नेत्यांनो, आरक्षण द्या, तरच गावात या! राज्यातील मराठा समाजबांधव आक्रमक
By ऑनलाइन लोकमत | Published: October 29, 2023 12:02 PM2023-10-29T12:02:07+5:302023-10-29T12:02:21+5:30
प्रवाशांना उतरवून जाळली बस, राज्यभरात विविध ठिकाणी आंदोलन, उपोषण
लोकमत न्यूज नेटवर्क : मुंबई : मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे-पाटील यांच्या नेतृत्वाखाली राज्यातील जिल्ह्या-जिल्ह्यांत, गावागावांत आंदोलने तीव्र रूप धारण करीत आहेत. सर्वपक्षीय राजकीय नेत्यांना अनेक गावांनी बंदी घातली असून, आधी आरक्षण द्या, तरच गावात या अन्यथा माघारी फिरा, अशी भूमिकाच समाजाने घेतल्याने राजकीय पुढाऱ्यांना मराठा समाजबांधवांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे.
मराठा समाजाला आरक्षण मिळत नसल्याने अहमदपूर तालुक्यातील ढाळेगाव येथील ग्रामपंचायत सदस्य असलेल्या महेश बाबूराव कदम या २६ वर्षीय उच्चशिक्षित तरुणाने विष प्राशन करून आत्महत्या केली. दुष्काळ जगू देत नाही व आरक्षण शिक्षण घेऊ देत नाही, अशा आशयाची चिठ्ठी लिहून त्याने जीवनयात्रा संपविली.
मराठ्यांना त्यांच्या हक्काचे आरक्षण मिळालेच पाहिजे, अशी चिठ्ठी लिहून लातूर जिल्ह्याच्या शिरूर अनंतपाळ तालुक्यातील उमरदरा या गावचे माजी सरपंच व्यंकट नरसिंग ढोपरे (६५) यांनी शुक्रवारी आळंदी येथे इंद्रायणी नदीत उडी मारून आत्महत्या केली. मृत ढाेपरे हे आहेत. नऱ्हे आंबेगाव येथे वास्तव्यास असलेला मुलगा संदीप याच्याकडे आले होते.
पाण्याच्या टाकीवरून घेतली उडी
बीड जिल्ह्यातही अंबाजोगाई तालुक्यातील गिरवली येथील शत्रुघ्न काशीद या तरुणाने मराठा आरक्षण देण्याची मागणी करीत, पाण्याच्या टाकीवरून उडी घेतली.
विरोधात घोषणाबाजी
- जरांगे-पाटील यांना भेटण्यासाठी माजी केंद्रीय मंत्री जयसिंगराव गायकवाड हे अंतरवाली सराटी येथे आले होते. समाजबांधवांनी त्यांच्या विरोधात घोषणाबाजी केली.
- व्यंकोजीराजे भोसले यांचे वंशज तंजावरचे (तामिळनाडू) बाबाजीराजे भोसले हे अंतरवाली सराटी येथे आले होते.
- नारायणगडचे महंत शिवाजी महाराज नारायणगडकर, जिजाऊंचे वंशज शिवाजीराजे जाधव यांच्या विनंतीवरून जरांगे यांनी पाणी पिले.
मराठा समाजाला न्याय देण्यासाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री तसेच केंद्रातील नेतेमंडळी प्रयत्न करीत आहेत. निवृत्त न्या. संदीप शिंदे समितीच्या माध्यमातून युद्धपातळीवर पुरावे गाेळा करण्यात येताहेत. हा प्रश्न दाेन दिवसांत सुटेल.
- डाॅ. तानाजी सावंत, आराेग्यमंत्री
अजित पवार यांनी येणे टाळले
- माळेगाव (जि. पुणे) : मराठा क्रांती मोर्चाच्या धसक्याने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह माजी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी मोळी पूजनाला येण्याचे टाळले.
- गेवराई : माजी राज्यमंत्री बदामराव पंडित मोहिमाता देवीच्या दर्शनासाठी गेले असता, त्यांच्या गाडीवर दगडफेक झाली.
राज्यात कुठे काय?
- वाशिम : मोठेगाव, शेलगाव राजगुरे व करडा (ता. रिसोड, जि. वाशिम) येथे पुढाऱ्यांना गावात बंदी.
- हिंगोली : कौठा सर्कलमधील ११ गावांनी दुचाकी रॅली काढली. ३० तारखेपासून साखळी उपोषण सुरू होईल.
- हिंगोली : वसमत बसस्थानकावर आंदोलकांनी बसवरील सरकारी जाहिरातीला काळे फासले.
- जळगाव : कजगाव (ता. भडगाव) येथील ग्रामपंचायतीच्या तीन सदस्यांनी दिले राजीनामे.
- अहमदनगर : जिल्ह्यात ठिकठिकाणी नेत्यांना बंदी, साखळी उपोषणे सुरू
- सातारा : जिल्ह्यातील अडीचशे गावांत नेत्यांना प्रवेशबंदी
- कोल्हापूर : दसरा चौकात रविवारपासून साखळी उपोषण
ओबीसीतून नको, स्वतंत्र आरक्षण द्या : खा. तडस
लोकमत न्यूज नेटवर्क, नागपूर: मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण न देता स्वतंत्र आरक्षण द्यावे, अशी भूमिका महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेचे अध्यक्ष खासदार रामदास तडस यांनी शनिवारी मांडली. सिव्हिल लाइन्स येथील जवाहर विद्यार्थिगृहात रामदास तडस यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेची विभागीय बैठक पार पडली. पत्रकार परिषदेत खा. तडस म्हणाले की, मराठा समाजाला आरक्षण देण्याला आमचा विरोध नाही. त्यांना ओबीसीमधून आरक्षण देण्याला महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेने विरोध दर्शविला आहे. ओबीसीचा एक घटक असलेल्या तेली समाजाचा ओबीसीमधून मराठा समाजाला आरक्षण देण्याला विरोध आहे.
प्रवासी उतरवून बस जाळली!
उमरखेड (यवतमाळ)/ हदगाव (नांदेड) : नांदेड येथून प्रवासी घेऊन नागपूरकडे निघालेली बस काही युवकांनी पाठलाग करीत अडविली. आधी तोडफोड करत, नंतर पेट्रोल टाकून बस पेटवून दिली. शुक्रवारी रात्री साडेअकराच्या सुमारास विदर्भ आणि मराठवाड्याच्या सीमेवर गोजेगाव येथे पैनगंगा नदीपुलावर हा थरार घडला. बस पेटविण्यापूर्वी संबंधित युवकांनी सर्व ७३ प्रवाशांना बाहेर काढल्याने कोणतीही जीवितहानी झाली नाही. दरम्यान, मराठा आरक्षणाच्या मागणीसाठीच आंदोलकांनी ही बस पेटविल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. नांदेड आगाराची ही बस २७ ऑक्टोबरला नांदेड येथून रात्री नऊ वाजता नागपूरकडे रवाना झाली होती.
आता शाळकरी विद्यार्थिनीही आंदोलनात
पाथरी (जि. परभणी) : आधी मराठा आरक्षण नंतर शिक्षण म्हणत पाथरी तालुक्यातील वाघाळा जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थी साखळी उपोषणात सहभागी झाले. सर्कलनिहाय सुरू असलेले साखळी उपोषण शनिवारी सुरूच होते. हादगाव, बाभळगाव, लिंबा देवनांद्रा व कासापुरी या सर्कलमध्ये येणाऱ्या गावांमध्ये हे साखळी उपोषण चालू आहे. या ठिकाणी शेकडो मराठा बांधव उपोषणस्थळी आहेत. आता या मोहिमेत शालेय विद्यार्थीही सहभागी होत आहेत. समाजाचे इयत्ता सहावी ते नववी पर्यंतचे विद्यार्थी शुक्रवारपासून आपल्या पालकांसमवेत उपोषण स्थळी मराठा आरक्षण मागणीसाठी बसले आहेत.