ठाणे खाडीत वाढतोय ‘पीओपी’चा थर

By admin | Published: September 18, 2016 02:54 AM2016-09-18T02:54:28+5:302016-09-18T02:55:05+5:30

ठाणे महापालिकेने विसर्जनासाठी कृत्रिम तलावांची निर्मिती केली.

The layer of 'POP' is growing in Thane creek | ठाणे खाडीत वाढतोय ‘पीओपी’चा थर

ठाणे खाडीत वाढतोय ‘पीओपी’चा थर

Next


ठाणे महापालिकेने विसर्जनासाठी कृत्रिम तलावांची निर्मिती केली. त्यांना नागरिकांचा प्रतिसाद वाढतो आहे. कृत्रिम तलावांबरोबर मूर्ती स्वीकार केंद्रांचीदेखील संकल्पना राबवली. या गोष्टी स्वागतार्ह आणि चांगल्या आहेत. पण, कृत्रिम तलावांतील विसर्जन झालेल्या मूर्ती नंतर पुन्हा खाडीत सोडल्या जातात. खाडीतील पाणी वाहते असले तरी भराव टाकल्यामुळे ते अरुंद झाले आहे आणि रेतीउपसा थांबल्यामुळे त्यात गाळ साचून पात्र उथळ झाले आहे. त्यामुळे प्लास्टर आॅफ पॅरिसच्या मूर्ती वाहून जाण्याऐवजी तेथेच खाली बसत आहेत. कालांतराने तिथेच त्यांचा साठा होणार. प्रत्यक्षात, त्याचा परिणाम आज दिसून येत नसला तरी मोठ्या खाडीत वाहत्या पाण्यात काही काळाने प्लास्टर आॅफ पॅरिसचा साठा मोठ्या प्रमाणात साठून राहण्याची भीती आहे. जसे हळूहळू कळवा, विटावा विसर्जन घाट बंद झाले होते, तिथे छोटी होडीही आणू शकत नव्हते, इतका प्लास्टर आॅफ पॅरिसचा साठा तयार झाला होता.
यावर उपाय म्हणजे प्रत्येक नागरिकाने सुजाण बनून छोट्या मूर्ती, शाडूची माती, कागदी लगदा किंवा सध्याच्या स्थितीत ट्री गणेशा अशा रीतीने पर्यावरणपूरक वस्तू वापरून जर मूर्ती बनवल्या, तर भविष्यात आपल्या खाडीच्या मोठ्या पात्रातही पर्यावरणपूरक नसलेल्या साहित्यापासून बनवलेल्या मूर्तींचा गाळ साठण्याची भीती नाहीशी होईल. त्यामुळे ठाणे महानगरपालिका किंवा इतर शासकीय संस्थांवर अवलंबून न राहता व्यक्तिगत किंवा सामाजिक स्तरावर मूर्तींचा आकार कमीतकमी ठेवावा (घरगुती किंवा सार्वजनिक) आणि दुसरे म्हणजे पर्यावरणपूरक वस्तू वापरून मूर्ती बनवणे, या दोन गोष्टी आचरणात आणाव्या. व्यक्तिश: काही माणसे हे आचरणात आणताहेत. परंतु, सर्वांनी जर हे प्रत्यक्षात आणले तर खाडीचे गतवैभव परत मिळवण्यासाठी आपण मोठ्या प्रमाणात योगदान देऊ शकू. खाडीमधील प्रदूषण हे गेल्या काही वर्षांपासून कारखान्यांच्या कचऱ्यापेक्षा घरगुती कचऱ्याने फार मोठ्या प्रमाणात होत आहे आणि त्यात मूर्ती विसर्जन किंवा तत्सम धार्मिक गोष्टींमुळे- ज्यात निर्माल्य विसर्जन, देवदेवतांच्या तसबिरी, त्यांना घातलेले कृत्रिम हार किंवा इतर सजावटींच्या सामानामुळे मोठ्या प्रमाणात पाण्याचे आणि खाडीतील एकूणच परिसंस्थेचे अतोनात नुकसान होत आहे. पर्यावरणस्नेही वस्तू वापरल्याने हे नुकसान टळेल आणि मूर्तीचा आकार कमी केल्यामुळे निर्माण होणारा गाळही कमी होईल. निर्माल्य एकत्र करून त्यापासून जैविक खत चांगल्या पद्धतीने तयार होते. ठाणे महापालिका आणि इतर सामाजिक संस्था यासाठी प्रयत्न करीत आहेत. परंतु, ते करण्यासाठी पुरेशी जागा उपलब्ध नाही. प्रत्येक नागरिकाने आपल्या घरातील निर्माल्य खाडीत, पाण्यात किंवा बाहेर न टाकता आपल्या सोसायटीच्या आवारात मातीत पुरून ठेवले, तर काही दिवसांनी नैसर्गिकरीत्या त्याचे खत तयार होईल, जेणेकरून या मातीयुक्त खतांच्या वापरातून झाडांची वाढ होण्यास चांगलीच मदत होईल.
(पर्यावरण अभ्यासक)
- शब्दांकन : प्रज्ञा म्हात्रे
>निर्माल्याचा प्रश्न असा लागला मार्गी

आमच्या सोसायटीत काही घरांतून निर्माल्य हे कचऱ्यात येत असे. ते कुजल्यामुळे दुर्गंधी तर येत असे. निर्माल्य असल्यामुळे अनेकांच्या भावना दुखावल्या जात. बाकीचे लोक परंपरेने निर्माल्यासह प्लास्टिक, कृत्रिम फुले हे सर्व वाहत्या पाण्यात-खाडीत टाकत. फुलांवर प्रक्रिया होऊन त्यांची विल्हेवाट लागे. परंतु, प्लास्टिक व इतर अविघटनशील पदार्थांमुळे पाण्यातील सजीव आणि त्यांचे जीवन धोक्यात आले. हे आता सर्वांना पटवून दिले. त्यामुळे सर्व जण सोसायटीच्या कोपऱ्यात हे निर्माल्य टाकतात. परिणामी, पारिजातक, नारळ, पपई यासारखी फळ-फुल-झाडे जोमाने वाढत आहे. त्यामुळे प्रदूषण थांबले. धार्मिक भावनादेखील सांभाळल्या गेल्या आणि पर्यावरणाला मदत झाली.

Web Title: The layer of 'POP' is growing in Thane creek

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.