पिण्याच्या पाण्यासाठी लातूरकर आले एकत्र
By admin | Published: April 12, 2016 01:51 AM2016-04-12T01:51:32+5:302016-04-12T01:51:32+5:30
अभूतपूर्व पाणीटंचाईवर कायमस्वरूपी मात करण्यासाठी लातूरमधील मंडळी एकत्र आली आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे डॉ. अशोक कुकडे, काँग्रेसचे अॅड. त्र्यंबक झंवर, समाजवादी चळवळीचे
लातूर : अभूतपूर्व पाणीटंचाईवर कायमस्वरूपी मात करण्यासाठी लातूरमधील मंडळी एकत्र आली आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे डॉ. अशोक कुकडे, काँग्रेसचे अॅड. त्र्यंबक झंवर, समाजवादी चळवळीचे ज्येष्ठ कार्यकर्ते अॅड. मनोहर गोमारे आणि साखर कारखानदार व यशस्वी उद्योजक बी. बी. ठोंबरे या सर्वांनी ‘जलयुक्त लातूर’ची हाक दिली आणि बघता-बघता मांजरा नदीच्या खोलीकरणासाठी केवळ सहा दिवसांत तीन कोटी रुपयाचा निधी उभा राहिला.
सरकार करेल तेव्हा करेल, पण आपण आपले काम केले पाहिजे या विचाराने प्रेरित श्री. श्री. परिवाराच्या कार्यकर्त्यांनी हाक दिली. त्यांनी एक समविचारी मंडळाचे पॅनल केले. त्यात सर्वच पक्ष आणि कार्यकर्त्यांची सांगड घातली. मांजरा नदीवरील साई बंधारा-नागझरी बंधारा ते सारसा पोहरेगाव बंधाऱ्यापर्यंत खोलीकरणास सुरुवात झाली आहे. या लोकचळवळीसाठी सात कोटींचा खर्च अपेक्षित असताना अवघ्या आठवडाभरात तीन कोटी निधी लोकसहभागातून जमा झाला आहे. विशेष म्हणजे उद्घाटन झालेल्या गुढीपाडव्याच्या दिवशीच लोकांनी दोन कोटी रुपये दिले. मांजरा नदीमध्ये एकूण २८ बॅरजेस आहेत. त्यातील साई आणि नागझरी या दोन ठिकाणांहून लातूर शहराला पाणीपुरवठा होतो. या दोन्ही बंधाऱ्यात पाणी थांबते ते पात्र १८ किलोमीटरचे आहे. याचे खोलीकरण आणि रुंदीकरण करून ४३ लाख घनमीटर गाळ बाहेर काढण्यात येणार आहे.
आधी पाणी, मग विचारधारा
आम्ही सर्व सहकारी वेगवेगळ्या विचाराधारांचे आहोत, ही बाब खरी आहे. पण सामान्य लातूरकरांची पाणी ही गरज पहिली आहे, विचारधारा नंतर.
- अॅड. त्र्यंबक झंवर
सर्वांनीच दिले पैसे
लातुरातील पाणीटंचाईवर मात करण्यासाठी हॉटेलवाल्यांपासून ते उद्योजकांपर्यंत सर्वजण सरसावले आहेत़ त्यामुळे जलयुक्त लातूर या उपक्रमासाठी दिवसेंदिवस निधी वाढत आहे़. - अॅड़ मनोहरराव गोमारे