लक्ष्मण हाकेंकडून मद्यप्राशन करून शिविगाळ, मराठा आंदोलकांचा आरोप, पुण्यात तणाव
By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2024 11:49 PM2024-09-30T23:49:01+5:302024-09-30T23:59:24+5:30
Laxman Hake News: आज ओबीसी समाजातील नेते लक्ष्मण हाके यांनी पुण्यामध्ये मद्यप्राशन करून काही मराठा आंदोलकांना शिविगाळ केल्याचा दावा करणारा व्हिडीओ व्हायरल झाल्याने खळबळ उडाली असून, लक्ष्मण हाके यांच्याविरोधात मराठा आंदोलकांनी आक्रमक भूमिका घेतल्याने पुण्यातील कोंढवा पोलीस ठाण्यामध्ये मराठा आंदोलक आणि ओबीसी नेते आमने-सामने आले.
मराठा समाजाला ओबीसींमधून आरक्षण द्यावं या मागणीसाठी मागच्या वर्षभरापासून सुरू असलेल्या आंदोलनामुळे मराठा आणि ओबीसी समाज आमने सामने आलेले आहेत. दरम्यान, आज ओबीसी समाजातील नेते लक्ष्मण हाके यांनी पुण्यामध्ये मद्यप्राशन करून काही मराठा आंदोलकांना शिविगाळ केल्याचा दावा करणारा व्हिडीओ व्हायरल झाल्याने खळबळ उडाली असून, लक्ष्मण हाके यांच्याविरोधात मराठा आंदोलकांनी आक्रमक भूमिका घेतल्याने पुण्यातील कोंढवा पोलीस ठाण्यामध्ये मराठा आंदोलक आणि ओबीसी नेते आमने-सामने आले. तसेच या ठिकाणी प्रचंड गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली. एकीकडी लक्ष्मण हाके यांनी मद्यप्राशन करून मराठा आंदोलकांना शिविगाळ केल्याचा आरोप मराठा आंदोलकांकडून करण्यात येत आहे. तर दुसरीकडे आपल्याला जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला, असा आरोप लक्ष्मण हाके यांनी केला आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार आज रात्री पुण्यातील कोंढवा परिसरामध्ये लक्ष्मण हाके यांनी मद्यप्राशन करून मराठा समाजाला शिविगाळ केल्याचा आरोप मराठा आंदोलकांनी केला. तसेच याबाबतचा व्हिडीओ व्हायरल झाला. त्यानंतर शिविगाळ आणि धमकी देणाऱ्या लक्ष्मण हाके यांना मराठा आंदोलकांनी पकडून कोंढवा पोलीस ठाण्यात नेले. तसेच हाके यांची अल्कोहोल चाचणी करण्याची मागणी केली. त्यामुळे कोंढवा परिसरात एकच गोंधळ झाला.
दरम्यान, या घटनेनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना लक्ष्मण हाके यांनी सांगितले की, मी आता तुमच्यासमोर उभा आहे आणि घडलेल्या घटनेला एक तासही उलटलेला नाही. आता वैद्यकीय चाचणी होईल. त्यामधून माझ्यावर करण्यात आलेल्या आरोपांची शहानिशा पोलीस खातं करेल. दरम्यान, २५ ते ५० जणांच्या जमावाने मला पकडून जिवे मारण्याचा प्रयत्न केला. माझी एस्कॉर्टची गाडी सोबत होती. आज संध्याकाळी पाच वाजल्यापासून एक माणूस माझ्यावर लक्ष ठेवून होता. पूर्वनियोजित पद्धतीने मला मारण्याचा हा कट होता, असा आरोप लक्ष्मण हाके यांनी केला.
मद्यप्राशन केल्याच्या आरोपांना उत्तर देताना लक्ष्मण हाके म्हणाले की, मी आता तुमच्यासमोर आहे. मी कुठेही पळून गेलेलो नाही. मी पोलीस खात्यासोबत आहे आणि कुठल्याही तपासणीला तयार आहे, असे त्यांनी सांगितले.