‘त्या’ वकिलाची अखेर जामिनावर सुटका
By admin | Published: July 3, 2017 10:37 PM2017-07-03T22:37:01+5:302017-07-03T22:37:01+5:30
सहकारी महिलेवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या अरुण जालीसादगी या ६५ वर्षीय ज्येष्ठ वकिलाला ठाणे न्यायालयाने काही अटीशर्तींवर जामीन मंजूर केला
आॅनलाइन लोकमत
ठाणे, दि. 3 - सहकारी महिलेवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या अरुण जालीसादगी या ६५ वर्षीय ज्येष्ठ वकिलाला ठाणे न्यायालयाने काही अटीशर्तींवर जामीन मंजूर केला आहे. त्यामुळे सोमवारी त्यांची ठाणे कारागृहातून सुटका झाली.
जालीसादगी यांना दोन वेळा पोलीस कोठडी देण्यात आल्यानंतर शुक्रवारी (३० जून रोजी) त्यांना न्यायालयीन कोठडी मिळाली होती. त्यांनी नौपाड्यातील कार्यालयातच लैंगिक अत्याचार केल्याचा पीडित वकील महिलेचा आरोप आहे. तिचे वय ३९, तर आरोपीचे वय ६५ असून दोघांनाही कायद्याचे चांगले ज्ञान आहे.
त्यांच्यात असलेली जुनी ओळख आणि काही तांत्रिक मुद्यांच्या आधारे आरोपीच्या वकिलांनी मांडलेली बाजू ग्राह्य धरून त्यांना ५० हजारांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर ठाणे शहराच्या बाहेर जाण्याच्या आणि पोलिसांकडे हजेरी लावण्याच्या अटींवर न्यायालयाने शनिवारी त्यांचा जामीन मंजूर केला. सोमवारी याबाबतचे आदेश मिळाल्यानंतर त्यांची मध्यवर्ती कारागृहातून सुटका झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.