लातूरमध्ये प्रशिक्षणार्थी डॉक्टरला विषबाधा!
By admin | Published: August 10, 2015 12:38 AM2015-08-10T00:38:12+5:302015-08-10T00:38:12+5:30
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयातील पदव्युत्तर तृतीय वर्षातील प्रशिक्षणार्थी डॉक्टर शुक्रवारी रात्री स्वच्छतागृहात बेशुद्ध अवस्थेत पडल्याचे दिसून आले़
लातूर : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयातील पदव्युत्तर तृतीय वर्षातील प्रशिक्षणार्थी डॉक्टर शुक्रवारी रात्री स्वच्छतागृहात बेशुद्ध अवस्थेत पडल्याचे दिसून आले़ या डॉक्टरची प्रकृती चिंताजनक असून अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत़ त्याला विषबाधा झाल्याने त्याची प्रकृती बिघडल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे़ मात्र याबाबत निश्चित कारण समजू शकले नाही़
अनुप गावंडे (२९, रा़नागपूर) असे या प्रशिक्षणार्थी डॉक्टरचे नाव आहे. शुक्रवारी रात्री १० वाजेपर्यंत प्रसूती विभागात काम करून आपल्या वसतिगृहाच्या खोलीकडे तो गेला. त्यानंतर रात्री १०़३०च्या सुमारास वसतिगृहाच्या स्वच्छतागृहात तो बेशुद्ध अवस्थेत पडल्याचे निदर्शनास आले़ त्याला तत्काळ उपचारासाठी सर्वोपचार रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले़ त्याची प्रकृती चिंताजनक असल्याने त्याला व्हेन्टीलेटरवर ठेवण्यात आले आहेत़ तो कशामुळे बेशुद्ध पडला, यामागचे कारण स्पष्ट झालेले नसल्याने आम्ही या घटनेकडे विषबाधा म्हणून बघत आहोत, असे अधिष्ठाता डॉ़ अनमोड म्हणाले.