राज्यभरात 2 कोटी वृक्षारोपण कार्यक्रमाचा शुभारंभ
By admin | Published: July 1, 2016 12:02 PM2016-07-01T12:02:22+5:302016-07-01T18:40:15+5:30
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या हस्ते वृक्षारोपण कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला आहे
Next
ऑनलाइन लोकमत -
मुंबई, दि. 01 - वनविभागाकडून सुरु करण्यात आलेल्या वृक्षारोपण कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या हस्ते या कार्यक्रमाचं उद्घाटन करण्यात आलं. दोन्ही पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत राज्यभर वृक्षरोपणाची मोहीम सुरु झाली. राज्यभरात एकूण 2 कोटी झाडे लावण्यात येणार आहेत. सकाळी 11 पर्यंत 40,01,430 झाडं लावण्यात आल्याचा दावा वनविभागाने केला.
कार्यक्रमादरम्यान उद्धव ठाकरेंच्या हस्ते सोनचाफा, मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ताम्हण, सुधीर मुनगंटीवार आणि मकरंद अनासपुरेंच्या हस्ते कडूलिंब, कॉमेडी किंग कपिल शर्मा बकूळ तर अभिनेते सयाजी शिंदे यांच्या हस्ते पिंपळाचं झाड लावण्यात आलं.
उद्धव ठाकरे यांनी यावेळी बोलताना अपशकून करणार नाही, खांद्याला खांदा लावून उभे राहू असं आश्वासन दिलं आहे. सोबतच हा कार्यक्रम हाती घेतल्याबद्दल वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचं कौतुकही केलं. उद्धवजींनी झाडं लावल त्याला मी पाणी, माती टाकलं. आम्ही लावलेल्या रोपाचा नक्कीच वटवृक्ष होईल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलले आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी महाराष्ट्र सरकारचं कौतुक केलं असून सर्वांना यामध्ये सामील होण्याचं आवाहन केलं आहे.
Excellent initiative by the Maharashtra Government, of planting 2 crore trees in one day. Urge everyone in Maharashtra to support & join.
— Narendra Modi (@narendramodi) July 1, 2016
एकनाथराव खडसेंचे राशीचक्र...
वनमहोत्सव अभियानाचा शुक्रवारी जळगावातही शुभारंभ झाला. जळगाव वनविभाग व सामाजिक वनीकरण विभाग यांच्यामार्फत विकसीत करण्यात येत असलेल्या लांडोरखोरी उद्यानात माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्या हस्ते त्यांच्या राशी व नक्षत्राच्या शमी व कडुलिंब या वृक्षांचे रोपण करण्यात आले. खडसे यांचा जन्म धनिष्ठा नक्षत्रात झाला आहे तसेच त्यांची नावानुसार मकर रास आहे. शमी व कडुलिंब हे वृक्ष मकर रास व धनिष्ठा नक्षत्रासाठी लाभदायक आहे. सध्या राजकीय चक्रव्यूहात अडकलेल्या एकनाथराव खडसे यांच्या हस्ते झालेले राशीचक्रानुसार वृक्षारोपण कितपत लाभदायक ठरते हे महत्त्वाचे आहे.