नरेंद्र मोदींच्या ‘ज्योतिपुंज’मध्ये लक्ष्मणराव इनामदारांचा उल्लेख
By Admin | Published: April 14, 2017 11:24 PM2017-04-14T23:24:37+5:302017-04-14T23:25:20+5:30
खटावकरांचा गौरव : गुजरातमधील संघाच्या स्थापनेतील अनेक जुन्या आठवणींना उजाळा
नम्रता भोसले --खटाव --पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लिहिलेल्या ‘ज्योतीपुंज’ या पुस्तकात त्यांचे खटावचे गुरू लक्ष्मणराव इनामदार यांच्याबद्दल उल्लेख केला आहे. यानिमित्ताने सातारा जिल्हा अन् खटावचा अप्रत्यक्षपणे सन्मानच झाला आहे, अशी भावना खटाव ग्रामस्थांची झाली आहे. यासंदर्भात सोशल मीडियावरून पोस्ट फिरवली जात आहे.
गुजरातमध्ये ‘वकीलसाहेब’ म्हणून लोकप्रिय असलेले दिवंगत लक्ष्मणराव माधवराव इनामदार यांचा जन्म २१ सप्टेंबर १९१७ रोजी सातारा जिल्ह्यातील खटावमध्ये झाला. त्यांचे पूर्वज श्रीकृष्णराव खटावकरांनी शिवाजी महाराजांच्या काळात स्वराज्यासाठी सेवा केली होती. त्यामुळे शिवाजी महाराजांचे नातू छत्रपती शाहूजी महाराज यांनी त्यांना इनाम म्हणून जमीन आणि ‘सरदार’ ही उपाधी दिली होती. त्यावेळेपासून या परिवाराला ‘इनामदार’ नावाने ओळखले जाऊ लागले.
लक्ष्मणराव कदम यांचे कुटुंब मोठे होते. कुटुंबात सात भाऊ, दोन बहिणी आणि चार विधवा आत्या तसेच त्यांची मुले असे मोठे एकत्र कुटुंब. त्यात घरची आर्थिक परिस्थिती बेताची याही परिस्थितीत वडील आणि आजोबांनी कुटुंबाला एकत्र राहण्याची ताकद दिली. त्यामुळे लक्ष्मणराव इनामदार यांच्यावरही त्यांचे संस्कार रुजले होते. त्यांचे शिक्षण खटाव तसेच सातारा येथे झाले. १९३९ मध्ये साताऱ्यामध्ये विधी शाखेतून शिक्षण घेत असताना हैद्राबाद निजामच्या विरुद्धचे आंदोलन जोरात सुरू होते. त्यावेळी लक्ष्मणरावांनी आपले शिक्षण अर्धवट सोडून समवेत दीडशे महाविद्यालयीन मुलांना बरोबर घेऊन या आंदोलनात भाग घेतला. १९४३ मध्ये प्रचारक म्हणून गुजरातमधील नवसारी गावात पाठवण्यात आले. १९५२ मध्ये ते गुजरात प्रांताचे मुख्य प्रचारक बनले. आणि त्याच्याच प्रयत्नातून पुढील चार वर्षांत त्यांनी दीडशे शाखा स्थापन केल्या.
आपल्याबरोबर काम करणाऱ्या सर्वांना बरोबर घेऊन जाण्याची त्यांच्याकडे असलेली कला तसेच लहान-लहान कार्यकर्त्यांची काळजी घेत असताना प्रकृती निरोगी राहण्यासाठी व्यायामाची जोड असावी यादृष्टीने त्यांचा नेहमी कटाक्ष असायचा. संघाचे कार्य करताना कार्यकर्त्यांच्या कौटुंबिक जीवनावर परिणाम होणार नाही, याविषयी विशेष लक्ष असायचे. स्वयंसेवकांची जपणूक तसेच त्याचे मन व त्याच्या संस्काराची जपणूक करण्यासाठी ते सदैव तत्पर असायचे. संघाचे मुख्य प्रचारक म्हणून कार्यरत असताना गुजरातमध्ये पडणारा दुष्काळ, पूर, भूकंप, मीनाक्षीपुरम कांड या आपत्ती काळात त्यांनी हिंमतीने सामना केला.
गुजरातमध्ये संघ कार्याचे शिल्पकार लक्ष्मणराव इनामदार यांचा मृत्यू १५ जुलै १९८५ मध्ये पुणे येथे झाला. गुजरातमध्ये केवळ संघच नाही तर संघ कार्याने पे्ररित होऊन केलेल्या कार्याच्या खुणा तसेच विचारांचा प्रभाव दिसून येतो.
गुजरातमध्ये संघाचे काम करत असताना गुरू लक्ष्मणराव इनामदार यांच्या समवेत नरेंद्र मोदी.