मऱ्हाटमोळ्या लावणीचा बाज, अदाकारी हरवली
By Admin | Published: April 27, 2015 11:45 PM2015-04-27T23:45:37+5:302015-04-28T00:33:41+5:30
लीला गांधी यांची खंत : हिंदीचे अनुकरण मराठीत
संतोष मिठारी - कोल्हापूर -गाण्यांचा अर्थ अदाकारीतून पेश करत त्याला लक्षवेधक नृत्याची जोड देण्याची कला म्हणजे लावणी आहे. तिला एक अस्सल मराठमोळा बाज होता. मात्र, प्रेक्षकांच्या बदललेल्या अभिरूचीमुळे मऱ्हाटमोळ्या लावणीचा बाज, अदाकारी आता हरवल्याची खंत ज्येष्ठ अभिनेत्री लीला गांधी यांनी सोमवारी व्यक्त केली. मराठी चित्रपटांमध्ये हिंदीचे वाढलेले अनुकरण हे वेगळंपण जपलेल्या मराठी चित्रपटसृष्टीला मारक ठरणारे असल्याचे त्यांनी सांगितले.
भगिनी पुरस्कार सोहळ््यासाठी कोल्हापुरात त्या आल्या होत्या. यावेळी त्यांनी ‘लोकमत’शी संवाद साधला. ज्येष्ठ अभिनेत्री गांधी म्हणाल्या, लावणीमध्ये नृत्य आणि गाण्यांचा अर्थ सांगणारे चेहऱ्यावरील हावभाव आणि अदाकारीला महत्त्व आहे. या दोन गोष्टींचा उत्तम संगम म्हणजे लावणी आहे. त्याच्या जोरावरच लावणी अस्सल मराठमोळ्या बाजारात सादर होत होती. मात्र, सध्या लावणीतील शब्द कुठे जात आहेत ते समजत नाहीत. त्यातील अर्थाची जागा धांगडधिंगाण्याने घेतली आहे. चेहऱ्यावरील हावभाव बदलले असून अदाकारी गायब झाली आहे. प्रेक्षकांची बदललेली अभिरूची त्याला कारणीभूत आहे. बदलत्या जगानुसार लावणी बदलत आहे. त्यात अदाकारी, बाज असलेली लावणी लोप पावत आहे. या लावणीची आवड प्रेक्षकांमध्ये रुजविण्यासाठी गाण्यांच्या शब्दांवर नृत्य, अदाकारी सादर करणे गरजेचे आहे. चित्रपट, लावणीमधील येणाऱ्या नव्या मुलींचे नृत्य कौशल्य चांगले आहे. पण, त्याला शास्त्रीय पाया नसल्याचे स्पष्टपणे जाणवते. मराठी चित्रपटांमधील बदलांबाबत त्या म्हणाल्या, पूर्वी पैसे कमी असल्याने मराठीत कसे-बसे दोन-चार चित्रपट व्हायचे. आता परिस्थिती बदलली असून चित्रपटांची संख्या वाढली आहे; पण त्यात हिंदीचे अनुकरण होत आहे. कपडे, भूमिका, अभिनयातील ‘बोल्डनेस’ यामुळे हिंदीचे अनुकरण खटकणारे आहे. त्यामुळे चित्रपट धडाधड येत असले, तरी ते त्याहून अधिक वेगाने विस्मृतीत देखील जात आहेत.
सातासमुद्रापार जाऊन उपयोग काय ?
आता काही नृत्यांगणा सातासमुद्रापार असलेल्या अमेरिका, आदी देशांत लावणीचे धडे देण्यासाठी जात आहेत. ते
चांगले आहे. पण, लावणीचे धडे देणाऱ्यांना नेमकी लावणी
माहीत नाही. चित्रपटांतील गीतांचा समावेश, पेहराव्यातील बदलाने लावणीचा मूळ बाज गायब झाला आहे. अशा स्वरूपातील लावणी सातासमुद्रापार जाऊन उपयोग
काय ?, असा सवाल ज्येष्ठ अभिनेत्री गांधी यांनी
उपस्थित केला.
अनंत माने यांच्या नावाने पुरस्कार द्यावा
ख्यातनाम दिग्दर्शक अनंत माने मराठी चित्रपटसृष्टीला यांनी भरभरून दिले. ते कोल्हापूरचे भूषण होते. त्यांच्या जन्मशताब्दीनिमित्त राज्य शासनाने त्यांच्या नावाने पुरस्कार सुरू करावा, अशी अपेक्षा ज्येष्ठ अभिनेत्री गांधी यांनी व्यक्त केली. त्या म्हणाल्या, अशोककुमार यांच्यासमवेतचा आशीर्वाद, महिपालबरोबरचा ‘बगदाद की राते’, हेलनसोबतचा ‘बस कंडक्टर’ या हिंदी चित्रपटांत मी काम केले. पण, ते फारसे रूचले नाही. मराठीतील ‘रेशमाच्या गाठी’साठी आॅडिशन देण्यासाठी गेले असताना अनंत माने यांनी नृत्यकौशल्य पाहून ‘प्रीतीसंगम’मधून संधी दिली. हा माझा पहिला मराठी चित्रपट होता. त्यानंतर माने यांच्या सर्व चित्रपटांमध्ये मी होते. ‘सांगत्ये ऐका’ने वेगळी ओळख दिली. ‘केला इशारा जाता जाता...’ मध्ये त्यांनी मुख्य भूमिका मला दिली. ते भूमिकेचा पाया सांगायचे. अनेकदा ते स्वत: एखादे दृश्य करून दाखवायचे. प्रत्येक प्रसंग अंत:करणातून आणि हुबेहूब होण्यासाठी त्यांचा आग्रह असायचा. ते माझे गुरू होते. दिग्दर्शकांसह त्यांना गायन, अभिनयाचे चांगले अंग होते. अभिनय, गीत आणि कथा अशा सर्वच पातळीवरील उत्तम चित्रपट हा अनंत माने यांची खासीयत होती. मराठी चित्रपटांसाठी त्यांनी आपली हयात घालविली. शांताराम बापूंपाठोपाठ त्यांचे कार्य आहे. जन्मशताब्दी वर्षात त्यांचे कोल्हापुरात स्मारक व्हावे. त्यासाठी यशाशक्ती मदत मी करेन.