नेते कर्तृत्वाने मोठे होतात, जातीने नाही; चंद्रशेखर बावनकुळेंचा पंकजा मुंडेंना टोला
By ऑनलाइन लोकमत | Published: December 13, 2019 01:06 PM2019-12-13T13:06:04+5:302019-12-13T13:16:07+5:30
मुख्यमंत्री म्हणून राज्याच्या विकासासाठी योगदान देवेंद्र फडणवीस यांनी दिलं आहे.
मुंबई - पंकजा मुंडे यांनी भाषणात ओबीसी नाराज आहे असं काही वक्तव्य नव्हतं, त्यांच्या मनात दु:खं आहे ते मांडले. ओबीसी समाज भाजपावर नाराज नाही. गेल्या अनेक वर्षापासून नेते पक्षासाठी काम करतायेत. पक्षाने सगळ्यांना त्यांच्या क्षमतेप्रमाणे पदं दिली आहेत. नेते कर्तृत्वाने मोठे होतात जातीने नाही असा टोला भाजपा नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी पंकजा मुंडे यांना लगावला आहे.
एबीपी माझाशी बोलताना बावनकुळे म्हणाले की, देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वात एकही समाज असा नाही ज्यांना नेतृत्व मिळालं नाही. माणसं समाजाचं नेतृत्व करतात पण जातीमुळे माणसं मोठी होत नाही तर कर्तृत्वाने मोठी होतात. सरकार आलं नसल्याने जातीचं राजकारण केलं जात आहे असा आरोप त्यांनी केला.
तसेच कोअर कमिटीत जे नेते आहेत त्यांनी महाराष्ट्राला पुढे कसं नेता येईल? सर्व समाजाला न्याय मिळेल असं काम केलं पाहिजे. महाराष्ट्राला, भाजपाला राज्यात पुढे नेण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांचे नेतृत्व कामी आलं. त्यांच्या कर्तृत्वाने ते पुढे आले आहेत. कुटुंबासाठी वेळ कमी देऊन राज्याच्या विकासासाठी वेळ दिला. महाराष्ट्रासाठी सर्वांनी एकत्र येऊन काम केलं पाहिजे असं सांगत चंद्रशेखर बावनकुळे यांनी देवेंद्र फडणवीस यांचे समर्थन केले आहे.
दरम्यान, फडणवीसांचे नेतृत्व मान्य नाही असं पंकजा मुंडे यांनी केलं नाही. मुख्यमंत्री म्हणून राज्याच्या विकासासाठी योगदान देवेंद्र फडणवीस यांनी दिलं आहे. २१ व्या शतकातील महाराष्ट्राला मजबूत करण्याची क्षमता देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आहे. पक्षासाठी अनेक नेते झटत आहे. ओबीसी, मराठा, धनगर हे बाजूला सारुन एकसंघ महाराष्ट्रासाठी काम केलं पाहिजे असा टोलाही बावनकुळे यांनी पंकजा मुंडे यांना लगावला.
चंद्रशेखर बावनकुळे यांच्यापूर्वी संजय काकडे यांनीही पंकजा मुंडे यांच्यावर तोंडसुख घेतलं. भाजपापासून ओबीसी समाज दुरावेल असं वाटत नाही, ५० पेक्षा अधिक भाजपा आमदार ओबीसी समाजाचे आहे. पंकजा मुंडे यांचे काल जातीपातीचं राजकारण केलं. ५ वर्ष सत्तेत असून मराठवाड्याच्या दुष्काळासाठी काय केलं? गोपीनाथ मुंडे यांनी तयार केलेले नेते ५ वर्षात पंकजा मुंडे यांच्या कोणत्या व्यासपीठावर दिसले. गेल्या ५ वर्षात कोणत्या समाजातील कार्यकर्त्यांना पंकजा मुंडे यांनी सांभाळले आहे? असा घणाघातही संजय काकडे यांनी पंकजा मुंडे यांच्यावर केला.