पक्षांतर करणाऱ्यास निवडणूकबंदी करणारा कायदा हवा

By Admin | Published: March 11, 2016 04:17 AM2016-03-11T04:17:13+5:302016-03-11T04:17:13+5:30

राजकीय नेते इतक्या चटकन एका पक्षातून दुसऱ्या पक्षात कसे जातात, हेच मला कळत नाही. हे रोखण्यासाठी एका पक्षातून बाहेर पडलेल्या नेत्याला पाच

The law enforcing the law prohibiting the transmitter | पक्षांतर करणाऱ्यास निवडणूकबंदी करणारा कायदा हवा

पक्षांतर करणाऱ्यास निवडणूकबंदी करणारा कायदा हवा

googlenewsNext

नाशिक : राजकीय नेते इतक्या चटकन एका पक्षातून दुसऱ्या पक्षात कसे जातात, हेच मला कळत नाही. हे रोखण्यासाठी एका पक्षातून बाहेर पडलेल्या नेत्याला पाच वर्षे दुसऱ्या पक्षात जाता येऊ नये आणि निवडणूकही लढवता येऊ नये, असा कायदा करायला हवा, असे परखड मत प्रख्यात अभिनेते नाना पाटेकर यांनी मांडले.
कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या वतीने दिल्या जाणाऱ्या अत्यंत प्रतिष्ठेच्या ‘गोदावरी गौरव’चे वितरण गुरुवारी सायंकाळी येथील महाकवी कालिदास कलामंदिरात करण्यात आले. अभिनेते नाना पाटेकर यांच्यासह साताऱ्याच्या सामाजिक कार्यकर्त्या चेतना सिन्हा, नृत्यांगना कनक रेळे, मुंबईचे भौतिकशास्त्रज्ञ डॉ. शशिकुमार चित्रे, अमेरिकेत खडतर सायकल शर्यत जिंकणारे नाशिकचे डॉ. हितेंद्र व डॉ. महेंद्र महाजन, तर अहमदाबाद येथील वास्तुरचनाकार डॉ. बाळकृष्ण दोशी यांना प्रतिष्ठानचे अध्यक्ष तथा ज्येष्ठ साहित्यिक मधु मंगेश कर्णिक यांच्या हस्ते ‘गोदावरी गौरव’ प्रदान करण्यात आला. २१ हजार रुपये रोख व स्मृतिचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. ‘गोदावरी गौरव’ स्वीकारल्यानंतर आपल्या नेहमीच्या शैलीत फटकेबाजी करीत नाना पाटेकर यांनी रसिकांची मने जिंकून घेतली. ते म्हणाले, नवीन सरकार आल्यानंतर आता तरी शेतकऱ्याच्या गळ्यातील गळफास ढिला होईल, अशी अपेक्षा आहे. देवेंद्र फडणवीस चांगला माणूस आहे. त्यांच्यावर माझा विश्वास आहे. पण एकटा माणूस काही करू शकत नाही, मागची पिलावळही महत्त्वाची असते.
सुलभा देशपांडे, विजया मेहता यांच्यामुळे अभिनय क्षेत्रात आलो. पुढे बाबा आमटे या महामानवाशी संबंध आला. समाजासाठी काही करायचे त्यांनी पेरून ठेवले होते, ते आता ‘नाम’च्या रूपाने उगवले. शेतकरी केवळ कर्जामुळे नव्हे, तर इतर अनेक कारणांमुळे आत्महत्या करतात. औषधे परवडत नाहीत म्हणून अनेकांनी गळफास घेतल्याचे सांगत पाटेकर यांनी ‘नाम’च्या कार्याविषयी माहिती दिली. पुरस्कारांमुळे आपण कोणी तरी आहोत, असे वाटू लागल्यावर मी हेमलकशाला जातो. तेथे गेल्यावर आपण कोणीच नाही, याची जाणीव होते, असेही ते म्हणाले. (प्रतिनिधी)

Web Title: The law enforcing the law prohibiting the transmitter

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.