लॉरेन्स बिश्नोई आता विधानसभा निवडणूक लढवणार? कोणी दिली राजकारणात येण्याची ऑफर?
By ऑनलाइन लोकमत | Published: October 22, 2024 10:47 AM2024-10-22T10:47:31+5:302024-10-22T10:49:43+5:30
Maharashtra Assembly Elections 2024: या पक्षाने गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईची तुलना शहीद-ए-आझम सरदार भगतसिंग यांच्याशी केली आहे.
Maharashtra Assembly Elections 2024: मुंबई : राज्यात विधानसभा निवडणुकांचे बिगुल वाजले आहे. विधानसभा निवडणुकीसाठी सर्व राजकीय पक्ष जोरदार तयारीला लागले आहेत. अशातच एका पक्षाचे अजब विधान समोर आले आहे. या पक्षाने गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईला निवडणूक लढवण्याची ऑफर दिली आहे. तसेच, या पक्षाने गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईची तुलना शहीद-ए-आझम सरदार भगतसिंग यांच्याशी केली आहे.
लॉरेन्स बिश्नोईला एका राजकीय पक्षाकडून महाराष्ट्र विधानसभा निवडणूक लढवण्याची ऑफर आली आहे. लॉरेन्स बिश्नोई सध्या अहमदाबादच्या साबरमती मध्यवर्ती कारागृहात आहे. उत्तर भारतीय विकास सेनेने (UBVS) लॉरेन्स बिश्नोईला विधानसभा निवडणुकीची ही ऑफर दिली आहे. पक्षाचे अध्यक्ष सुनील शुक्ला यांनी याबाबत लॉरेन्स बिश्नोईला पत्रही लिहिले आहे. याशिवाय, लॉरेन्स बिश्नोईला विजयी करण्यासाठी पक्षाचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी प्रयत्न करतील, असे पक्षाने आपल्या निवेदनात म्हटले आहे.
मुंबई विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी उत्तर भारतीय विकास सेनेच्या ४ उमेदवारांची नावे निश्चित करण्यात आली आहेत. लॉरेन्स बिश्नोईच्या मंजुरीनंतर आणखी ५० उमेदवारांची यादी जाहीर केली जाईल, असे उत्तर भारतीय विकास सेनेचे अध्यक्ष सुनील शुक्ला यांनी आपल्या निवेदनात सांगितले. तसेच, ते पुढे म्हणाले की, लॉरेन्स बिश्नोईमध्ये आपण शहीद भगतसिंग पाहतो.
याचबरोबर, लॉरेन्स बिश्नोईला लिहिलेल्या पत्रात सुनील शुक्ला यांनी म्हटले आहे की, "तुम्ही पंजाबमध्ये जन्मलेले उत्तर भारतीय आहात याचा आम्हाला अभिमान आहे. आमचा उत्तर भारतीय विकास सेना या नावाने राष्ट्रीय आणि महाराष्ट्र राज्य नोंदणीकृत राजकीय पक्ष आहे. आमचा पक्ष जो देशात उत्तर भारतीयांच्या हक्कांसाठी काम करतो."
बाबा सिद्दीकी यांच्या हत्याप्रकरणात लॉरेन्स बिश्नोईचे नाव
राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दीकी यांच्या हत्येप्रकरणी गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईचे नाव पुढे आले आहे. तसेच, लॉरेन्स बिश्नोईच्या टोळीने बाबा सिद्दिकी यांच्या हत्येची जबाबदारी स्वीकारली आहे. दरम्यान, मुंबई पोलीसही या प्रकरणाचा तपास करत आहेत.