‘लॅन्टर्न टेस्ट’ने तरुणास मिळाली नाकारलेली नोकरी

By Admin | Published: June 17, 2015 03:40 AM2015-06-17T03:40:45+5:302015-06-17T03:40:45+5:30

लेखी व तोंडी परीक्षेत निवड होऊनही वैद्यकीय तपासणीत ‘रंगाधळेपणा’चा ठपका ठेवून सांगली जिल्हा पोलीस अधीक्षकांनी

'Launcher Test' rejected job | ‘लॅन्टर्न टेस्ट’ने तरुणास मिळाली नाकारलेली नोकरी

‘लॅन्टर्न टेस्ट’ने तरुणास मिळाली नाकारलेली नोकरी

googlenewsNext

मुंबई : लेखी व तोंडी परीक्षेत निवड होऊनही वैद्यकीय तपासणीत ‘रंगाधळेपणा’चा ठपका ठेवून सांगली जिल्हा पोलीस अधीक्षकांनी अपात्र ठरविलेल्या आटपाडी तालुक्यातील एका तरुणाला मुंबईच्या जे. जे. इस्पितळात केलेल्या ‘लॅन्टर्न टेस्ट’ने पोलीस शिपायाची नोकरी मिळाली.
सांगली जिल्हा पोलीस दलात भरतीसाठी गेल्या वषीच्या निवड प्रक्रियेत आटपाडीचा सूरज बरगे हा २४ वर्षांचा पदवीधर तरुण यशस्वी ठरला होता. मात्र मिरजच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात व नंतर पुण्याच्या ससून इस्पितळात केलेल्या वैद्यकीय तपासणीत सूरजच्या दृष्टीत ‘रंगांधळेपणा’चा (कलर ब्लार्इंडनेस) दोष असल्याचा निष्कर्ष काढत भरतीसाठी अपात्र ठरविले गेले.
मुंबईच्या जे. जे. इस्पितळातील नेत्ररोग तज्ज्ञ डॉक्टरांच्या मंडळाकडून (बोर्ड आॅफ रेफरी) फेरतपासणी करण्याची विनंती बरगे याने राज्याच्या वैद्यकीय सेवा संचालकांना व सांगली जिल्हा पोलीस अधीक्षकांना केली. मात्र राज्याच्या सरकारी सेवा भरती नियमांत वैद्यकीय तपासणीत अपात्र ठरलेल्या उमेदवाराची फेरतपासणी करण्याची तरतूद नाही, असे कारण देऊन अधीक्षकांनी नकार दिला.
या पार्श्वभूमीवर सूरजने महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणाकडे (मॅट) दाद मागितली. पोलीस दलातफे येथेही फेरवैद्यकीय तपासणीची नियमांत तरतूद नाही, असाच पवित्रा घेतला गेला. मात्र बरगे यांचे वकील अ‍ॅड. अरविद व गौरव बांदिवडेकर यांनी असे निदर्शनास आणले की, ‘रातांधळेपणा’विषयी अंतिम निर्णय घेण्यासाठी असे प्रत्येक प्रकरण ‘लॅन्टर्न टेस्ट’साठी मुंबईच्या जे. जे. इस्पितळातील तज्ज्ञ मंडळाकडे पाठवणे गरजेचे आहे, असे धोरण असल्याचे प्रतिज्ञापत्र आरोग्य सेवा संचालकांनी याआधी ‘मॅट’मध्ये झालेल्या प्रकरणांमध्ये केले होते. सरकारी वकील के. बी.भिसे हेही याचा प्रतिवाद करू शकले नाहीत.
यावरून ‘मॅट’चे उपाध्यक्ष राजीव अगरवाल व न्यायिक सदस्य आर. बी. मलिक यांनी बरगे यांना ‘लॅन्टर्न टेस्ट’साठी जे. जे. इस्पितळात पाठविले जावे व त्यात ते पात्र ठरले तर पुढील महिनाभरात त्यांना पोलीस शिपाई म्हणून नेमणूक दिली जावी, असा आदेश दिला. यानुसार जे. जे. इस्पितळाच्या त्रिसदस्यीय तज्ज्ञ मंडळाने सूरजची तपासणी केली व १३ मे रोजी त्यात तो पात्र ठरला. त्यामुळे निवड होऊनही जिल्हा पोलीस अधीक्षकांनी नाकारलेली नोकरी मिळण्याचा सूरजचा मार्ग मोकळा झाला. (विशेष प्रतिनिधी)

मुळातच झाली चूक...
सरकारी नोकर भरतीत सहभागी होणाऱ्या उमेदवाराच्या वैद्यकीय तपासणीत ‘रंगांधळेपणा’चा अंतिम निर्णय जे. जे. इस्पितळाच्या तज्ज्ञ मंडळाने ‘लॅन्टर्न टेस्ट’नंतरच घेण्यात यावा, असा राज्य शासनाच्या आरोग्य विभागाचा धोरणात्मक निर्णय आहे.
मात्र जिल्हा पोलीस अधीक्षकांनी बरगे याचे कथित ‘रंगांधळेपणा’ मिरज व ससून इस्पितळातील तपासणीवरून ठरविणे व विनंती करूनही त्यास तपासणीसाठी जे.जे. मध्ये न पाठविणे मुळातच
चूक होते, हे यावरून स्पष्ट झाले.

Web Title: 'Launcher Test' rejected job

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.