“मनोज जरांगे काय मागणी करतात तेच कळत नाही, आरक्षणाच्या नावाखाली राजकारण”: लक्ष्मण हाके

By ऑनलाइन लोकमत | Published: June 25, 2024 03:51 PM2024-06-25T15:51:03+5:302024-06-25T15:53:12+5:30

Laxman Hake News: बुद्धीभेद करू नका. थोडीशी माहिती घेऊन बोलत जा, असे लक्ष्मण हाके यांनी म्हटले आहे.

laxman hake criticized manoj jarange patil over irrelevant demands | “मनोज जरांगे काय मागणी करतात तेच कळत नाही, आरक्षणाच्या नावाखाली राजकारण”: लक्ष्मण हाके

“मनोज जरांगे काय मागणी करतात तेच कळत नाही, आरक्षणाच्या नावाखाली राजकारण”: लक्ष्मण हाके

Laxman Hake News: ओबीसी आणि मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यातील वातावरण चांगलेच तापताना दिसत आहे. आरक्षणाच्या मुद्द्यावरून आंदोलन करणारे लक्ष्मण हाके आणि मनोज जरांगे पाटील आक्रमकपणे भूमिका मांडत असून, आपापल्या मागण्यांवर ठाम आहेत. तसेच एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपही करताना पाहायला मिळत आहेत. मनोज जरांगे आरक्षणाच्या नावाखाली राजकारण करत असल्याची टीका लक्ष्मण हाके यांनी केली. 

पत्रकारांशी बोलताना लक्ष्मण हाके म्हणाले की, मनोज जरांगे पाटील नेमकी काय मागणी करतात, हे अजून कळालेले नाही. कारण प्रत्येक आंदोलनात त्यांची मागणी वेगळी असते. तसेच कधीच होणार नाही, अशाच गोष्टीची ते मागणी करतात. त्यांचे कोण सल्लागार आहेत हे कळत नाही. त्यांनी थोडा अभ्यास आणि थोडीशी माहिती घेऊन बोलायला हवे. मनोज जरांगेचा थोडाही अभ्यास नाही, या शब्दांत लक्ष्मण हाके यांनी हल्लाबोल केला. 

बुद्धीभेद करू नका थोडीशी माहिती घेऊन बोलत जा

एसटीची लढाई आमची वेगळी आहे. एसटीची आमची लढाई चालू असताना आमच्या ताटातले आरक्षण हिरावून घेतले जात असेल तर आमचे छोटे-छोटे समाज पुढे येणार आहेत का? आमच्या धनगर समाजाचे सर्व नेते आणि आमच्यामध्ये सर्वांचे एकमत आहे. त्यामुळे बुद्धीभेद करू नका थोडीशी माहिती घेऊन बोलत जा, असा सल्ला देत डॉ. रमेश तारक  सारख्या उच्चशिक्षित माणसाच्या तोंडाला काळे फासणे योग्य नाही. आज तोंडाला काळ फासले, उद्या काही अनुचित प्रकार घडू नये. आताची त्यांची वाटचाल त्यांच्यामध्ये घुसमट सुरू असल्याचे दाखवते. म्हणून तेव्हाच अशा घटना घडत आहेत. कायदा हातात घेऊन निवेदनकर्त्या माणसाला काळ फासले जात असेल तर ती झुंडशही आहे, अशी स्पष्ट प्रतिक्रिया लक्ष्मण हाके यांनी व्यक्त केली. 

दरम्यान, लोक हुशार झालेत. पुढचा धमाका होणार आहे. १३ तारखेपर्यंत गप्प आहे. मराठा समाजाला सरकारने फसवू नये. सगेसोयरेची अंमलबजावणी आमच्या म्हणण्याप्रमाणे झाली पाहिजे. मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण घेतल्याशिवाय मागे हटणार नाही. अंतरवाली सराटी येथे जाऊन बसणार आहे. आरक्षण मिळाल्याशिवाय माघार नाही. ६ जुलैपासून मराठा समाज जनजागृती रॅली जिल्ह्याजिल्ह्यात निघणार आहे, असे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे. 
 

Web Title: laxman hake criticized manoj jarange patil over irrelevant demands

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.