‘जलपरी’ला लातूरकरांचा निरोप
By Admin | Published: August 9, 2016 03:57 PM2016-08-09T15:57:13+5:302016-08-09T19:47:12+5:30
लातुरातील अभूतपूर्व पाणीटंचाईवर मात करण्यासाठी मिरजहून जलपरीच्या माध्यमातून लातूरकरांची तहान भागविण्यासाठी दररोज येणाºया जलपरीला लातूरकरांनी मंगळवारी
>ऑनलाइन लोकमत
लातूर, दि. 8 - लातुरातील अभूतपूर्व पाणीटंचाईवर मात करण्यासाठी मिरजहून जलपरीच्या माध्यमातून लातूरकरांची तहान भागविण्यासाठी दररोज येणाºया जलपरीला लातूरकरांनी मंगळवारी सकाळी भावपूर्ण निरोप दिला. यानिमित्त ‘जलपरी’च्या चालकांसह रेल्वे प्रशासनातील अधिका-यांचा सत्कार करून लातूरकरांनी कृतज्ञता व्यक्त केली.
या कृतज्ञता सोहळ्याच्या अध्यक्षपदी जिल्हाधिकारी पांडुरंग पोले, तर प्रमुख उपस्थिती महापौर अॅड. दीपक सूळ, आयुक्त सुधाकर तेलंग, उपमहापौर चाँदपाशा घावटी, चंद्रकांत चिकटे, एस.आर. देशमुख, विक्रांत गोजमगुंडे, रविशंकर जाधव, मोईज शेख यांची होती. जिल्हाधिकाºयांच्या हस्ते रेल्वे चालक, सुरक्षा रक्षक आणि इतर कर्मचाºयांचा यावेळी शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. जलपरीला निरोप देण्यासाठी विविध पक्षांसह सामाजिक संघटनेचे पदाधिकारी आणि नागरिकांची उपस्थिती होती. जलपरीला फुलांनी सजविण्यात आले होते. आज जलपरीची १११ वी फेरी होती. यातून २५ कोटी ७० लाख लिटर पाणीपुरवठा रेल्वेच्या माध्यमातून करण्यात आला. १२ एप्रिलला ‘जलपरी’ची पहिली फेरी लातूर रेल्वेस्थानकावर झाली. १२ ते २२ एप्रिल दरम्यान ५ लाख लिटर पाणीपुरवठा करण्यात आला. त्यानंतर २३ एप्रिल ते ९ आॅगस्ट या कालावधीत दर खेपेला २५ लाख लिटर पाणीपुरवठा करण्यात आला.
साडेतीन महिने पुरेल एवढे पाणी...
टंचाईवर मात करण्याइतपत अद्यापही धरण क्षेत्रात पाणी उपलब्ध नाही. मात्र गेल्या आठवडाभरात पडलेल्या पावसामुळे तीन ते साडेतीन महिने पुरेल एवढे पाणी जमा झाले आहे. भविष्यात पाऊस पडला तर जलपरीची गरज भासणार नाही. यासाठी लातूरकरांनी पाण्याचा जपून वापर करावा, असे आवाहन मनपा आयुक्त तेलंग यांनी केले आहे.
सहकार्यामुळे संकटावर मात...
लातूर शहरात निर्माण झालेल्या भीषण पाणीटंचाईवर मात करण्यासाठी राज्य सरकार आणि रेल्वे मंत्रालयाने केलेले सहकार्य अनमोल आहेत. लातूरला रेल्वेद्वारे पाणीपुरवठा करण्यासंदर्भात तातडीने निर्णय घेऊन यासाठी लागणारी यंत्रणा उभारण्याचे आदेश प्रशासनाला मिळाले आणि सर्व विभाग आणि रेल्वे प्रशासनासह लातूरकरांच्या सहकार्यामुळे या पाणीटंचाईवर चार महिन्यांमध्ये मात करता आली, असे मत जिल्हाधिकारी पांडुरंग पोले यांनी अध्यक्षपदावरून बोलताना व्यक्त केले.
यांचा झाला गौरव...
लातूरकरांची तहान भागविण्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावणाºया विविध विभागांतील अधिकारी, कर्मचाºयांचा यावेळी गौरव करण्यात आला. यामध्ये लोको पायलट अशोककुमार, सुरक्षा गार्ड ए.आर. शेख, नाईक, गोपाल पाटील, अमोल कांबळे, स्टेशन प्रबंधक घाडगे, मुख्य वाणिज्य निरीक्षक रमेश काळे, मेकॅनिकल इंजिनिअर औसेकर, वाहतूक निरीक्षक मिश्रा, माल पर्यवेक्षक आर.एस. ओव्हळ, वाघमारे, जावेद शेख, श्रीकांत रंगनाथन, निजाम शेख, प्रगती कन्स्ट्रक्शनचे गोविंद माकणे आदींचा मनपाच्या वतीने सत्कार करण्यात आला.