‘लक्ष्मी’रूपी मुलीलाच ३० हजारांत विकले!
By admin | Published: October 24, 2014 03:53 AM2014-10-24T03:53:18+5:302014-10-24T03:53:18+5:30
मुलीच्या आईच्या फिर्यादीवरून भडगाव पोलिसांनी शशिकांत केंदाळे व त्याच्या प्रेयसीसह पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
भडगाव (जि. जळगाव) : दिवाळीच्या पर्वात लक्ष्मीपूजनाचे विशेष आहे. मात्र या प्रकाशपर्वातच एका नराधम बापाने साडेपाच वर्षीय लक्ष्मी नावाच्या मुलीला ३० हजार रुपयांत विकल्याची संतापजनक आणि तितकीच धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.
मुलीच्या आईच्या फिर्यादीवरून भडगाव पोलिसांनी शशिकांत केंदाळे व त्याच्या प्रेयसीसह पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी लक्ष्मीला जयपूर येथून भडगावला आणले आहे. आरोपींनाही ताब्यात घेतले आहे.
१२ सप्टेंबर रोजी सकाळी ८ वाजता लक्ष्मीला रेशन दुकानावर घेऊन जातो, असे सांगत पती शशिकांत वाल्मीक केंदाळे हा थेट मुंबईला घेऊन गेला. तो मोलमजुरी करतो. मुंबईला गेल्यावर विठ्ठलवाडीमधील (उल्हासनगर) त्याची प्रेयसी शीतल बागूल हिच्यासमवेत लताबाई हिच्याकडे मुक्काम केला. तेथून ते सिंधी कॅम्प चेंबूर येथील तायराबाई हिच्या घरी गेले. तेथे तायराबाईच्या मध्यस्थीने सनी नावाच्या इसमास बोलावून त्याचेसोबत लक्ष्मीचा सौदा ठरवला. १५ हजार रुपये आगाऊ रक्कम घेतल्यावर शशिकांत केंदाळे, शीतल बागूल हे मुलीसमवेत वांद्रे रेल्वे स्टेशनवरून गाडीने जयपूर येथे गेले. तेथे सनीने मुलीचा ताबा घेतला व उर्वरित १५ हजार रुपये शशिकांतला दिले. नंतर शशिकांत हा शीतल बागूलला घेऊन नंदुरबारला आला. यानंतर तेथून तो एकटा भडगावला परतला. मुलीबाबत पतीला विचारले असता त्याने सांगण्यास टाळाटाळ केली, असे सुरेखा केंदाळे (रा. यशवंत नगर) यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.
पतीने माहिती न दिल्याने सुरेखा यांनी पोलिसांत धाव घेतली व पती शशिकांत केंदाळे, शीतल बागूल (उल्हासनगर), लताबाई(विठ्ठलवाडी), तायराबाई (सिंधी कॅम्प, चेंबूर, मुंबई), सनी यांच्याविरोधात फिर्याद दिली. (प्रतिनिधी)