आम्ही 'मनसे' एकत्र आलो; मुख्यमंत्र्यांच्या विधानानंतर शहा, उद्धव ठाकरेंना हसू आवरेना
By ऑनलाइन लोकमत | Published: February 18, 2019 09:20 PM2019-02-18T21:20:23+5:302019-02-18T21:21:48+5:30
मुख्यमंत्र्यांच्या तोंडून मनसे शब्द येताच उपस्थितांमध्ये हशा
मुंबई: गेल्या काही दिवसांपासून शिवसेना-भाजपामध्ये युतीची चर्चा सुरू होती. अखेर आज याबद्दलची घोषणा झाली. युतीच्या अंतिम चर्चेसाठी आज भाजपा अध्यक्ष अमित शहा मुंबईत आले होते. यानंतर त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपा नेत्यांसह चर्चा केली. या चर्चेनंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंसोबत मातोश्रीवर बैठक झाली. या बैठकीच्या सत्रांनंतर दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेत युतीची घोषणा केली. एकमेकांवर सतत टीका करणारे नेते यावेळी एकत्र पाहायला मिळाले. या पत्रकार परिषदेत मनसेचाही उल्लेख झाला.
उद्धव ठाकरे आणि अमित शहांच्या साक्षीनं मुख्यमंत्र्यांनी युतीची घोषणा केली. यावेळी त्यांनी हिंदुत्वाचा मुद्दा उपस्थित केला. महाराष्ट्राच्या आणि देशाच्या राजकारणात २५ वर्षं युती म्हणून आम्ही एकमेकांसोबत काम करतोय. काही मुद्द्यांवर मतभेद झाले असतील, परंतु हिंदुत्व हा मूळ विचार आहे आणि त्यानेच आम्हाला इतकी वर्षं जोडून ठेवलं, असं ते म्हणाले. यावेळी हिंदी पत्रकारांशी संवाद साधताना, हम मनसे आगे बढेंगे, असं मुख्यमंत्री म्हणाले. त्यांच्या तोंडून मनसे हा शब्द बाहेर येताच शेजारी बसलेल्या उद्धव ठाकरे आणि अमित शहांना हसू आवरलं नाही.
मुख्यमंत्र्यांनी मनसे शब्द उचारताच पत्रकारही हसू लागले. त्यानंतर त्यांनी लगेचच हा शब्द उलगडून सांगितला. हमारा मन साफ है, हम साफ मन से साथ आये है, असं मला म्हणायचं आहे, असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं. मनसे शब्द उच्चारल्यानं मुख्यमंत्री अडखळले असल्याचं लक्षात येताच अमित शहा त्यांच्या मदतीला धावले. हम दिल से, हृदय से साथ है, असं अमित शहांनी म्हटलं. यावेळी शेजारीच बसलेल्या उद्धव ठाकरेंच्या चेहऱ्यावर हसू उमटलं.