हिंदू सणांनाच कायदे आडवे येतात
By admin | Published: July 6, 2017 04:45 AM2017-07-06T04:45:17+5:302017-07-06T04:45:17+5:30
सायलेन्स झोन असो की,अन्य काहीही; कायद्याचा बागुलबुवा करून हिंदूंवरच बंधने आणणे हे खपवून घेणार नाही. कायदे नंतर आले, गणेशोत्सव
विशेष प्रतिनिधी/ लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : सायलेन्स झोन असो की,अन्य काहीही; कायद्याचा बागुलबुवा करून हिंदूंवरच बंधने आणणे हे खपवून घेणार नाही. कायदे नंतर आले, गणेशोत्सव पूर्वीपासूनच आहे. शिवसेना गणेशोत्सव मंडळांच्या पाठीशी आहे. गणेशोत्सव दणक्यात साजरा करणारच, अशा शब्दांत शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज ठणकावले.
मंत्रालयासमोरील क ४ या सरकारी बंगल्याच्या ठिकाणी शिवसेनेच्या शिवालय या कार्यालयाचे उद्घाटन ठाकरे यांच्या हस्ते झाले. त्या वेळी ते पत्रकारांशी बोलत होते. दरवर्षी पावसापाठोपाठ हिंदूंचे सण मग गणेशोत्सव असो, नवरात्रौत्सव असो की दिवाळी वातावरण तापू लागते. रेड अलर्ट जारी होतो, अतिरेकी हल्ल्याच्या सूचना येतात. कायदे आडवे येतात, अशा परिस्थितीत जीव मुठीत घेऊन सण साजरे करणाऱ्या हिंदूंवरच कायद्याचा बडगा उगारला जातो. यावर सरकार कायमस्वरूपी तोडगा का काढत नाही, असा सवाल ठाकरे यांनी केला.
गणेशोत्सवावर अनेक बंधने लादण्यात आली आहेत. यासंदर्भात उद्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे बैठक होणार आहे. या बैठकीत जर समाधानकारक तोडगा निघाला नाही, तर शिवसेना हा उत्सव दणक्यात साजरा करणार, असे त्यांनी बजावले. गणेशोत्सव साजरे करणारे अतिरेकी नाहीत. त्यांना विश्वासात घ्या. त्यांच्याशी चर्चा करा. ते चुकत असतील तर त्यांना समजवून सांगा, असे आवाहन त्यांनी केले.
शेतकरी संवाद ९ पासून
मुख्यमंत्र्यांनी कर्जमाफीच्या लाभार्थ्यांची यादी जाहीर केली आहे. या यादीमध्ये मुुंबईतील शेतकऱ्यांची नावे आहेत. हे जरी ऐकायला विचित्र असलं तरी खातरजमा करायला काय हरकत आहे. त्याचवेळी सातबारा कोरा झालेले ४० लाख शेतकरी आणि कर्जमाफी योजनेचा लाभ झालेल्या अन्य ४९ लाख शेतकऱ्यांची नावे जाहीर करण्याचे आव्हान उद्धव यांनी सरकारला दिले.
भाजपाचे नेते एकनाथ खडसे पुन्हा मंत्रिमंडळात येण्याची शक्यता असल्याबाबत उद्धव ठाकरे यांना विचारले असता, ‘शेवटी ते ठरवतील तो वाल्या आणि ते ठरवतील तो वाल्मीकी, असा टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला.
थेट सरपंच निवडीस विरोध
नगराध्यक्ष थेट जनतेतून निवडण्याच्या निर्णयाला शिवसेनेने पाठिंबा दिला. मग उद्या मुख्यमंत्रीपण थेट जनतेतून निवडणार काय? कोणताही निर्णय घेताना आधीच्या निर्णयाचा आढावा घ्यायला हवा.
सरपंच वा नगराध्यक्ष वेगळ्या विचारांचा निवडून आला की त्या ठिकाणी मतभेद होतात. त्याचा दुष्परिणाम शेवटी त्या-त्या पक्षाला भोगावे लागतात. तेव्हा सरकारने याबाबत योग्य निर्णय घ्यायला हवा, असे मत ठाकरे यांनी व्यक्त केले.