विरोधी पक्षनेतेपदावर राष्ट्रवादीने केला दावा !
By admin | Published: December 7, 2014 01:15 AM2014-12-07T01:15:01+5:302014-12-07T01:16:33+5:30
विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा देत शिवसेना सत्तेत सहभागी झाल्यामुळे रिकाम्या झालेल्या या पदावर राष्ट्रवादीने दावा केला आहे.
Next
मुंबई : विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा देत शिवसेना सत्तेत सहभागी झाल्यामुळे रिकाम्या झालेल्या या पदावर राष्ट्रवादीने दावा केला आहे. तर संख्याबळानुसार काँग्रेस पुढे असल्याने विरोधी पक्षनेतेपद आपल्यालाच मिळाले पाहिजे, असे काँग्रेसचे म्हणणो आहे.
विधानसभेत काँग्रेसचे 42 तर राष्ट्रवादीचे 41 आमदार आहेत. मात्र विश्वासदर्शक ठरावासाठी बोलावण्यात आलेल्या विशेष अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी राज्यपालांना झालेल्या धक्काबुक्कीत काँग्रेसचे पाच आमदार दोन वर्षासाठी निलंबित करण्यात आले. त्यामुळे काँग्रेसचे संख्याबळ 37 वर आले आहे. शिवाय आपणास अपक्षांचा पाठिंबा असल्यामुळे आपले संख्याबळ 48 आहे, असा दावा राष्ट्रवादीने केला आहे. शिवसेना सत्तेत सहभागी होण्याआधी राष्ट्रवादीने भाजपाला बिनशर्त पाठिंबा देऊ केला होता. त्याच्या बळावरच भाजपाने शिवसेनेला स्वत:च्या अटी-शर्तीवर सत्तेत सहभागी करून घेतले. शिवाय विधान परिषदेत राष्ट्रवादीचे संख्याबळ जास्त आहे. परिषदेत बिलं मंजूर करून घेण्यासाठी राष्ट्रवादीची मदत सरकारला लागणार आहे. त्याची बक्षिसी म्हणून विरोधी पक्षनेतेपद राष्ट्रवादीला देण्याचे घाटत आहे.
दरम्यान, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेतेपद राष्ट्रवादीने सुनील तटकरे यांना देण्याचे ठरवले आहे. परिषदेत राष्ट्रवादीचे संख्याबळ 28 आहे तर काँग्रेसचे 22 आहे. याच बळावर राष्ट्रवादीने सभापतीपदावर देखील दावा करण्याचे ठरवले आहे. राष्ट्रवादीने या पदासाठी रामराजे नाईक-निंबाळकर किंवा हेमंत टकले यांच्यापैकी एका नावाची चर्चा सुरू केली आहे.
विधान परिषदेचे सभापती, उपसभापती पद आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेतेपद घेण्याचा डाव राष्ट्रवादीने आखला आहे.
(विशेष प्रतिनिधी)
काँग्रेस नेत्यांना राज्यपालांकडे जेवण
राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे आणि गटनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांना आज राजभवनवर जेवणासाठी आमंत्रित केले होते. विरोधी पक्षनेतेपदाविषयी काही बोलणो झाले का, असे विचारले असता माणिकराव म्हणाले, वैधानिक मंडळांविषयी आमची चर्चा झाली.