शेगाव येथे ‘श्रीं’च्या पुण्यतिथी सोहळय़ास प्रारंभ
By admin | Published: September 3, 2016 01:56 AM2016-09-03T01:56:43+5:302016-09-03T01:56:43+5:30
मुख्य पुण्यतिथी सोहळा ६ सप्टेंबर रोजी.
शेगाव, दि. २ : श्री गजानन महाराज संस्थानमध्ये श्रींच्या पुण्यतिथी उत्सवाला शुक्रवारपासून श्री गणेश व वरुणयागाने प्रारंभ करण्यात आला. विश्वस्त त्रिकाळ यांच्या हस्ते पुजा करून यागास सकाळी १0 वा. प्रारंभ झाला. मुख्य पुण्यतिथी सोहळा ६ सप्टेंबर रोजी असून कार्यक्रमाची सांगता ७ सप्टेंबर रोजी होणार आहे. श्रींच्या पुण्यतिथी उत्सवानिमित्त २ ते ७ सप्टेंबरदरम्यान भरगच्च कार्यक्रम असून या उत्सव सोहळय़ात सकाळी ५ ते ६ काकडा आरती, ७.१५ ते ९.१५ भजन, दुपारी ४ ते ५ प्रवचन, रात्री ८ ते १0 किर्तन असे कार्यक्रम होणार आहे. या उत्सवासाठी शुक्रवारी ८ दिंड्यांचे आगमन झाले आहे तर उत्सवाच्या मुख्य दिवसापर्यंंत ७00 च्या वर भजनी दिंड्यांचे आगमन होईल. या सोहळय़ात हभप प्रमोदबुवा पानबुडे (श्री क्षेत्र आळंदी), रमेशबुवा आवारे (खापरवाडी), उमेशबुवा दशरथे (श्री क्षेत्र आळंदी), विष्णुबुवा कव्हळेकर (कव्हळा) यांचे किर्तन व प्रवचन होणार आहे. श्रींचा मुख्य पुण्यतिथी सोहळा मंगळवारी होणार आहे. मंगळवारी सकाळी १0 वा. यागाची पुर्णाहुती व अवभृतस्नान होईल. दुपारी २ वाजता श्रींची भव्य पालखीची गज अश्वासह नगर परिक्रमा निघेल. बुधवारी सकाळी हभप जगन्नाथबुवा म्हस्के यांचे काल्याचे किर्तन होईल व त्या नंतर दहीहंडी, गोपालकाला होणार आहे. श्रींच्या पुण्यतिथी उत्सवानिमित्त संपुर्ण मंदीरावर आकर्षक विद्युत रोषणाई सुध्दा करण्यात आली आहे. संस्थानच्या परिसरामध्ये भक्तांच्या सेवेसाठी हजारो सेवेकरी आपली सेवा देणार आहेत. उत्सव काळात शहरातील व मंदीर परिसरात पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे. यामध्ये पुण्यतिथी उत्सवदिनी ३ पोलीस निरीक्षक , ११ अतिरिक्त पोलीस उपनिरीक्षक, १0५ पोलीस कर्मचारी, २५ साध्या वेशातील पोलिस, २0 महिला पोलीस, २0 वाहतूक पोलीस व सीआरपीएफचे एक पथक तैनात करण्यात येणार आहे.