लातूरला पाणी पोहोचवण्याचे बिल चार कोटी
By admin | Published: May 12, 2016 05:57 PM2016-05-12T17:57:55+5:302016-05-12T18:20:32+5:30
दुष्काळग्रस्त लातूरला पाणी पोहोचवण्यासाठी रेल्वेने चार कोटी रुपयांचे बिल आकारले आहे. महिन्याभरापूर्वी रेल्वेने पहिल्यांदा पाणी एक्सप्रेसने पाणी लातूरला पोहोचवले.
Next
ऑनलाइन लोकमत
लातूर, दि. १२ - दुष्काळग्रस्त लातूरला पाणी पोहोचवण्यासाठी रेल्वेने चार कोटी रुपयांचे बिल आकारले आहे. महिन्याभरापूर्वी रेल्वेने पहिल्यांदा पाणी एक्सप्रेसने पाणी लातूरला पोहोचवले. रेल्वेने आतापर्यंत ६.२० कोटी लिटर पाणी दुष्काळग्रस्त लातूरला पोहोचवले आहे. पाण्याच्या वाहूतक खर्चापोटी रेल्वेने चार कोटींचे बिल जिल्हाधिका-यांना पाठवले आहे.
प्रशासनाच्या विनंतीवरुन आम्ही लातूर जिल्हाधिका-यांना हे बिल पाठवले असे मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक एस.के.सूद यांनी सांगितले. पश्चिम महाराष्ट्रातील मिरज येथे पाणी भरल्यानंतर ११ एप्रिलला पहिली पाणी एक्सप्रेस लातूरला रवाना झाली. १२ एप्रिलच्या मध्यरात्री ट्रेन लातूरमध्ये दाखल झाली.
मिरज ते लातूर एकूण अंतर ३४२ कि.मी.चे होते. लातूरला पाणी पोहोचवण्यासाठी खास राजस्थान कोटा येथून ट्रेन मागवण्यात आली होती. सुरुवातीला पाणी एक्सप्रेसला १० डब्बे जोडलेले होते. प्रत्येक डब्ब्यामध्ये ५० हजार लिटर पाणी साठवण्याची क्षमता होती. त्यामुळे पहिल्या काही फे-यांमध्ये प्रत्येकवेळी पाच लाख लिटर पाणी लातूरला पोहोचवण्यात आले.
लातूर शहराची लोकसंख्या चार लाखापेक्षा जास्त आहे. ग्रामीण भागातील ९४३ गावांमध्ये १८ लाख लोकसंख्या आहे. अपु-या पावसामुळे लातूरमध्ये जलाशय, धरणे, नद्या आणि विहीरी आटल्या आहेत.
कसे पाणी पोहोचवले जायचे
पाणी एक्सप्रेस जिथे थांबायची तिथून पाच ते सात कि.मी.च्या अंतरावरील एका मोठी विहीर जिल्हा प्रशासनाने ताब्यात घेतली होती. ट्रेनमधून पाणी विहीरीपर्यंत पोहोचवण्यासाठी पाईपलाईनची व्यवस्था करण्यात आली होती. विहीरीमध्ये जमा होणारे पाणी तहानलेल्या भागांपर्यंत पोहोचवण्यासाठी लातूर प्रशासनाने ७० टॅंकरची व्यवस्था केली होती. या सर्व टॅंकरची मिळून एकूण २२ हजार लिटर पाणी वाहून नेण्याची क्षमता होती.