अर्चना पाटील चाकूरकर यांचे आव्हान आहे. एकूण २३ उमेदवार रिंगणात असले तरी सामना देशमुख विरुद्ध चाकूरकर असा दुरंगी दिसत आहे. (Amit Deshmukh vs Archana Patil Chakurkar)
लातूर शहरासह परिसरातील २९ गावे शहर विधानसभा मतदारसंघात आहेत. ४ लाख १४५ मतदार असून, गेल्या अनेक वर्षांपासून या मतदारसंघामध्ये काँग्रेसचे वर्चस्व आहे. अमित देशमुख गेल्या पंधरा वर्षांपासून मतदारसंघाचे नेतृत्व करीत आहेत.
त्यापूर्वी पाच वेळा माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी या भागाचे नेतृत्व केले आहे. जवळपास ४० वर्षांपासून लातूर मतदारसंघावर काँग्रेसचेच वर्चस्व आहे.
आता भाजपने चाकूरकर घराण्यातील उमेदवार देऊन ही निवडणूक चर्चेत आणली. त्याचवेळी वंचित आघाडीचे विनोद खटके काँग्रेस आणि भाजप या दोन्ही पक्षांविरुद्ध भूमिका मांडत आहेत.
मतदारसंघातील कळीचे मुद्दे
लातूर शहराला कायमस्वरुपी पाणीपुरवठा करण्यासाठी उजनीचे पाणी आणण्याचा विषय प्रलंबित आहे.
विमानतळावरून राज्यांतर्गत तसेच २ मोठ्या शहरांसाठी विमानसेवा सुरू होण्याची गरज चर्चेत आहे.
लातूर शहरातील कचरा, तरुणांच्या रोजगारांचे प्रश्न, जिल्हा रुग्णालयाच्या जागा हस्तांतरणाचा प्रश्न रखडलेला आहे.
सोयाबीनची हमीभावाप्रमाणे खरेदी होत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे.
भाजपने जातीय समीकरणाची जुळवाजुळव करीत प्रचारात रंग भरले आहेत. त्याचवेळी काँग्रेसने या समीकरणांना थोपण्यासाठी यंत्रणा कामाला लावली आहे. शहराची सुरक्षितता, शांतता व एकोपा आणि राज्य नेतृत्वाचा मुद्दा काँग्रेसच्या प्रचाराचा गाभा आहे.
२०१९ मध्ये निकाल काय?
अमित देशमुख यांनी २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत लाखाहून अधिक मते घेतली होती. अमित देशमुख यांना १ लाख ११ हजार १५६ मते मिळाली होती. तर भाजपचे शैलेश लाहोटी यांना ७० हजार ४७१ मते मिळाली होती. २०१९ मध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस अशी आघाडी होती. तर शिवसेना आणि भाजप यांची युती होती. पण, यावेळी तीन-तीन पक्षाच्या दोन आघाड्या झाल्या आहेत.