दूधना प्रकल्पातून लातूरला पाणी?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2016 05:02 AM2016-04-21T05:02:54+5:302016-04-21T05:02:54+5:30

भीषण पाणीटंचाईशी सामना करणाऱ्या लातूर शहराला परभणी जिल्ह्यातील दूधना (ता. सेलू) प्रकल्पातून रेल्वेद्वारे पाणीपुरवठा करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.

Latur water from Milk Project? | दूधना प्रकल्पातून लातूरला पाणी?

दूधना प्रकल्पातून लातूरला पाणी?

googlenewsNext

मोहन बोराडे,  सेलू (जि. परभणी)
भीषण पाणीटंचाईशी सामना करणाऱ्या लातूर शहराला परभणी जिल्ह्यातील दूधना (ता. सेलू) प्रकल्पातून रेल्वेद्वारे पाणीपुरवठा करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. या अनुषंगाने परभणीचे जिल्हाधिकारी राहुल रंजन महिवाल यांनी बुधवारी धरण परिसराची पाहणी केली़
लातूर शहराला सध्या मिरज येथून रेल्वेने पाणीपुरवठा केला जात आहे़ आता दूधना प्रकल्पातून रेल्वेद्वारे लातूरला पाणी देता येईल का, यासंदर्भात चाचपणी करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाला देण्यात आले आहेत. त्यानुसार जिल्हाधिकारी महिवाल, उपविभागीय अधिकारी पांडुरंग बोरगावकर, दूधना प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता पांडे यांनी बुधवारी दूधना धरण परिसरात जाऊन पाहणी केली़
याबाबतचा अहवाल राज्य शासनाला सादर केला जाणार आहे़ त्यानंतर अंतिम निर्णय होईल, अशी माहिती सेलुचे उपविभागीय अधिकारी पांडुरंग बोरगावकर यांनी दिली.
तब्बल वर्षभर लातूरला पाणी पुरविण्याची क्षमता या प्रकल्पात असून एका रेल्वेने २७ लाख लिटर पाणी लातूरला देणे शक्य आहे. दररोज रात्री एक आणि दिवसा एक अशा दोन गाड्या पाठविल्या जाऊ शकतात, असे पाणी पुरवठा व स्वच्छतामंत्री बबनराव लोणीकर म्हणाले. (प्रतिनिधी)
दूधना धरणाजवळ सातोना (जि.जालना) हे पाच किलो मीटरवर रेल्वेस्थानक आहे. सेलू शहराला पाणीपुरवठा करणारी पाईपलाईन रेल्वे स्टेशनपासून अवघ्या ४०० ते ५०० मीटर अंतरापर्यंत आहे़ येथून तात्पुरती पाईपलाईन टाकून बोगींमध्ये पाणी भरता येऊ शकते़ रेल्वे महाराष्ट्र शासनाकडून पाणीपुरवठ्यासाठी पैसा घेणार नसेल तरी यासाठी लागणारा खर्च कमी होणार आहे़दूधनातून पाणी देण्यास काहीही हरकत नाही़ जेथून पाणी देण्यासाठी सोपे जाईल ते सातोना हे ठिकाण जालना जिल्ह्यात येते़ त्यामुळे तेथील जिल्हाधिकारीही या संदर्भात पाहणी करणार आहेत़ याबाबत अहवाल देऊन योग्य तो निर्णय घेतला जाईल.
- राहुल महिवाल,
जिल्हाधिकारी, परभणीच्दूधना प्रकल्पाची एकूण क्षमता ३४४़८० दलघमी असून, सद्यस्थितीत धरणात एकूण १४३ दलघमी म्हणजेच ४१ टक्के साठा आहे़ १६ टक्के उपयुक्त साठा असून या धरणातून सेलू, परतूर या दोन शहरांना तसेच आठ गावांना पाणीपुरवठा होतो़
> कोयना-चांदोलीतून कर्नाटकला पुरवठा
मिरज : कर्नाटकात तीव्र पाणी टंचाई निर्माण झाल्याने कोयना व वारणा (चांदोली) धरणांतून एक टीएमसी पाणी कर्नाटकला सोडण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. येत्या चार दिवसांत कर्नाटकसाठी पाणी सोडण्यात येणार असून याबाबत चिक्कोडी (जि. बेळगाव) येथे बुधवारी बैठक झाली. कर्नाटक पाटबंधारे विभागाचे मुख्य अभियंता व पुणे पाटबंधारे विभागाच्या मुख्य अभियंत्यांची गुरुवारी सांगलीत बैठक होणार आहे.
शिरोळ येथील राजापूर बंधाऱ्यापासून कर्नाटकातील कृष्णा नदीचे पात्र गेले दोन महिने कोरडे पडले आहे. नदीपात्रात खडखडाट असल्याने कर्नाटकातील उगार, कुडची, अंकलीपासून हिप्परगी धरणापर्यंत नदीकाठच्या गावांत पाणीटंचाई निर्माण झाली
आहे. नदीकाठावरील गावांतील नळपाणी योजना बंद पडल्या
आहेत. जमखंडीजवळ हिप्परगी धरणातील पाणीसाठाही संपला आहे. त्यामुळे कर्नाटक शासनाने फेब्रुवारीपासून तीन टीएमसी पाणी सोडण्याची मागणी केली आहे. परंतु राज्य शासनाने एक टीएमसी पाणी सोडण्यास मान्यता दिली आहे. त्याबदल्यात कर्नाटकातील सिंचन योजनेतून जत व अक्कलकोट येथे कालव्याद्वारे पाणीपुरवठा करण्यात येणार आहे.
चिक्कोडी येथे महाराष्ट्र व कर्नाटकातील पाटबंधारे अधिकाऱ्यांची बैठक होऊन, पाण्याच्या देवाण-घेवाणीच्या नियोजनाबाबत चर्चा झाली. वारणा, कोयना, धोम, उरमोडी, बलवडी या धरणांतून कर्नाटकसाठी पाणी सोडण्यात येणार आहे. मात्र कर्नाटकातील बंधाऱ्यात अपुरे पाणी असल्याने, सोडलेले पाणी राजापूर बंधाऱ्यापासून अथणीपर्यंत सुमारे ६० किलोमीटर पोहोचण्यासाठी प्रतिसेकंद एक हजार क्युसेक्स वेगाने पाणी सोडावे लागणार आहे. या संदर्भातील आराखडा गुरुवारच्या बैठकीत निश्चित करण्यात येणार आहे. (वार्ताहर)
> कोयना धरणात ३२ व वारणा धरणात १५ टीएमसी पाणीसाठा शिल्लक असल्यामुळे केवळ पिण्यासाठी कर्नाटकाला पाणी देण्यात येणार आहे. या पाण्याचा शेतीसाठी वापर करण्यास प्रतिबंध सूचना देण्यात आल्या आहेत. कर्नाटकला एक टीएमसी पाणी पोहोचण्यासाठी वारणा-कोयना धरणांसह वेगवेगळ्या धरणांतून १.३३ टीएमसी पाणी सोडावे लागणार आहे.
एक टीएमसी पाण्याची सुमारे साडेचार कोटी पाणी बिल आकारणी होणार असून कर्नाटकातून जत व अक्कलकोट येथे पुरवठा केलेल्या पाणी आकारणीच्या बिलाच्या रकमेतून कपात करण्यात येईल, असे पाटबंधारे अधिकाऱ्यांनी सांगितले. ]
पाण्याविना वानराचा तडफडून मृत्यू
केज (जि. बीड) : पाण्यासाठी व्याकुळ झालेल्या वानराचा झाडावरून पडून तडफडून मृत्यू झाला. ही घटना केज तालुक्यातील कोठी येथे बुधवारी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास घडली. ग्रामस्थांनी एकत्र येत या वानरावर अंत्यसंस्कार केले.

Web Title: Latur water from Milk Project?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.