अंतरवालीच्या वेशीवरच ओबीसींचे उपोषण सुरू, आरक्षणाला धक्का लागू नये, लक्ष्मण हाके यांची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: June 14, 2024 10:24 AM2024-06-14T10:24:46+5:302024-06-14T10:24:57+5:30
OBC Reservation : अंतरवाली सराटीच्या वेशीवरच ओबीसींचे गुरुवारी दुपारी आरक्षण बचाव आमरण उपोषण सुरू करण्यात आले आहे. या उपोषणामध्ये मागासवर्गीय आयोगाचे माजी सदस्य लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे हे दोघे उपोषणाला बसले आहेत.
वडीगोद्री (जि.जालना) - अंतरवाली सराटीच्या वेशीवरच ओबीसींचे गुरुवारी दुपारी आरक्षण बचाव आमरण उपोषण सुरू करण्यात आले आहे. या उपोषणामध्ये मागासवर्गीय आयोगाचे माजी सदस्य लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे हे दोघे उपोषणाला बसले आहेत. ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लागू नये, यासाठी उपोषण सुरू असून, राज्यपालांकडून लेखी आश्वासन मिळत नाही, तोपर्यंत उपोषण सुरूच राहणार असल्याचे हाके यांनी सांगितले.
महाराष्ट्रात लाखोंच्या संख्येने कुणबी नोंदी दिल्या जात आहेत. त्यामुळे मूळ ओबीसींच्या अधिकारावर अतिक्रमण होत आहे. ओबीसी, व्हीजेएनटीचा दाखला काढायला प्रशासन किमान महिना, दोन महिने लावतात मात्र यांना एका टेबलावर कशा काय नोंदी मिळतात, असा सवाल हाके यांनी यावेळी केला. या उपोषणस्थळी उपविभागीय अधिकारी दीपक पाटील, तहसीलदार चंद्रकांत शेळके यांनी येऊन भेट देऊन चर्चा केली.