ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या कारवर हल्ला; नांदेडच्या कंधार तालुक्यातील घटना
By ऑनलाइन लोकमत | Published: November 7, 2024 10:07 PM2024-11-07T22:07:51+5:302024-11-07T22:08:36+5:30
Laxman Hake : लक्ष्मण हाके एका अपक्ष उमेदवाराच्या प्रचारासाठी येथे आले असता हल्ला करण्यात आला.
Laxman Hake :नांदेडमधून एक मोठी बातमी समोर आली आली आहे. नांदेडमध्ये विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी गेलेले ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या कारवर हल्ला झाला आहे. नांदेडच्या कंधार तालुक्यातील बाचोटीमध्ये ही घटना घडली असून, या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या घटनेत हाके यांच्या गाडीची तोडफोड करण्यात आली आहे. दरम्यान, त्यांच्यावर यापूर्वी पुण्यातही हल्ला झाला होता.
सविस्तर माहिती अशी की, लोहा मतदारसंघातील जनहित पक्षाचे उमेदवार चंद्रसेन सुरनर यांच्या प्रचारासाठी लक्ष्मण हाके आले होते. प्रचारसभा संपवून परत जाताना बाचोटी येथे हा प्रकार घडला. शंभर ते दीडशे तरुणांचा जमाव होता, पहिल्यांदा गाडीच्या बोनेटवर चढले आणि त्यानंतर गाडीच्या मागच्या बाजूच्या काचा फोडण्यात आल्या आहेत, अशी माहिती लक्ष्मण हाके यांनी दिली. हल्ला करणाऱ्यांच्या हातामध्ये काळे झेंडे होते. हल्लेखोर एक मराठा लाख मराठा आणि मनोज जरांगेंच्या नावाच्या घोषणा दिल्या, असेही लक्ष्मण हाके यांनी सांगितले.
यावेळी ओबीसी आंदोलकदेखील आक्रमक झाले, त्यांनीही घोषणाबाजी केली. यावेळी दोन्ही गटाचे कार्यकर्ते आमने सामने आले. ओबीसी कार्यकर्त्यांनी रस्त्यावरच ठिय्या करून घोषणा दिल्या. नंतर पोलिसांनी मध्यस्थी करुन वाद शमवला, अशी माहिती आहे.
या हल्ल्यानंतर हाकेंनी प्रतिक्रिया दिली. 'आम्ही लोहा कंधार विधानसभा मतदारसंघात एका उमेदवाराच्या प्रचारासाठी आलो होतो. बाचोटीतून आमच्या गाड्यांचा ताफा चालला होता, त्यावेळी 100 ते 150 तरुणांच्या गटाने लाठ्याकाठ्या घेऊन आमच्या कारवर हल्ला केला. हा हल्ला भ्याड आणि जीवघेणा हल्ला असल्याचं म्हटलं. आमचा जीव घेऊन कुणाचं ध्येय साध्य करायचं असेल तर तयार आहोत, असं हाके म्हणाले. आमने सामने यायची हल्लेखोरांमध्ये धमक नाही. यांच्यात समोरासमोर येऊन लढायचा दम नाही. बाचोटी गावातील तरुण होते, त्यांनी एक मराठा लाख मराठा अशा घोषणा दिल्या. जरांगेंच्या नावानं घोषणा देत होते. आता निवडणुकीतून माघार घ्यायची का? उद्या आम्हाला मतदानाला बाहेर पडू दिलं जाणार की नाही?' असा सवाल लक्ष्मण हाके यांनी केला आहे.
ते पुढे म्हणाले, 'कंधार तालुक्यातील पोलिसांना माहिती देऊन वाय दर्जाची सुरक्षा असूनही एक कॉन्स्टेबल नव्हता, असं लक्ष्मण हाके म्हणाले. लातूरमध्ये पोलिसांनी संरक्षण दिले होते, नांदेडमध्ये एकही पोलीस संरक्षणाला नव्हता. आमच्या गाड्या त्या गावातून पास होत असताना गाड्या अडवण्यात आल्या. उद्या कंधार पोलीस स्टेशनवर मोर्चा काढणार आहोत. हल्लेखोरांना अटक होईपर्यंत कंधार पोलीस स्टेशनजवळ ठिय्या आंदोलन करणार आहोत', असे लक्ष्मण हाके म्हणाले.