“जरांगेंना छगन भुजबळ नावाची कावीळ, चांगल्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा”: लक्ष्मण हाके
By ऑनलाइन लोकमत | Published: June 28, 2024 07:01 PM2024-06-28T19:01:31+5:302024-06-28T19:02:23+5:30
Laxman Hake News: आम्ही कुणाला घाबरत नाही. आमची अभिवादन यात्रा स्थगित करण्यात आली नाही. मध्यरात्रीही तीन सभा झाल्या, असे लक्ष्मण हाके यांनी म्हटले आहे.
Laxman Hake News: एकीकडे विधिमंडळाचे अधिवेशन सुरू असताना दुसरीकडे आरक्षणाचा मुद्दा दिवसेंदिवस अधिकच तापताना दिसत आहे. ओबीसी आणि मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून आपापल्या मागण्यांवर लक्ष्मण हाके आणि मनोज जरांगे पाटील ठाम असल्याचे पाहायला मिळत आहेत. मनोज जरांगे सातत्याने छगन भुजबळ यांच्यावर टीका करत आहेत. यावरून लक्ष्मण हाके यांनी मनोज जरांगे यांच्यावर टीका केली आहे.
मनोज जरांगे यांच्या मातोरी गावात डीजे वाजवण्यावरून ओबीसी आणि मराठा समाजातील लोक आमनेसामने आले होते. यावेळी दगडफेकही झाली होती. यावरून मनोज जरांगे यांनी थेट छगन भुजबळ यांच्यावर टीकास्त्र सोडले. दगडफेक झाल्याची माहिती मला मिळाली आहे. हा प्रकार घडवून आणला आहे, अशी मला त्यात शंका दिसतेय. छगन भुजबळांना दगडफेक करण्याचा नाद आहे. छगन भुजबळांना माझेच गाव का सापडले? आंतरवाली सराटीतही माझ्या आंदोलनापुढे बसायला लावले. छगन भुजबळांनी ते आंदोलन ठेवले होते. त्यांना सवय आहे. त्यांना हटकून करायची सवय आहे. मुद्दाम वाट्याला जाण्याची सवय आहे. आंदोलन करायला विरोध नाही. पण, दंगल झाली पाहिजे. जाती जाती तेढ निर्माण झाली पाहिजे, यासाठी त्यांनी आंदोलन केले, असा मोठा आरोप जरांगे यांनी केला. यानंतर लक्ष्मण हाके यांनी भाष्य करताना खोचक शब्दांत टीका केली.
आमची अभिवादन यात्रा स्थगित करण्यात आली नाही
आमची अभिवादन यात्रा स्थगित करण्यात आली नाही. अभिवादन यात्रेचा पहिला टप्पा पूर्ण झालेला आहे. जवळजवळ १० ते १२ तास आमची अभिवादन यात्रा लेट झाली. भगवानगडावर आम्ही रात्री ७ ला पोहोचणार होतो. परंतु, तिथे पोहोचण्यासाठी आम्हाला पहाटेचे साडेपाच वाजले. रात्री ३ वाजता सभा झाल्या, ४ ला झाल्या, ५ ला सभा झाल्या. त्यामुळे ही यात्रा स्थगित नाही, असे लक्ष्मण हाके यांनी स्पष्ट केले.
मनोज जरांगेंना छगन भुजबळ नावाची कावीळ
आम्ही लोकशाहीतील संविधानातील लढाई लढतो आहोत. आम्ही कुणाला घाबरत नाही, असे लक्ष्मण हाके म्हणाले. यावेळी पत्रकारांनी मातेरी गावातील दगडफेक आणि मनोज जरांगे पाटील यांनी छगन भुजबळ यांच्यावर केलेले आरोप, याबाबत लक्ष्मण हाके यांना प्रतिक्रिया विचारली. यावर बोलताना, मनोज जरांगे यांना छगन भुजबळ नावाची कावीळ झाली आहे. त्यामुळे त्यांना कुठेही छगन भुजबळ यांचे चित्र दिसते. या पुढच्या कालावधीत चांगल्या डॉक्टरकडे जाऊन इलाज घेतला पाहिजे. कावीळ अशीच वाढत गेली की काय होते, हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. महाराष्ट्राला माहिती आहे. डॉक्टरांकडून चांगला सल्ला घ्यावा. चांगली ट्रीटमेंट घ्यावी, अशी त्यांना विनंती आहे, असे लक्ष्मण हाके यांनी म्हटले आहे.