उद्धव ठाकरेंनी टक्केवारी बंद केली, म्हणून...; अंबादास दानवेंचा एकनाथ शिंदेंवर घणाघात
By ऑनलाइन लोकमत | Published: June 21, 2023 03:41 PM2023-06-21T15:41:21+5:302023-06-21T16:44:15+5:30
सत्तेचा दुरुपयोग आणि सूडाची भावना यातून ईडीची धाड टाकली जातेय. ज्यापद्धतीने जाणीवपूर्वक धाडी टाकल्या जातायेत हे जनतेला कळतेय, सत्तेचा माज आणि सत्तेची मस्ती या धाडीतून दिसते असं दानवे म्हणाले.
मुंबई - उद्धव ठाकरेंनी टक्केवारी बंद केली म्हणूनच हे सगळे बंड घडले, जे गेलेत ते बदल्यांमध्ये कसे घेतात? काम कशारितीने विकतात? नुसता धिंगाणा सुरू आहे. मंत्रालयात जाऊन बघा काम कुणाला मिळते, काम कसे होते. हे सगळे बाहेर येईल. आम्ही सोडणार नाही. टक्केवारी तुमची बंद केली, धंदे बंद केले हे सहन न झाल्याने तुम्ही निघून गेला हे लोकांना दिसते अशा शब्दात विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर घणाघात केला.
अंबादास दानवे म्हणाले की, उद्धव ठाकरेंनी ठरवले असते तर हे बंड सहजपणे मोडून काढले असते. त्यांच्यासाठी फार काही अवघड नव्हते. परंतु ज्याच्या मनात गद्दारी रुजली आहे त्याला माझ्यासोबत का ठेवायचे असं ते म्हणत होते. ज्यावेळी बंड झाले तेव्हा तिथे गेलेले अनेक लोक उद्धव ठाकरेंसोबत होते, ते मुख्यमंत्री होते त्यामुळे ठरवले असते तर काहीही केले असते. यांना जाऊन द्यायचे नसते तर महाराष्ट्राची सीमा ओलांडून दिली नसती. पण सत्ता वाचवण्यासाठी आणि खुर्चीसाठी उद्धव ठाकरेंनी यांच्यासारखे काम केले नाही. त्यांनी गद्दारी केली, भाजपाने फोडाफोडी केली, हे सत्तेसाठीच गेले होते असं त्यांनी सांगितले.
तसेच सत्तेचा दुरुपयोग आणि सूडाची भावना यातून ईडीची धाड टाकली जातेय. ज्यापद्धतीने जाणीवपूर्वक धाडी टाकल्या जातायेत हे जनतेला कळतेय, सत्तेचा माज आणि सत्तेची मस्ती या धाडीतून दिसते. काहीजण शिंदे गटात गेलेत त्यांच्याशी चौकशी व्हायला हवी. सगळ्यांना न्याय सारखा असावा. कोविड काळात देशपातळीवर जे काही घडले त्याचीही चौकशी व्हावी, तो काळ असा होता ज्या काळात २ पैसे जास्त की २ पैसे कमी पाहण्याचा वेळ नव्हता. मुंबईची चौकशी का, पुणे, नाशिक, ठाणे, नागपूर सगळीकडे चौकशी झाली पाहिजे अशी मागणीही अंबादास दानवेंनी केली.
दरम्यान, ठाण्यात किती खरेदी केली अद्यापही काही सामानाचा वापर केला नाही. ईडीच्या चौकशीतून काही निष्पन्न होणार नाही. मुंबई महापालिका ही देशातील महत्त्वाची महापालिका आहे. ही पुढे नेण्याचे काम शिवसेनेने केले आहे. शहराच्या विकासासाठी केवळ काम करत नाही तर कोट्यवधीचे फिक्स डिपॉझिटही केले. परंतु गेल्या काळात महापालिकेत लुटालूट सुरू आहे. जी-२० च्या नावाखाली उधळपट्टी झाली आहे. त्याविरोधातच १ जुलैला मोर्चा होणार आहे असं दानवेंनी म्हटलं.
शिंदेंचे मानसिक संतुलन बिघडलंय
बंड फसले असते तर एकनाथ शिंदे यांनी स्वत:ला गोळ्या घातल्या असत्या असं दीपक केसरकर म्हणतात. हे खरे असेल तर मानसिक संतुलन कुणाचे बिघडले हे दिसते. मानसिक संतुलन एकनाथ शिंदेंचे बिघडले आहे. ही गद्दारी भाजपाच्या तालावर, ईडीच्या भीतीने भ्रष्टाचार लपवण्यासाठी केली, शिवसेनेचे बोट धरून भाजपा महाराष्ट्रात फोफावली, तीच शिवसेना फोडण्याचे पाप भाजपाने केले असा आरोपही अंबादास दानवे यांनी केला.