नेत्यांना रोखले, वाहने फोडली; आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाजबांधव आक्रमक
By ऑनलाइन लोकमत | Published: October 28, 2023 06:11 AM2023-10-28T06:11:59+5:302023-10-28T06:12:25+5:30
राज्यात कुठे काय घडले?
लोकमत न्यूज नेटवर्क, कंधार (जि. नांदेड) : कंधार तालुक्यातील सुमारे ३० गावांत सकल मराठा समाजाच्या वतीने पुढाऱ्यांना गावबंदी केली आहे. अशात खासदार प्रतापराव चिखलीकर हे गुरुवारी रात्री ११ वाजता अंबुलगा येथे आले होते. यावेळी संतापलेल्या आंदोलकांनी त्यांच्या ताफ्यातील वाहनांची तोडफोड केली.
खासदार प्रताप पाटील चिखलीकर हे कंधार दौऱ्यावर आले होते. पुढे उमरगा, मुखेड, बोरी येथे भेटी आणि काही कार्यक्रमानिमित्त ते गेले. रात्री ११च्या सुमारास अंबुलगा येथील माजी जि. प. सदस्य मनोहर तेलंग यांच्या घरी गेले. येथे तरुणांनी आक्रमक होऊन त्यांच्या ताफ्यातील शिवराज होटाळकर व कृष्णा पापीनवार यांच्या वाहनाच्या काचा फोडल्या. तेव्हा दोन्ही वाहनांचे चालक आत होते. खासदार चिखलीकर यांचे वाहन बोरी येथे होते. सुदैवाने यात कुणालाही इजा झाली नाही. या तोडफोडीत तीन वाहनांचे मोठे नुकसान झाले.
समितीला दाखविले काळे झेंडे
मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्याच्या प्रक्रियेत सुसूत्रता आण्याच्या हेतूने गठित केलेली निवृत्त न्या. संदीप शिंदे यांच्या अध्यक्षतेखालील समिती शुक्रवारी धाराशिवमध्ये आली हाेती. कामकाज आटाेपून समिती परत जात असताना मराठा तरुणांनी ‘शिंदे समिती गाे बॅक’च्या घाेषणा देत काळे झेंडे दाखविले.
हसन मुश्रीफांना रोखले : सकल मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी शुक्रवारी सकाळी कोल्हापूर रेल्वे स्थानकावर पालकमंत्री हसन मुश्रीफ यांना रोखून धरले. आरक्षण नाही, तोवर कोल्हापुरात प्रवेश नाही, असे आंदोलकांनी त्यांना सांगितले.
न्या. शिंदे समितीला मुदतवाढ
मराठवाड्यातील मराठा समाजाला कुणबी जात प्रमाणपत्र देण्याची कार्यपद्धती निश्चित करण्यासाठी गठित करण्यात आलेल्या माजी न्यायमूर्ती संदीप शिंदे यांच्या समितीला २४ डिसेंबर २०२३ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यासंदर्भातील शासन निर्णय सामान्य प्रशासन विभागाने शुक्रवारी काढला.
काम होणार नसेल, तो शब्द कधी देऊ नये : शरद पवार
काम होणार नसेल तो शब्द कधी देऊ नये, अशा कानपिचक्या शरद पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिल्या. जरांगे यांना ३० दिवसांची मुदत दिली होती. त्यावर जरांगेंनी मुदत वाढवून दिली होती. त्या काळात काम होणार असल्याचा विश्वास मुख्यमंत्र्यांनी जरांगेंना दिला होता. जे काम होणार नसेल तो शब्द कधी देऊ नये. इथे शब्द दिलाय हे प्राथमिकदृष्ट्या दिसते. त्यामुळे उपोषण करणाऱ्यांना दोष देता येणार नाही, असे शरद पवार म्हणाले.
राज्यात कुठे काय
- जालना : मराठा समाजाकडून ३०६ गावांत पुढाऱ्यांना बंदी, १०६ गावांत उपोषण.
- हिंगोली : डोंगरकडा फाटा (ता. कळमनुरी) येथे साखळी उपोषणात दोन तरुणांचे मुंडन.
- सोलापूर : चळे (ता. पंढरपूर) येथून युवक बैलगाडीने आंतरवाली सराटीकडे.
- परभणी : जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात आतिश गरड याने अंगावर पेट्रोल घेत जाळून घेण्याचा प्रयत्न केला.
- तुळजापूर (जि. धाराशिव) : सर्वच पक्षांच्या पुढाऱ्यांना शहरात प्रवेशबंदी.
- छत्रपती संभाजीनगर : क्रांती चौकात ठिय्या आंदोलन, विविध वॉर्डात आंदोलन सुरू.
- अहमनदगर : खरवंडी कासार (ता. पाथर्डी) येथे आलेल्या आमदार मोनिका राजळे यांना अडविले.