लातूरमध्ये ५० लाखांपैकी केवळ २५ लाख लीटर पाणीपुरवठा

By Admin | Published: April 20, 2016 05:48 AM2016-04-20T05:48:54+5:302016-04-20T05:48:54+5:30

पाण्याचे अभूतपूर्व संकट उभे राहिल्यानंतर लातूरला रेल्वेसह इतर यंत्रणांद्वारे झालेल्या पुरवठ्यामुळे दररोज सुमारे ५० लाख लीटर पाणी उपलब्ध होते.

In Latur, only 25 lakh liters of water supply from 50 lakhs | लातूरमध्ये ५० लाखांपैकी केवळ २५ लाख लीटर पाणीपुरवठा

लातूरमध्ये ५० लाखांपैकी केवळ २५ लाख लीटर पाणीपुरवठा

googlenewsNext

लातूर : पाण्याचे अभूतपूर्व संकट उभे राहिल्यानंतर लातूरला रेल्वेसह इतर यंत्रणांद्वारे झालेल्या पुरवठ्यामुळे दररोज सुमारे ५० लाख लीटर पाणी उपलब्ध होते. मात्र त्यातील निम्मे म्हणजे केवळ २५ लाख लीटर पाणी वाटप होत असल्याचे वास्तव ‘लोकमत’ने मिळविलेल्या माहितीतून उघड झाले आहे. त्यामुळे उर्वरित पाणी जाते कुठे, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
शहरासाठी रेल्वेने मिरजहून दररोज साधारण ५ लाख लीटर पाणी येते. शिवाय निम्न तेरणा प्रकल्पातून १२ लाख, डोंगरगाव बॅरेजेसमधून ३० लाख आणि साई ट्रेंचमधून ३ लाख लीटर असे रोज ५० लाख लीटर पाणी संकलित केले जाते़ प्रतिकुटुंब २०० लीटर याप्रमाणे लातूरकरांना दररोज २५ लाख लीटर पाणी पुरविले जाते.
महापालिकेच्या दप्तरात ९० हजार घरांची नोंद आहे. भाडेकरूंसह एकूण कुटुंब संख्या १ लाख २० हजार आहे़ त्यांना आठ दिवसांना २०० लीटरप्रमाणे टँकरद्वारे पाणीपुरवठा केल्याचे पालिकेचे म्हणणे ग्राह्य धरल्यास दररोज २५ लाख लीटर पाण्याचे वितरण होते़ शहरात एकूण ३५ प्रभाग आहेत़ प्रत्येक प्रभागाला २ टँकर आहेत़ स्थानिक स्रोतातून तसेच रेल्वेचे पाणी उचलण्यासाठी २० हजार व १२ हजार लीटर क्षमतेचे ६० टँकर आहेत़ ६ हजार लीटर क्षमतेच्या ७० टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे़ आठ दिवसांना २०० लीटर पाणी पुरत नाही, अशी ओरड नागरिकांतून होत आहे़ शिवाय पाणी वितरणामध्ये दुजाभाव होत असल्याचाही आरोप होत असून, आठ दिवसांऐवजी पाच दिवसांनी पाणी द्यावे, अशी मागणी जोर धरू लागली आहे़ (लोकमत न्यूज नेटवर्क)
>पालिकेकडे पाणीवाटपाची प्रभागनिहाय नोंद आहे. तेथील चार नागरिकांच्या स्वाक्षऱ्या घेतल्या जातात. नियमानुसार सर्वांनाच २०० लीटर पाणी दिले जात आहे. तक्रार असल्यास चौकशीही केली जाते. अधिकचे पाणी देण्याची मागणी आहे. त्यावर निर्णय झालेला नाही.
- सुधाकर तेलंग, आयुक्त
शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी ४५ ते ५० लाख लीटर पाणी संकलित केले जाते़ तेवढेच पाणी नागरिकांना वितरित केले जाते़ ७० टँकरद्वारे ६ हजार लीटर क्षमतेच्या एका टँकरच्या सहापेक्षा अधिक फेऱ्या होतात़ शिवाय टँकर भरणा केंद्रातूनही नागरिक पाणी घेऊन जातात़ दिवसाला वितरण केवळ २५ लाख लीटर नसून ४५ ते ५० लाख लीटर होते.
- कमलाकर फड, उपजिल्हाधिकारी

Web Title: In Latur, only 25 lakh liters of water supply from 50 lakhs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.