भरधाव कार चालवणाऱ्याला दिली समज; चालकाने मागून येऊन बाईकस्वाराच्या कुटुंबालाच उडवलं
By ऑनलाइन लोकमत | Published: October 5, 2024 03:45 PM2024-10-05T15:45:03+5:302024-10-05T15:58:59+5:30
लातूरमध्ये गाडी हळू चालवण्याची विनंती करणाऱ्या दुचाकीस्वाराला कार चालकाने धडक दिल्याची घटना घडली.
Latur Accident : राज्यात गेल्या काही दिवसांपासून मद्यपान करुन भरधाव वेगात गाडी चालवल्यामुळे अपघाताच्या घटना समोर आल्या आहेत. लातूरमध्येही एका मद्यपीने बाईकला दिलेल्या धडकेमुळे संपूर्ण कुटुंब उद्धवस्त झालं आहे. गाडी हळू चालव सांगितल्याचा राग आल्याने मद्यपान केलेल्या कार चालकाने रागाच्या भरात बाईकवरुन जाणाऱ्या कुटुंबाला धडक दिली. या धडकेत दोघांचा मृत्यू झाला तर दोघे गंभीर जखमी आहेत. मृतांमध्ये माय लेकीचा समावेश आहे. तर वडील आणि मुलगा गंभीर जखमी असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. पोलिसांनी याप्रकरणी कारमधील पाच जणांना अटक केली आहे.
लातूरच्या औसा तालुक्यात महामार्गावर एका कार चालकाने आधी बेदरकारपणे गाडी चालवून बाईकवरुन जाणाऱ्या कुटुंबाला जोरदार धडक दिली. बाईक चालकाने वेगात कार चालवायला विरोध केला असता कार चालकाने त्याला मागून धडक दिली. त्यामुळे दुचाकीस्वार व त्याचा मुलगा गंभीर जखमी झाले. तर पत्नी आणि मुलाचा मृत्यू झाला. याप्रकरणी पोलिसांनी ५ आरोपींना ताब्यात घेतले आहे.
२९ सप्टेंबर रोजी रात्री आठ वाजता सादिक शेख हे पत्नी व दोन मुलांसह लातूरच्या दिशेने जात होते. त्याचवेळी मागून एक कार येत होती, ज्याचा चालक दारूच्या नशेत गाडी चालवत होता. बेदरकारपणे गाडी चालवत त्याने सादिक शेखला कट मारला आणि पुढे निघून गेला. कार चालक रस्त्यावरील वाहनांना कट मारत, शिवीगाळ करत, आरडाओरडा करत कार वेडीवाकडी चालवत होता. यावेळी सादिक शेख यांनी कारलाचकाला गाठलं आणि थोडं सांभाळून कार चालवा असं सांगितलं. यावेळी सादिक यांची कारमधील चार-पाच जणांसोबत बाचाबाची झाली.
यानंतर कार चालकाने सादिक यांना पुढे जाऊ दिले आणि स्वत: काही वेळ महामार्गावर उभा राहिला. सादिक महामार्गावरून काही अंतरावर गेला असता मागून रागाच्या भरात आलेल्या चारचाकी चालकाने सादिक यांच्या बाईकला जोरदार धडक दिली. त्यामुळे सादिक यांची पत्नी इकरा शेख आणि ६ वर्षांची मुलगी नादिया शेख यांचा मृत्यू झाला. तर सादिक आणि त्यांचा मुलगा अहाद शेख जखमी झाले.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून जखमी सादिक आणि मुलाला रुग्णालयात दाखल केले. तर सादिकच्या पत्नीचा आणि मुलीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. याबाबत माहिती देताना औसा शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुनील राजितवाड यांनी सांगितले की, ही घटना २९ सप्टेंबर रोजी रात्री ८ वाजताच्या सुमारास घडली. या घटनेनंतर तपास करत असताना आम्ही चारचाकी वाहनातून प्रवास करणाऱ्या दिगंबर पाटोळे, कृष्णा वाघे, बसवराज धोत्रे, मनोज माने, मुदामे या ५ आरोपींविरुद्ध औसा शहर पोलीस ठाण्यात एफआयआर नोंदवला आहे.