कोकण रेल्वे दुहेरीकरणाचा शुभारंभ टळला
By Admin | Published: November 2, 2015 02:54 AM2015-11-02T02:54:40+5:302015-11-02T02:54:40+5:30
कोकण रेल्वेला दुहेरी मार्ग नसल्याने अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे ही समस्या सोडविण्यासाठी कोकण रेल्वेवर दुहेरी मार्गाचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे.
मुंबई : कोकण रेल्वेला दुहेरी मार्ग नसल्याने अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे ही समस्या सोडविण्यासाठी कोकण रेल्वेवर दुहेरी मार्गाचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. रेल्वे मंत्रालयाकडे हा प्रस्ताव गेल्यानंतर ३१ आॅक्टोबर रोजी त्याचा शुभारंभ करून प्रत्यक्षात कामाला सुरुवात केली जाणार होती, परंतु हा शुभारंभ टळला असून, आता ८ नोव्हेंबरचा मुहूर्त देण्यात आला
आहे.
कोकण रेल्वेवर एकच मार्ग उपलब्ध असल्याने एखादी दुर्घटना घडल्यास रेल्वे सेवा ठप्प होते आणि कोकणवासियांना त्याचा मोठा फटका बसतो. यातून सुटका करण्यासाठी कोकण रेल्वेने दुहेरीकरणाचा प्रस्ताव तयार करण्यात आला. १५ आॅक्टोबर २0१५ रोजी कोकण रेल्वेच्या रौप्यमहोत्सवी कार्यक्रमाला रेल्वेमंत्री सुरेश प्रभू उपस्थित राहिले होते. हे काम पुढे सरकेल, अशी आशा असतानाच ३१ आॅक्टोबर रोजीचा दुहेरीकरणाचा शुभारंभ झालाच नाही आणि हा मुहूर्त टळला. आता कोकण रेल्वेकडून ८ नोव्हेंबरचा मुहूर्त दुहेरीकरणासाठी देण्यात आला आहे. रोहा ते ठोकूर अशा ७४१ किमीचे टप्प्याटप्यात कोकण रेल्वेकडून दुहेरीकरण केले जाणार आहे. यात कोकण रेल्वेच्या अभियंता आणि वाहतूक विभागाकडून रोहा ते वीरपर्यंतचा प्राथमिक सर्वेक्षणाचा प्रस्ताव रेल्वे मंत्रालयाकडे
मंजुरीसाठी पाठवला आहे. दुहेरीकरणाच्या कामासाठी जवळपास १२ हजार कोटींपेक्षा जास्त खर्च येणार आहे.
कोकण रेल्वेचे महाप्रबंधक (प्रशासन) सिध्देश्वर तेलगु यांना विचारले असता, ८ नोव्हेंबर ही तारीख दुहेरी मार्गाच्या शुभारंभासाठी ठरवण्यात आली आहे. कोलाड येथे शुभारंभाचा कार्यक्रम केला जाईल, असे सांगितले. रेल्वेमंत्र्यांनी ३१ आॅक्टोबरचा मुहूर्त दिला होता. त्यामुळे शुभारंभ टळण्यामागचे नेमके कारण तेलगु यांना विचारले असता, रेल्वेमंत्री अन्य काही कामात व्यस्त होते, तसेच काही तांत्रिक बाबीही पूर्ण करायच्या होत्या, असे ते म्हणाले.