“मनोज जरांगेंच्या आंदोलनाला वाळू माफियांचा सपोर्ट, त्यांचीच कार वापरतात”: लक्ष्मण हाके
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2025 18:17 IST2025-02-11T18:14:04+5:302025-02-11T18:17:19+5:30
Laxman Hake News: या लोकांना फक्त तडीपारची कारवाई न करता मकोका लावायला हवा, अशी मागणी लक्ष्मण हाके यांनी केली.

“मनोज जरांगेंच्या आंदोलनाला वाळू माफियांचा सपोर्ट, त्यांचीच कार वापरतात”: लक्ष्मण हाके
Laxman Hake News: बीड, परभणी प्रकरणावरून विरोधकांनी महायुती सरकारला घेरण्याचा प्रयत्न सुरू ठेवला आहे. तर दुसरीकडे मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळावे, ही मागणी आक्रमकपणे लावून धरली आहे. काही दिवसांपूर्वी मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण स्थगित केले होते. परंतु, आता पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील उपोषणाला बसणार असल्याची माहिती मिळाली आहे. या घडामोडी सुरू असतानाच मनोज जरांगे यांच्या मेहुण्यांवर तडीपारीची कारवाई करण्यात आली असून, तशी नोटीस बजावण्यात आली आहे.
जालना जिल्ह्यात वाळू माफिया आणि गुन्हेगारांवर प्रशासनाने तडीपीरीची कारवाई केली आहे. जालना प्रशासनाने नऊ जणांविरोधात कारवाई केली, यामध्ये मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचा मेहुणा विलास खेडकर याचाही समावेश आहे. तसेच जरांगे पाटील यांच्या आंदोलनातील ५ जणांचा समावेश आहेत. यावरून आता ओबीसी आरक्षण वाचण्यासाठी सुरू असलेल्या आंदोलनाचे नेतृत्व करणाऱ्या लक्ष्मण हाके यांनी मोठा दावा केला आहे.
मनोज जरांगेंच्या आंदोलनाला वाळू माफियांचा सपोर्ट
मनोज जरांगे पाटलांना सपोर्ट करणारे आणि आंदोलनाच्या वेळी जरांगे पाटील ज्यांची गाडी वापरतात ती गाडी वाळू माफियांची आहे. जरांगे पाटलांच्या आंदोलनाला या वाळू माफियांचा सपोर्ट आहे. वाळू माफियांचा सपोर्ट घेणे न घेणे हे कायदा सुव्यवस्था बघून घेईल. कायद्याचा भंग करतील महसूल बुडवतील त्यांना कायदा बघून घेईन. अशा वाळू माफियांच्या जीवावर जरांगे आंदोलन करून ओबीसीच्या आरक्षणामध्ये घुसखोरी करत असतील तर घातक आहे. मुख्यमंत्र्यांनी दोन समाजामध्ये तेढ निर्माण करणाऱ्या या लोकांवर कठोरात कठोर शिक्षा करायला हवी, अशी मागणी लक्ष्मण हाके यांनी केली.
फक्त तडीपारची कारवाई न करता मकोका लावायला हवा
या वाळू माफियांना शिक्षा झालीच पाहिजे. अंतरवाली सराटीमध्ये गोळीबार करणारी माणसे, दंगल घडवणारी माणसे, ही माणसे कोण आहेत, यांच्यावर मकोकापेक्षाही मोठा गुन्हा दाखल झाला पाहिजे. त्यांच्यावर फक्त तडीपारची कारवाई करून चालणार नाही. ओबीसींचे एवढेच म्हणणे आहे की, ओबीसीअंतर्गत घुसखोरी करू नका. घुसखोरी केली तर ओबीसींचे आरक्षण संपेल ही आमची न्याय मागणी होती. ओबीसीची बाजू मांडणाऱ्या प्रत्येक नेत्यावर या नेत्यांनी फिजिकल अटॅक केले आहेत. ज्या लोकांवर तडीपारची कारवाई झाली त्याच लोकांनी पुण्यामध्ये माझ्यावर हल्ला केला, असा मोठा आरोप लक्ष्मण हाकेंनी केला. तसेच त्यामुळे या लोकांना फक्त तडीपारची कारवाई न करता मकोका लावायला हवा, अशी मागणीही हाके यांनी केली.
दरम्यान, मनोज जरांगे पाटलांनी आठवड्यातून दोन दिवस उपोषण करावे आणि महाराष्ट्रातील सर्व प्रश्नांवर बोलावे. मनोज जरांगे पाटील यांनी परिस्थितीचे गांभीर्य घालवू नये, असे हाके म्हणाले.