साखर कारखानदारीत हिस्सेदारी मॉडेल आणा- चव्हाण
By admin | Published: July 8, 2015 01:36 AM2015-07-08T01:36:04+5:302015-07-08T01:36:04+5:30
राज्यातील अनेक साखर कारखान्यांनी एफआरपी दिलेली नाही. त्यामुळे ते सगळे कारखाने कायदेशिर कारवाईस पात्र आहेत.
मुंबई : राज्यातील अनेक साखर कारखान्यांनी एफआरपी दिलेली नाही. त्यामुळे ते सगळे कारखाने कायदेशिर कारवाईस पात्र आहेत. अशा परिस्थितीत सरकारने रंगराजन समितीचा अहवाल स्वीकारून उत्पन्नात हिस्सेदारी करणारे मॉडेल साखर कारखानदारीसाठी आणले पाहिजे,अशी मागणी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मंगळवारी येथे पत्रकार परिषदेत केली.
साखरेचे दर १९५० रु. क्विंटलपर्यंत खाली आले आहेत. उत्पादनाची किंमत मात्र २३०० रुपयांच्या वरती गेली आहे. ही परिस्थिती आणखी बिकट होणार आहे. एकाही कारखान्याने एफआरपी दिलेला नाही. उस उत्पादक शेतकऱ्यांसाठी भांडणारे शेतकरी संघटनेचे नेते मंत्रिमंडळात समावेश व्हावा म्हणून मंत्रालयात खेटे घालत आहेत असा टोलाही त्यांनी लगावला.
महिला व बालकल्याणमंत्री पंकजा मुंडे यांनी केलेल्या २०६ कोटींच्या खरेदीची सीबीआय चौकशी करण्याची मागणीही त्यांनी केली व शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी बोगस पदवी प्रकरणी समाधानकारक खुलासा न केल्याने न्यायालयात जाणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
मुख्यमंत्री कमी पडत आहेत!
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र मंडळाच्या कार्यक्रमासाठी परदेशात जावे की नाही हा गंभीर प्रश्न आहे असे म्हणत पृथ्वीराज चव्हाण यांनी मुख्यमंत्र्यांच्या परदेश दौऱ्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. अनेक महत्वाची कार्यालये शेजारच्या गुजरातमध्ये हलवली जात आहेत व त्यांना थांबविण्यासाठी, विरोध करण्यासाठी मुख्यमंत्री कमी पडत आहेत असा टोलाही चव्हाण यांनी लगावला.
खुशाल न्यायालयात जा - तावडे
माझ्या पदवी प्रकरणात काँंग्रेसला न्यायायालयात जायचे असेल तर त्यांनी जावे. जे काही हेत्वारोप करायचे असेल तेही त्यांनी करावेत; परंतु विनाकारण ज्ञानेश्वर विद्यापीठाच्या चांगल्या प्रयोगाला बदनाम करु नये, असे तावडे यांनी विधानावर प्रतिक्रिया दिली.
ईव्हेंट करणारे पंतप्रधान
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे इव्हेंट मॅनेजर आहेत. एकाही कार्यक्रमाची कोणतीही पूर्वतयारी झालेली नसताना केवळ घोषणा करायच्या, त्याचे इव्हेंट करायचे, एवढाच एकमुखी कार्यक्रम चालू असेून आजपर्यंत त्यांनी असे ५४ इव्हेंट केल्याचेही चव्हाण म्हणाले.