लातूर-निलंगा रस्त्यावर पुन्हा अपघात; ३ ठार, ८ गंभीर
By ऑनलाइन लोकमत | Published: December 2, 2017 02:05 AM2017-12-02T02:05:08+5:302017-12-02T02:05:35+5:30
लातूर-निलंगा रस्त्यावर शुक्रवारी रात्री ११़५० वाजता एस़टी़ व ट्रकचा अपघात झाला़ यात तिघेजण जागीच ठार झाले असून, ८ जण गंभीर जखमी आहेत. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.
लातूर - लातूर-निलंगा रस्त्यावर शुक्रवारी रात्री ११़५० वाजता एस़टी़ व ट्रकचा अपघात झाला़ यात तिघेजण जागीच ठार झाले असून, ८ जण गंभीर जखमी आहेत. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.
गेल्या १५ दिवसांत एकाच रस्त्यावर झालेला हा तिसरा अपघात आहे़ शुक्रवारी रात्री ११़१० वाजता लातूर-हैदराबाद जाणारी एस़टी़ लातूर बसस्थानकावरून निघाली़ औशाच्या पुढे आल्यानंतर चलबुर्गा पाटीजवळ ११़५० च्या सुमारास एस़टी़ क्ऱ एमएच २०, ३५८७ व ट्रक क्रमांक एपी २४ व्ही ८८३८ यांची धडक झाली़ यामध्ये अंकिता अमित भोज (३३ रा. दापका वेस, निलंगा) यांच्यासह तिघेजण ठार झाले असून, दोघांची नावे कळू शकली नाहीत़ तर जखमींमध्ये अमित भोज गंभीर असून, दीपक गुंडेवार नाईक, दीपाली दीपक नाईक, गिरीश गुंडेवार नाईक, नागनाथ कलप्पा हंसराळे यांच्यासह काही जण किरकोळ जखमी आहेत. त्यांना लातूरहून येणारे ईश्वर पाटील यांनी आपल्या वाहनातून निलंगा येथे उपचारासाठी आणले. तसेच अन्य जखमींना लातूरच्या सर्वोपचार रुग्णालयात हलविले आहे. घटनास्थळी किल्लारीचे सपोनि भोसले तातडीने पोहोचले. लातूर ते निलंगा या रस्त्यावर हा तिसरा मोठा अपघात आहे़ १८ नोव्हेंबर २०१७ रोजी एस़टी़-ट्रकच्या अपघातात ७ जण जागीच ठार झाले होते़ तर २६ नोव्हेंबर रोजी याच परिसरात झालेल्या कार अपघातात तिघे ठार झाले होते़
जम्पिंग रस्ता...
अपघात प्रवण क्षेत्र बनलेल्या औसा ते निलंगा दरम्यान, अनेक ठिकाणी हा रस्ता जम्पिंग आहे़ त्यामुळे नियमित किरकोळ अपघात होतात़ दरम्यान, गेल्या १५ दिवसातील तिसरा मोठा अपघात आहे़