पंतप्रधान पॅकेज वाटून खाणारे कोडगे नेते - मुख्यमंत्री
By admin | Published: April 27, 2017 06:37 PM2017-04-27T18:37:31+5:302017-04-27T19:37:02+5:30
विरोधी पक्षातील आमदार व खासदारांनी सत्तेत असताना पंतप्रधान पॅकेजचे पैसे वाटून खाल्ले. त्यामुळे शेतक-यांच्या आजच्या अवस्थेला तेच जबाबदार असतानाही निर्लजासारखे
Next
>ऑनलाइन लोकमत
पिंपरी -चिंचवड, दि. 27 - विरोधी पक्षातील आमदार व खासदारांनी सत्तेत असताना पंतप्रधान पॅकेजचे पैसे वाटून खाल्ले. त्यामुळे शेतक-यांच्या आजच्या अवस्थेला तेच जबाबदार असतानाही निर्लजासारखे संघर्ष यात्रा काढत आहेत. ऐवढे कोडगे नेते कसे काय असू शकतात, अशी खरमरीत टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. तसेच, या संघर्ष यात्रेला उत्तर म्हणून भाजप सरकारकडून राबविण्यात येणा-या उपायोजनांची माहिती थेट शेतक-यांर्पयत पोहचविण्यासाठी संवाद यात्रा काढण्याचे आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केले.
भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश कार्यकारणीचा चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे सभागृहात गुरुवारी समारोप झाला. यावेळी ते बोलत होते. प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे-पाटील, सहकारमंत्री चंद्रकांत पाटील व राष्ट्रीय उपाध्यक्ष शाम जाजू आदी व्यासपीठांवर उपस्थित होते.
मुख्यमंत्री यांनी संघर्ष यात्रा काढणा-या काँग्रेस व राष्ट्रवादीच्या नेत्यांवर हल्लाबोल केला. संघर्ष यात्रेला नाव दिल्यानं संघर्ष होत नाही. मनापासून संघर्ष करावा लागतो. शेतक-यांच्या आजच्या स्थितीला तेच जबाबदार आहेत. हे जनतेला माहिती असल्याने त्यांच्या संघर्ष यात्रेला प्रतिसाद मिळत नाही. त्यामुळे केवळ मोजके कार्यकर्ते घेऊन संघर्ष सुरू आहे. केवळ एअर कंडीशनर गाडीतून फिरून संघर्षयात्रा होत नाही, गोपीनाथ मुंडेंच्या संघर्षयात्रेने परिवर्तन घडवलं होतं. विरोधकांच्या संघर्ष यात्रेला आमच्या संवाद यात्रेतून उत्तर देण्यात येईल. जलयुक्त शिवाराच्या माध्यमातून झालेली कामे, शासनाकडून करण्यात येणा-या उपायोजनांची माहिती थेट शेतक-यांच्या शेतीच्या बांधावर व शिवारात जाऊन संवाद साधण्यात येणार आहे. कोणीही एसी बसने प्रवास करणार नाही, असे मुख्यमंत्र्यांनी आमदारांना आवाहन केले.
भाजपा सरकारने जीएसटीसारखा एकच कर पध्दती देशभर सुरू केली आहे. हा कर जास्तीत जास्त 28 टक्के असणार आहे. त्यामध्ये भ्रष्टाचार करण्यास कोणताही वाव नाही. तसेच, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भीम आधार अॅप सुरू केले आहे. त्यामुळे सामान्य नागरिकांना केवळ अंगठय़ाच्या आधारे बँकेचे व विविध व्यवहार पारदर्शकपण करता येणार आहे, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.
तर व्यापा-यांवर फौजदारी गुन्हा...
सद्या तुरीवरून आंदोलन सुरू आहे. मात्र, भाजपा सरकारने देशातील 11 लाख टन खरेदी, एकट्या महाराष्ट्रात 4 लाख टन तुरीची खरेदी केली आहे. आमच्यावर टीका करणारांनी सत्तेत असताना 13 लाख टन तुरीचे उत्पादन असताना केवळ 20 हजार टन तूर खरेदी करून शेतक-यांना रस्त्यावर सोडलं होते. परंतु, आम्ही 22 एप्रिलर्पयत दोनवेळा मुदतवाढ देऊन शेतक-यांच्या तुरीचा शेवटचा दाणाही खरेदी केला आहे. मात्र, शेतक-यांच्या नावानं व्यापारीकरण खपवून घेतलं जाणार नाही. शेतक-यांच्या तुरीचा बोनस व्यापा-यांनी लाटण्याचा प्रयत्न केल्यास त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येईल, असा इशारा फडणवीस यांनी दिला.
जनतेपासून तुटल्याने बुरुज ढासळले...
भाजपा सरकारने विकास व विश्वासाचे राजकारण केले. त्यामुळे भाजपाला नागपूरमध्ये सत्तेतून सत्ता आणि लातूरमध्ये शून्यातून सत्ता मिळाली. त्यामुळे भाजपा आता महाराष्ट्रव्यापी पक्ष झाला असून, विरोधी पक्ष हे प्रदेशापुरते उरले आहेत. सत्तेत आल्यानंतर मालक समजू लागल्याने विरोधी पक्षाचे नेते जनतेपासून तुटले. त्यामुळे अनेक नेत्यांचे बुरूज ढासळले आहेत. पिंपरी-चिंचवडमध्ये पवारांचा, कराडमध्ये पृथ्वीराज चव्हाण यांचा, सोलापूरात विजयसिंह मोहिते-पाटील, इस्लामपूरला जयंत पाटील आणि सांगलीत पंतगराव कदम यांचे बुरूज ढासळले, तर काहींचे उद्धवस्त झाले. जे अहंकारी झाले, त्यांचा अहंकार जनतेने संपविला आहे. विरोधकांच्या मोगलाईला कंटाळून आपल्याला जनतेने सत्ता दिली आहे. त्यामुळे विजयांचा उन्माद व अहंकार करू नका, असा सल्ला मुख्यमंत्री यांनी दिला. तसेच, भाजपाचे सर्व आमदार, खासदार व जिल्हा परिषद अध्यक्षांनी पारदर्शक कारभार करण्याचे आवाहन केले.