पावसाळा लांबला तरच लातूरला रेल्वेने पाणी
By admin | Published: March 29, 2016 09:06 PM2016-03-29T21:06:04+5:302016-03-29T21:06:04+5:30
लातूरवासीयांची तहान भागवण्यासाठी रेल्वेने पाणी आणण्याचा विचार केला जात आहे. परंतु उपलब्ध होत असणाऱ्या पाण्याचे काटेकोर नियोजन केल्याने ते जून अखेरपर्यंत पुरू शकते.
उपलब्ध साठा जूनअखेर पुरवणार : वितरणाचे काटेकोर नियोजन
लातूर : लातूरवासीयांची तहान भागवण्यासाठी रेल्वेने पाणी आणण्याचा विचार केला जात आहे. परंतु उपलब्ध होत असणाऱ्या पाण्याचे काटेकोर नियोजन केल्याने ते जून अखेरपर्यंत पुरू शकते. त्यामुळे पावसाळा लांबला तरच उजनी प्रकल्पातील पाणी रेल्वेने आणावे लागेल. तसा प्रस्ताव राज्य सरकारला पाठविल्याचे जिल्हाधिकारी पांडुरंग पोले यांनी सांगितले़
लातूर शहरासह जिल्ह्यात तीव्र पाणीटंचाई आहे़ त्यावर मात करण्यासाठी १ हजारपेक्षा अधिक विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे़ शिवाय, २६५ टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे़ सद्य स्थितीत भंडारवाडी, निम्न तेरणा, डोंगरगाव व धनेगाव बॅरेजेसमध्ये पाणी उपलब्ध आहे़ तेथील स्थानिक लोकांची गरज, प्रकल्पातील गाळ, बाष्पीभवनामुळे होणारी पाण्याची घट हे सर्व मुद्दे लक्षात घेतल्यासही जून अखेरपर्यंत लातूर शहराला पाणी पुरु शकते़ त्यानुसार नियोजन करण्यात आले आहे़ मांजरा, साई, नागझरी प्रकल्पामध्ये चर खोदण्यात येत असून त्याद्वारेही पाणी मिळविण्याचा प्रयत्न केला जात आहे. टंचाईचा तीव्र काळ फेबु्रवारी, मार्च होता़ उपाययोजना केल्यानंतर त्याची तीव्रता कमी झाली आहे़ उपलब्ध पाण्याचे सुक्ष्म नियोजन केल्याने पाऊस वेळेवर पडल्यास संकट टळेल आणि रेल्वेने पाणीपुरवठा करण्याची वेळ येणार नाही, असेही पोले यांनी सांगितले.
रेल्वे वाहतुकीसाठी १८ तासांचा कालावधी
लातूर-बार्शी-कुर्डूवाडी-पंढरपूरहून किमान ३० ते ३५ हजार लिटर क्षमतेचे १५ ते २० टँकर (वाघिणी) जोडून ते पाणी लातूरला आणण्याचा हा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन आहे़ एका खेपेत ७ ते ८ लाख लिटर्स पाणी आणण्याचा हा प्रस्ताव असून, या प्रक्रियेला किमान १८ तासांचा कालावधी लागेल़ या कालावधीत रेल्वे ट्रॅक कुठला रिकामा राहू शकतो किंवा कोणता ट्रॅक सोयीचा आहे, याबाबतचा विचार शासन पातळीवर सुरु आहे़
- पांडुरंग पोले, जिल्हाधिकारी-लातूर