जरांगेंच्या तालावर मुख्यमंत्री नाचतात; ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाकेंची बोचरी टीका

By ऑनलाइन लोकमत | Published: September 21, 2024 01:36 PM2024-09-21T13:36:13+5:302024-09-21T13:37:40+5:30

ओबीसी आरक्षणावरून लक्ष्मण हाके यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यासह मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवरही जोरदार टीका केली. 

Laxman Hake criticizes CM Eknath Shinde and Manoj Jarange Patil over OBC-Maratha reservation dispute | जरांगेंच्या तालावर मुख्यमंत्री नाचतात; ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाकेंची बोचरी टीका

जरांगेंच्या तालावर मुख्यमंत्री नाचतात; ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाकेंची बोचरी टीका

जालना - पंकजा मुंडे, महादेव जानकर यांच्या पराभवासाठी मनोज जरांगेंनी कुठे आणि कुणासोबत बैठका घेतल्या? मनोज जरांगे पाटलांनी अभ्यास न करता बोलू नये. सगळ्या जातींना घेऊन मुख्यमंत्री चालतो पण हे मुख्यमंत्री जरांगेंच्या तालावर नाचतात. जरांगे मनोरुग्ण माणूस आहे. सहा आंदोलनात सहा मागण्या करणारा हा माणूस आहे. मुख्यमंत्री मराठ्यांचं ऐकतो आणि दुसऱ्याचं ऐकत नाही. धनगर आणि ओबीसी वेगळे आहेत असं म्हणतो, त्याला माहिती नाही मग मुख्यमंत्र्यांना पण माहिती नाही का? असा सवाल करत ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांनी मनोज जरांगे पाटील आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर निशाणा साधला आहे.

लक्ष्मण हाके यांनी पत्रकार परिषद घेत म्हटलं की, मुख्यमंत्र्यांना धनगरांच्या एसटीबाबत जीआर काढण्याचा अधिकार नाही. हा संसदेचा अधिकार आहे. राष्ट्रपतीच्या सहीने पत्र जाते, त्यानंतर संसदेत मंजुरी मिळते, त्यानंतर हे आरक्षण मिळेल. या सरकारने जितके जीआर काढले ते बेकायदेशीर, अवैध आहेत. याआधीचे कोर्टाने दिलेले निकालपत्र वाचत नाहीत. कुणी आंदोलन केले तर समिती नेमली जाते. महाराष्ट्राच्या अटॉर्नी जनरलचं मुख्यमंत्री ऐकत नसतील. घटनेशी द्रोह मुख्यमंत्री करतायेत. २ नंबरचे धंदे करणाऱ्यांना आमदार, खासदारकीचे तिकीट देतात ते अठरापगड जातीचे प्रश्न कसे संसदेतील मांडतील. एकनाथ शिंदे हे २ नंबर टोळीचे नेतृत्व करतात, एका जातीसाठी ते काम करतात असा आमचा थेट आरोप आहे असं त्यांनी सांगितले. 

तसेच शिक्षण, नोकरीसाठी महाराष्ट्रात धनगरांसाठी वर्गीकरण केलंय, ते VJNT मध्ये. मात्र धनगर हे ओबीसीत आहेत. जरांगेंनी अभ्यास करावा. मराठा समाज मागासलेला आहे हे कुठल्याही आयोगात सिद्ध होत नाही. हैदराबाद गॅझेट लागू करणार असाल खरा कुणबी हा गोव्यात एससीमध्ये आहे. मराठा सामाजिक मागासलेला नाही. ते वतनदार, जहागिर आहेत. जरांगे तू हिटलर आहे का, तू आंदोलन करतो, गाव वेठीस धरतो तेव्हा इतरांना त्रास होत नाही का? भाजपाचा पराभव कर, निवडणुकीत उतर, उमेदवार उभे कर. जी लोक जबाबदार असतील त्यांना जरांगे बोलणार असतील तरच प्रश्न सुटेल अशी टीका लक्ष्मण हाकेंनी जरांगेंवर केली. 

दरम्यान, आमच्या आंदोलनाकडे, समस्यांकडे जे जे आमदार, खासदार, राजकीय पक्ष बोलले नाहीत या सगळ्यांवर आम्ही बहिष्कार टाकणार आहोत. आम्ही फक्त ओबीसींना मतदान करणार आहोत. शरद पवारांनी मंडल आयोग लागू करताना ते मुख्यमंत्री होते. मग आमचे मागासवर्गीय आंदोलनावर का बोलत नाही, ओबीसी आंदोलनाकडे एकदाही पवार कुटुंब जात नाही. महाजातीयवादी शरद पवार आहेत. आमदारकी, खासदारकी आणि कारखानदारी कुणाकडे दिलीय ती यादी काढा. एक प्रतिनिधित्व दिले नाही असा आरोपही हाकेंनी केला. 

राहुल गांधींना मागितली भेटीची वेळ

पृथ्वीराज चव्हाणांना महाराष्ट्रात ओबीसी राहतात की नाही हे माहिती नाही. ते जरांगेंना जाऊन भेटतात. काँग्रेस ओबीसींबद्दल बोलत नाही. राहुल गांधी बोलतात, ओबीसींची जातीनिहाय जनगणना झाली पाहिजे आणि त्यांचे इथले नेते ओबीसींवर बोलत नाहीत. आम्ही राहुल गांधींची वेळ मागितली आहे. जोपर्यंत संस्थानिकांच्या हातात काँग्रेस तोपर्यंत किती आपटले तरी या संस्थानिकांपुरती काँग्रेस राहणार आहे असं लक्ष्मण हाकेंनी म्हटलं. 

Web Title: Laxman Hake criticizes CM Eknath Shinde and Manoj Jarange Patil over OBC-Maratha reservation dispute

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.