लॉन मालकाचे अपहरण
By admin | Published: August 11, 2014 12:59 AM2014-08-11T00:59:24+5:302014-08-11T00:59:24+5:30
उधारीच्या वसुलीसाठी एका लॉन मालकाचे बंदुकीच्या धाक दाखवून अपहरण करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे. ही घटना शनिवारी दुपारी गोरेवाडा रिंग रोडवर घडली.
गोरेवाडा रोडवरील थरार : बंदुकीचा धाक दाखवून पळविले
नागपूर : उधारीच्या वसुलीसाठी एका लॉन मालकाचे बंदुकीच्या धाक दाखवून अपहरण करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे. ही घटना शनिवारी दुपारी गोरेवाडा रिंग रोडवर घडली.
सय्याद अयाज अली यांचे गोरेवाडा रिंग रोडवर लॉन आहे. सय्यद यांचे एका प्रॉपर्टी डीलरसोबत देवाण-घेवाणवरून वाद सुरू होता. सय्यद यांच्यानुसार शनिवारी दुपारी १.३० वाजता ते लॉनमध्ये हजर असताना संबंधित प्रॉपर्टी डीलर आपल्या सात-आठ साथीदारांसह चार चाकी वाहनाने तिथे आला. येताच सर्वजण त्याच्यावर तुटून पडले. मारहाण केली. तसेच बंदुकीचा धाक दाखवून जिवे मारण्याची धमकी देत सोबत नेले. मोबाईलही हिसकावून घेतला. या प्रॉपर्टी डीलरने पूर्व नागपुरातील एका कुख्यात गँगस्टरच्या मुलाला फोन करून सय्यदला त्याच्याजवळ आणत असल्याची माहिती दिली. त्याच्यासोबत बोलल्यानंतर प्रॉपर्टी डीलर व त्याच्या साथीदारांनी सय्यदला कामठी रोडवरील एका फॉर्म हाऊसवर नेले. तिथे अगोदरच आठ ते दहा तरुण बसले होते. त्यांनी सय्यदला हाताची बोटे कापण्याची धमकी दिली. या धमकीनंतर लॉनची विक्री करण्यास सांगण्यात आले. सय्यदच्या घरी सुद्धा त्यांची माणसे असल्याची धमकी देण्यात आली. प्रॉपर्टी डीलरने सय्यदला ३.८५ कोटी रुपयात लॉनची विक्री करण्यास सांगितले. तसेच सय्यदवर त्याचे ८५ लाख रुपये बकाया असल्याचे सांगून ती रक्कम तो परत घेईल, असेही स्पष्ट केले. प्रॉपर्टी डीलरसोबत एक खासगी सुरक्षा गार्ड होता. तो आणि त्याचे साथीदार सय्यदला बंदुक दाखवून धमकावत होते. यानंतर त्यांनी सय्यदला कामठीतील एका वकिलाच्या घरी नेले. तिथे विक्रीपत्रावर त्यांची स्वाक्षरी घेऊन नोटरीसुद्धा केली.