शास्त्रीय संगीत तुटल्याचे दु:ख वाटते - लता मंगेशकर

By admin | Published: May 12, 2017 10:12 PM2017-05-12T22:12:51+5:302017-05-12T22:14:45+5:30

शास्त्रीय संगीताचे प्रशिक्षण घेतल्यानंतर चित्रपटातील गाणी गायल्याने शास्त्रीय संगीत तुटल्याची खंत प्रख्यात पार्श्वगायिका, गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांनी व्यक्त केली.

Laughter of classical music seems sad - Lata Mangeshkar | शास्त्रीय संगीत तुटल्याचे दु:ख वाटते - लता मंगेशकर

शास्त्रीय संगीत तुटल्याचे दु:ख वाटते - लता मंगेशकर

Next

ऑनलाइन लोकमत 

मुंबई, दि. 12 -  शास्त्रीय संगीताचे प्रशिक्षण घेतल्यानंतर चित्रपटातील गाणी गायल्याने शास्त्रीय संगीत तुटल्याची खंत प्रख्यात पार्श्वगायिका, गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांनी व्यक्त केली. गुरूकुल पद्धतीने शिष्यांना प्रशिक्षण देण्यासाठी पुण्याच्या विश्वशांती संगीत कला अकादमीचे उद्घाटन त्यांच्याहस्ते प्रभुकुंज या त्यांच्या निवासस्थानी गुरूवारी झाले. त्यावेळी त्यांनी या भावना व्यक्त केल्या. लतादीदी गुरुकुल अकादमीच्या अध्यक्षा आहेत. 
 
लतादीदी म्हणाल्या की, या अकादमीच्या माध्यमातून शास्त्रीय संगीताची सेवा करण्याची संधी पुन्हा मिळणार आहे. याठिकाणी प्रत्येक गुरूने त्याला जे काही येते ते शिष्याला शिकवण्याचा प्रयत्न करावा. तर शिष्यांनीही लहान होऊन जे-जे शिकता येईल, ते सर्व शिकून घ्यावे. देशातील पहिला-वहिला प्रयोग असलेल्या या गुरूकुलमार्फत शास्त्रीय संगीताचा वारसा टिकवण्यासाठी वाट्टेल ते करण्याची तयारी त्यांनी दाखवली. स्वामी विवेकानंद, संत ज्ञानेश्वर आणि देशातील जेवढे संत आहेत, त्यांची मी भक्त असल्याचेही त्यांनी नमूद केले.
 
आपण भारतीय राहावे, हेच भारतीय संस्कृती शिकवते. मात्र संगीताच्या नावावर हल्ली जे काही चालले आहे, ते चुकीचे असल्याची टीकाही त्यांनी केली पृथ्वी गोल असून लोकांसमोर जे येते, त्याचा ते स्वीकार करत असल्याचेही त्यांनी सांगितले.
शास्त्रीय संगीताला गतवैभव प्राप्त करून देण्याचा प्रयत्न अकादमीमार्फत केला जाईल. कमाल १५ शिष्यांना गुरू प्रशिक्षण देतील. प्रशिक्षणार्थ्यांच्या संख्येहून अधिक भर हा त्यांच्यामधील सुप्त गुणांना दिला जाईल. त्यानुसारच त्यांची निवडही केली जाईल, अशी माहिती अकादमीचे संचालक सुरेंद्र मोहिते यांनी दिली. यावेळी एमएईईआर एमआयटी ग्रुप आॅफ इन्सिट्यूशनचे उपाध्यक्ष प्रा. राहुल कराड, अकादमीच्या संचालिका ज्योती ढाकणे, सरचिटणीस आदिनाथ मंगेशकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
 
संगीताचे धडे मोफत देणार!
एकविसावे शतक हे भारतीय संस्कृतीमधील सुवर्णकाळ असेल, असे वक्तव्य स्वामी विवेकानंद यांनी केल्याची आठवण अकादमीचे संस्थापक अध्यक्ष डॉ. विश्वनाथ कराड यांनी करून दिली. ते म्हणाले की, विवेकानंदांचे वाक्य काही अर्थाने पूर्ण करण्याचा प्रयत्न आहे. मात्र आजचा दिवस नक्कीच भारतीय संस्कृतीमध्ये सुवर्ण अक्षराने नोंदवला जाईल. या अकादमीमार्फत मोफत प्रशिक्षण देण्याची घोषणा केली. देशासह विदेशातील ९ ते ३५ वयोगटातील कोणत्याही व्यक्तीला अकादमीच्या प्रवेश प्रक्रियेत सामील होता येईल. संस्थेचे गुरू विद्यार्थ्यांची निवड करतील. प्रशिक्षण पूर्ण करण्याचा कोणताही कालावधी नसून जोपर्यंत गुरूला वाटत नाही, तोपर्यंत प्रशिक्षण सुरू राहील. ग्रेड पद्धतीने शिष्यांना गुण दिले जातील, असेही त्यांनी स्पष्ट केले.
 
विचार सत्यात उतरवले! -चौरसिया
गुरूकुल पद्धतीने शास्त्रीय संगीताचे धडे देण्यासाठी एवढी भव्य वास्तू तयार होईल, असा विचार स्वप्नातही केला नसल्याचे ज्येष्ठ बासरीवादक हरिप्रसाद चौरसिया म्हणाले. मात्र डॉ. कराड यांनी हा विचार सत्यात उतरून दाखवल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
 
दिग्गजांकडून संगीताची सेवा!
या अकादमीमध्ये शास्त्रीय संगीतामधील दिग्गज कलाकार मोफत प्रशिक्षण देणार आहेत. त्यात व्हायोलिनवादक विदुषी डॉ. एन. राजम, बासरीवादक पंडित हरिप्रसाद चौरसिया, सुगम संगीतामधील ज्येष्ठ गायक पंडीत हृदयनाथ मंगेशकर, तालयोगी पंडीत सुरेश तळवळकर, पंडीत उल्हास कशालकर, ज्येष्ठ नृत्यांगना शमाताई भाटे, ज्येष्ठ गायिका देवकी पंडीत, तबलावादक पंडीत योगेश साम्सी, पखवाजवादक पंडीत उद्धवबापू आपेगावकर-शिंदे, ढोलकीवादक पंडीत राजू जवळकर या गुरूंचा समावेश आहे. 
 

Web Title: Laughter of classical music seems sad - Lata Mangeshkar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.