शिवाजी विद्यापीठाची निकालात आघाडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2017 01:58 AM2017-07-21T01:58:36+5:302017-07-21T01:58:36+5:30
राज्यातील अन्य विद्यापीठांच्या तुलनेत सर्वाधिक ११६८ परीक्षा घेऊनदेखील गेल्या दहा वर्षांपासून शिवाजी विद्यापीठाचे निकाल वेळेत जाहीर होत आहेत.
- संतोष मिठारी । लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : राज्यातील अन्य विद्यापीठांच्या तुलनेत सर्वाधिक ११६८ परीक्षा घेऊनदेखील गेल्या दहा वर्षांपासून शिवाजी विद्यापीठाचे निकाल वेळेत जाहीर होत आहेत. कुलपतींनी आतापर्यंत दोन वेळा प्रशस्तिपत्र देऊन गौरविलेही आहे.
मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा वेळेत होत नाहीत, त्या विद्यापीठाच्या १२ लाख प्रश्र्नपत्रिका आठ दिवसांत तपासण्याचे अवघड आव्हान विद्यापीठासमोर आहे. कुलपतींनी या विद्यापीठाला विलंबाबध्दल फटकारले आहे. त्या पार्श्वभूमीवर ‘लोकमत’ने शिवाजी विद्यापीठाच्या परीक्षा पध्दतीची माहिती घेतली असता हे चित्र समोर आले.
प्रत्येक शैक्षणिक वर्षात शिवाजी विद्यापीठ हिवाळी व उन्हाळी सत्रांत पदविका, पदवी, पदव्युत्तर पदवी, पदविकांच्या ११६८ परीक्षा घेते. सत्र पद्धतीमुळे परीक्षाविषयक कामाचा भार वाढला आहे. त्यातून ३० ते ४५ दिवसांत निकाल लावण्यासाठी विद्यापीठाने गेल्या दहा वर्षांत महत्त्वपूर्ण पावले टाकली आहेत. यात ८० दिवसांचा परीक्षांचा कालावधी ४२ दिवसांवर आणला. परीक्षापूर्व आणि नंतरच्या विविध स्वरूपांतील कामांसाठी ‘डिजिटल युनिव्हर्सिर्टी- डिजिटल कॉलेज’ कक्ष, सिक्युअर्ड रिमोट पेपर डिलिव्हरी, आदी तंत्रज्ञानाचा योग्य वापर केला आहे.
४५ दिवसांत
९० टक्के निकाल
या वर्षीच्या उन्हाळी सत्रात विद्यापीठाने ६०० परीक्षा घेतल्या. त्यातील ३५४ परीक्षांचे निकाल जूनअखेर जाहीर झाले. गुरुवारअखेर ५०२ परीक्षांचे निकाल लागले आहेत. यातील ९० टक्के परीक्षांचे निकाल ४५ दिवसांत जाहीर केल्याचे परीक्षा नियंत्रक महेश काकडे यांनी सांगितले.