गायकवाड आडनावामुळे लातूरच्या खासदाराला विमानप्रवासात कटकटी
By Admin | Published: March 30, 2017 06:17 PM2017-03-30T18:17:04+5:302017-03-30T18:17:16+5:30
रवींद्र गायकवाड यांच्यावर प्रवास बंदी घातल्यानंतर त्याचा नाहक फटका लातूरचे खासदार डॉ. सुनील गायकवाड यांना बसतो आहे.
ऑनलाइन लोकमत
लातूर, दि. 30 - विमान कंपन्यांनी उस्मानाबादचे खासदार रवींद्र गायकवाड यांच्यावर प्रवास बंदी घातल्यानंतर त्याचा नाहक फटका लातूरचे खासदार डॉ. सुनील गायकवाड यांना बसतो आहे. रवींद्र गायकवाड विमानात घुसण्याच्या भीतीने त्रस्त झालेल्या विमान कंपन्यांचे कर्मचारी खासदार गायकवाड म्हटले की लातूरच्या खासदारांना चौकशीच्या फेऱ्यात अडकवित आहेत. हे ते तर गायकवाड नाहीत ना ? अशी शंका विमानाचे तिकीट बुक करणाऱ्यांपासून ते कर्मचारी आणि सुरक्षारक्षकांपर्यंत साऱ्यांचाच चौकशीचा ससेमिरा मागे लागला आहे. या विनाकारण चौकशीचा वैताग आला आहे, अशा शब्दात खा. सुनील गायकवाड यांनी आपल्या प्रतिक्रिया लोकमतशी बोलताना दिल्या.
उस्मानाबादच्या खासदार गायकवाडांनी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्यांना चपलेने मारहाण केल्यानंतर त्यांचा विमान प्रवासावर बंदी आली. ते सुरुवातीला रेल्वेने आणि आता बाय रोड प्रवासाला प्राधान्य देताहेत. मात्र त्यांचे आडनाव धारण केलेल्या लातूरच्या खासदार सुनील गायकवाडांना विमान प्रवास करताना गायकवाड आडनावाचा फटका बसतो आहे. तिकीट बुक करताना हे आडनाव ऐकले की बुकिंगवालेच कोणते गायकवाड? सुरुवातीचे नाव काय? काय करता? अशा प्रश्नांची सरबत्ती करीत आहेत. विमान कंपन्यांचे अधिकारीच काय तर सुरक्षारक्षकही त्यांना प्रश्न विचारून भंडावून सोडत आहेत.
विमानतळावर गेले की मला गायकवाड आडनावामुळे सारे शंकेने पाहात आहेत. तिकीट बुक करताना हाच अनुभव येतो. कोणते गायकवाड? तुमचा व्यवसाय काय? तुम्हीसुद्धा खासदार आहात का? कुठले खासदार आहात? असे नाहक प्रश्न विचारले जातात. बोर्डिंग पास घेतानाही तेच. वा विमानतळावर गेल्यापासून ते विमानात बसेपर्यंतचे सर्व सुरक्षारक्षक माझ्या गायकवाड असण्यावर नको त्या चौकशा करतात. चौकशीच्या नावाखाली विनाकारण थांबवून ठेवले जाते. उभे केले जाते. खिशातले सर्व साहित्य बाहेर काढून तो गायकवाड मी नाही हे समाजावून सांगावे लागते. मी तर काही गुन्हा केला नाही ? मग मला अशी वागणूक का ?, असा सवालही खासदार सुनील गायकवाड यांनी उपस्थित केला आहे.