ज्येष्ठ लावणी कलावंत शांताबाई काळेंचा जगण्यासाठी संघर्ष; हक्काच्या घरासाठी वणवण

By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2023 04:32 PM2023-01-31T16:32:10+5:302023-01-31T16:32:31+5:30

निवृत्त कलावंत म्हणून मिळणारे १५०० रुपये मानधन आणि डॉक्टर काळे यांच्या पुस्तकाची रॉयल्टी एवढ्यावरच दैनंदिन उदरनिर्वाह करत आहेत. तेही कलावंतांचे मानधन वेळेवर मिळत नाही.

Lavani artist Shantabai Kale's struggle for survival | ज्येष्ठ लावणी कलावंत शांताबाई काळेंचा जगण्यासाठी संघर्ष; हक्काच्या घरासाठी वणवण

ज्येष्ठ लावणी कलावंत शांताबाई काळेंचा जगण्यासाठी संघर्ष; हक्काच्या घरासाठी वणवण

googlenewsNext

सोलापूर - मुलाला डॉक्टर केल्यानंतर सुखाचे दिवस बघण्याची आशा असतानाच शांताबाई काळे यांच्या मुलाचे अपघाती निधन झाले. मोठा आधार कोसळला. चाळीस वर्षे लावणी कला जोपासणाऱ्या आणि या लावणीच्या बळावर मुलाला मोठे केलेल्या डॉ. किशोर काळे यांच्या आई शांताबाई काळे या आज अत्यंत दयनीय अवस्थेत आयुष्य जगत आहेत.  

निवृत्त कलावंत म्हणून मिळणारे १५०० रुपये  मानधन आणि डॉक्टर काळे यांच्या पुस्तकाची रॉयल्टी एवढ्यावरच दैनंदिन उदरनिर्वाह करत आहेत. तेही कलावंतांचे मानधन वेळेवर मिळत नाही. तीन-तीन महिने विलंब होतो. राहायला घर नाही. भाड्याने तर कधी इतरत्र राहावे लागते. भाडं द्यावं की पोट भरावं असा प्रश्न उपस्थित झाला आहे. अशा परिस्थितीतून त्यांना रोजचे जीवन जगावं लागत आहे.  
सोलापूर जिल्हा परिषदेचे तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ राजेंद्र भारूड यांनी साडेचार वर्षांपूर्वी शांताबाई काळे यांना घर देण्याचे कृतीशील आश्वासन दिले. तेवढ्यावरच न थांबता डॉ. भारुड यांनी तात्काळ संबंधित अधिकाऱ्यांना आदेश देऊन आवश्यक ती मदत करण्यास सांगितले. त्यावेळी करमाळा तालुक्यातील नेरले येथे त्यांना घरासाठी जागाही उपलब्ध केली. त्या जागेच्या उताऱ्यावर शांताबाई काळे यांचे नावही लागले. बांधकाम सुरू झाले होते. दरम्यान, सीईओ डॉ. राजेंद्र भारूड यांची बदली झाली त्यानंतर मात्र अचानकपणे विविध अडचणीमुळे हे बांधकाम खोळंबले आहे. 

प्रशासकीय स्तरावरही संबंधित अधिकार्‍यांकडून दुर्लक्ष झाले. त्यानंतर पुन्हा सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हाधिकारी यांच्यासह अधिकाऱ्यांना भेटून अर्ज विनंती केली. राहायला घर मिळावे यासाठी मागणी केली. त्याचबरोबर मुंबई येथे मंत्रालयात जाऊन मुख्यमंत्र्यांनाही लेखी निवेदन दिले. काही दिवसांपूर्वीच नागपूर येथे जाऊन हिवाळी अधिवेशनावेळी त्यांनी राहायला हक्काचे घर आणि वेळेवर मानधन मिळावे या मागणीसाठी पाठपुरावा केला. आरोग्यमंत्री प्रा. तानाजी सावंत यांच्या प्रतिनिधींना निवेदन दिले. त्यांनीही कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, यांनाही निवेदन दिले. आश्वासनापलीकडे ठोस अशी कार्यवाही झालेली नाही. 

तत्कालीन राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनाही पत्र लिहिले होते. राज्यपाल कार्यालयाकडून सांस्कृतिक आणि पर्यटन विभागाचे प्रधान सचिव यांना शांताबाई काळे यांचे राहायला घर आणि उदरनिर्वाह साठी मागणी विषयीचे पत्र उचित कार्यवाहीसाठी पुढे पाठवण्यात आले होते. मात्र मराठी भाषा विभाग यासंदर्भात कोणतीही कार्यवाही करू शकत नाही, अशी व्यथा शांताबाई काळे यांनी यावेळी व्यक्त केली. मुलाच्या निधनानंतर उदरनिर्वाहाचा प्रश्न गंभीर झाला. हाल अपेष्टा सहन कराव्या लागत आहे. संघर्ष करावा लागत आहे. आणखी किती हेलपाटे मारायचे? 69 वर्ष वय असताना आता पुढे हेलपाटे मारणे शक्य नाही. आता तरी मुख्यमंत्री व शासनाने हक्काचं घर मिळवून द्यावे आणि स्वतःच्या हक्काच्या घरात मरण यावं अशीच शेवटची इच्छा शांताबाई काळे यांची आहे. 

हक्काचे घर मिळावे, जेष्ठ कलावंत म्हणून वेळेवर मानधन मिळावे या मागणीसाठी वर्षानुवर्ष कागदपत्राची बॅग सोबत घेऊन शासकीय कार्यालयाचे उंबरे झिजवावे लागत आहेत. तेव्हा आता तरी शासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन त्यांना न्याय द्यावा अशी मागणी होत आहे.
 

Web Title: Lavani artist Shantabai Kale's struggle for survival

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.