गंडा घालणारा वकील पोलिसांना सापडेना
By admin | Published: September 4, 2016 12:52 AM2016-09-04T00:52:50+5:302016-09-04T00:52:50+5:30
न्यायालयात दावे दाखल करण्यास पैसे घेऊनही ते काम न करता अनेक अशिलांना गंडवणाऱ्या राजीव भाटिया या वकिलाविरुद्ध मुंबई उच्च न्यायालयाने अजामीनपात्र
मुंबई: न्यायालयात दावे दाखल करण्यास पैसे घेऊनही ते काम न करता अनेक अशिलांना गंडवणाऱ्या राजीव भाटिया या वकिलाविरुद्ध मुंबई उच्च न्यायालयाने अजामीनपात्र अटक वॉरन्ट काढले असून गेले आठ महिने शोध घेऊनही मुंबई पोलिसांना हा वकील अद्याप सापडलेला नाही.
न्या. एस. जे. काथावाला यांनी २१ डिसेंबर रोजी भाटिया यांच्याविरुद्ध वॉरन्ट काढून त्यांना ११ जानेवारी रोजी हजर करण्याचा आदेश दिला. तीन महिन्यांनंतरही पोलीस त्यांना आणू न शकल्याने मार्चमध्ये न्यायालयाने पोलीस आयुक्तांना उपायुक्तांच्या नेतृत्वाखाली खास पथक नेमून शोध घेण्याचा आदेश दिला. यानंतर चार तारखा उलटल्या, पण भाटिया पोलिसांना सापडलेले नाहीत. भाटिया यांना शोधण्याचे हरप्रकारे प्रयत्न सुरु आहेत, असे आश्वासन उपायुक्त रविंद्र शिसवे यांनी दिल्यानंतर न्या. काथावाला यांनी आता ३० सप्टेंबरपर्यंतची मुदत दिली आहे. न्यायालयात भाटिया यांच्या हॉर्निमन सर्कल येथील कार्यालयाच्या व कुलाबा येथील घराच्या पत्त्याची नोंद आहे. पण प्रत्यक्षात त्यांनी कार्यालय अन्यत्र हलविल्याचे व कुलाब्यातील घर विकल्याचे आढळले. मध्यंतरी पोलिसांना एक स्त्री भाटिया यांची पत्नी असल्याची माहिती मिळाली. मात्र तिचीही फसवणूक करून भाटिया यांनी तिला घटस्फोट दिला असल्याचे तपासातून निष्पन्न झाले. हे वॉरन्ट निघण्यापूर्वी एका पक्षकाराने केलेल्या एक कोटी रुपयांच्या फसवणुकीच्या तक्रारीवरून भाटिया यांनी केलेला अटकपूर्व जामीन उच्च न्यायालयाने फेटाळला. ब्रिज इस्टेट एजन्सीने दोन वर्षांपूर्वी प्रार्थना बिल्डर्सविरुद्ध दावा दाखल करण्यास भाटिया यांना वकील म्हणून नेमले. भाटिया यांनी कोर्ट फीसाठी पक्षकारांकडून १.२६ लाख घेतले. शिवाय प्रतिवादींच्या मालमत्तांवर टांच आणून त्या विकल्या जातील तेव्हा त्याचे पैसे जमा करण्यासाठी पाच लाख रुपये ऊरून बँकेत एक ‘एक्स्रो’ खाते उघडण्यास सांगितले. बरेच दिवस झाले तरी या दाव्यात पुढे काही हालचाल होईना म्हणून पक्षकारांनी न्यायालयाच्या कार्यालयात चौकशी केली तेव्हा भाटिया यांनी कोर्ट फी न भरल्याने दावा कार्यालयीन पातळीवरच फेटाळला गेल्याचे त्यांना समजले.
ब्रिज इस्टेट एजन्सीने अर्ज करून न्या. काथावाला यांच्या निदर्शनास ही बाब आणली. या अर्जावर सुनावणी सुरु होती तेव्हा अक्षय आणि आंचल सेठ हे भाटिया यांनी फसविलेले आणखी पक्षकार पुढे आले. त्यांनीही भाटिया यांच्या फसवणुकीचा लेखी पाढा वाचला. भाटिया पक्षकारांची लुबाडणूक करत आहे हे लक्षात आल्यावर न्यायालयाने प्रथम त्यांना हजर होण्यास सांगितले व नंतर अटक वॉरन्ट काढले. परंतु आठ महिने झाले तरी पोलीस त्यांना पकडून न्यायालयापुढे आणू शकलेले नाहीत. (विशेष प्रतिनिधी)
बार कौन्सिलकडेही तक्रार
अक्षय आणि आंचल सेठ यांनी तीन वर्षांपूर्वी भाटिया यांच्याविरुद्ध महाराष्ट्र बार कौन्सिलकडेही तक्रार केली आहे. डिसेंबरमध्ये न्या. काथावाला यांनी भाटियांविरुद्ध वॉरन्ट काढले तेव्हा बार कौन्सिलकडेही या तक्रारीचे पुढे काय झाले याची चौकशी केली. त्यानंतर बार कौन्सिलनेही काही कळविलेले नाही किंवा न्या. काथावाला यांनीही त्याविषयी पुढे विचारणा केली नाही.